You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलोन मस्कच्या यानातून चंद्रावर जाणारा हा असेल पहिला प्रवासी
इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीनं पृथ्वीवरून चंद्रावर जाणाऱ्या अवकाश प्रवासाचा पहिला प्रवासी कोण असेल हे नुकतंच जाहीर केलं आहे.
जपानी अब्जाधीश, उद्योगपती आणि ऑनलाईन फॅशन उद्योगसम्राट 42 वर्षांचे युसाका मेझावा यांनी घोषणा केली, की "मी चंद्रावर जायचा निर्णय घेतला आहे."
ते बिग फाल्कन रॉकेटनं उड्डाण करतील अशी अटकळ आहे. ही अवकाश उड्डाण सिस्टीम एलॉन मस्क यांनी 2016 साली जगासमोर आणली होती.
नासाचं अपोलो 17 यान 1992 साली चंद्रावर उतरलं होतं. त्यानंतर चंद्रावर माणसाने स्वारी करण्याची ही पहिलीच मोहीम असेल.
SpaceX कंपनीच्या कॅलिफॉर्नियातल्या मुख्यालयात मंगळवारी या मोहिमेची घोषणा करण्यात आली.
"ही मोहीम म्हणजे अवकाशात जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या लोकांना ते सहजशक्य व्हावं यासाठी उचलेलं पहिलं पाऊल असेल."
पहिल्या खाजगी अवकाश प्रवासाचा प्रवासी जपानी असेल याचे संकेत मस्क यांनी आधीच ट्वीट करून दिले होते.
चंद्रमोहिमेवर आजवर फक्त 24 लोक गेलेले आहेत. त्यापैकी सगळेच अमेरिकन आहेत. नासाची तीन यानं अपोलो - 8, 9, आणि 13 यांनी चंद्रावर न उतरता फक्त चंद्राभोवती प्रदक्षिणा मारली. या मोहिमेत मात्र यान चंद्रावर उतरेल.
पण ही मोहीम कधी सुरू होईल, कधी पूर्ण होईल याबाबत अनिश्चितता आहे. मुख्य म्हणजे ही मोहीम अशा यानावर अवलंबून आहे जे अजून तयारच झालेलं नाहीये.
2017 साली मस्क यांनी घोषित केलं होतं की ते पैसे घेऊन दोन प्रवाशांना चांद्रमोहिमेवर पाठवतील. ही मोहीम या वर्षाच्या सुरूवातीलाच होणं अपेक्षित होतं.
या मोहीमेसाठी SpaceXचं जास्त क्षमता असणारं फाल्कन हेव्ही रॉकेट आणि सध्या अस्तित्वात असणारं तसंच प्रशिक्षित कर्मचारी असणारं ड्रॅगन स्पेसक्राफ्ट वापरायचं ठरलं होतं.
पण यावर्षी फेब्रुवारीमध्ये मस्क यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी आता फक्त भविष्यातल्या योजनांसाठी बिग फाल्कन रॉकेटवरच लक्ष केंद्रित करेल.
बिग फाल्कन रॉकेटनं अजून एकदाही उड्डाण केलेलं नाही, पण त्याविषयीच्या काही तांत्रिक बाबींबद्दल मस्क यांनी माहिती दिली आहे.
या रॉकेटची उंची 106 मीटर आहे तर व्यास 9 मीटर आहे. याच्या तुलनेत फाल्कन हेव्ही 70 मीटर उंच आहे आणि याच्या दोन्ही बाजूला दोन बुस्टर्स आहेत ज्यांच्या व्यास प्रत्येकी 3.66 मीटर आहे.
सोमवारी मस्क यांनी बिग फाल्कन रॉकेटच्या नव्या डिझाईनचं अनावरण केलं. हे यान प्रवाशांना चंद्राभोवती फिरवून आणेल.
या नव्या डिझाईनमध्ये मागच्या बाजूला तीन मोठे पंख बसवले आहेत. तसंच यानाच्या आतल्या भागात काळ्या रंगाचं उष्णता प्रतिरोधक बसवलं आहे.
पूर्ण झाल्यावर बिग फाल्कन रॉकेट 150 टन एवढं प्रचंड वजन उचलू शकेल. ज्या रॉकेटने अपोलो यान अवकाशात पाठवलं होतं त्या यूएस सॅटर्न रॉकेटपेक्षाही ही क्षमता जास्त आहे.
मस्क वादाच्या भोवऱ्यात
गेल्या काही दिवसात SpaceX चे संस्थापक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका वेबकास्ट दरम्यान एका अमेरिकन विनोदवीरबरोबर गांजा ओढला होता.
त्याआधी टेस्ला या त्यांच्या कार कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड करण्याबद्दल त्यांनी ट्वीट केलं होतं ज्यामुळे टेस्लाचे शेअर्स गडगडले होते. दोन आठवड्यांनी त्यांनी हा विचार सोडून दिला.
सोमवारी मस्क यांच्यावर ब्रिटिश केव्ह डायव्हर व्हर्नन अन्सवर्थ यांनी मानहानीचा दावा ठोकला. अन्सवर्थ यांनी लहान मुलांचं शोषण केलं आहे, असा दावा मस्क यांनी अनेकदा केला आहे.
अन्सवर्थ यांनी थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी मस्क यांच्यावर 75 हजार डॉलर्सचा नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे. तसंच त्यांनी हे आरोप थांबवावेत अशी मागणीही कोर्टात केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)