मृत महिलेचं गर्भाशय वापरून पहिल्यांदाच झाला बाळाचा जन्म

फोटो स्रोत, Reuters
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एका मृत महिलेच्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणानंतर त्याद्वारे एका मुलीचा जन्म झाल्याची पहिलीच घटना ब्राझीलमध्ये घडली आहे.
ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये एका 32 वर्षांच्या महिलेचा जन्म गर्भाशयाशिवाय झाला होता. तिच्यावर गर्भाशय प्रत्योरापणाची शस्त्रक्रिया 10 तास चालली. त्यानंतर त्या 32 वर्षांच्या महिलेच्या वंध्यत्वावर उपचार करण्यात आले. आणि अखेरीस या बाळाचा जन्म झाला.
याआधी गर्भाशय प्रत्यारोपण 39 वेळा यशस्वीरीत्या पार पडले आहेत. यापैकी काही महिलांनी तर स्वत:च्या मुलींनाच गर्भाशय दिले आहेत आणि अशा केसेसमधून 11 बाळांचा आजवर जन्मही झाला आहे.
पण एखाद्या मृत महिलेचं गर्भाशय वापरून यापूर्वी केलेले 10 प्रत्यारोपण अयशस्वी ठरले होते किंवा त्यातून गर्भपात झाले होते.
या प्रकरणात, मेंदूतून रक्तस्राव झाल्यामुळे एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचं गर्भाशय मग दुसऱ्या महिलेला देण्यात आलं.
गर्भाशय मिळालेल्या महिलेला Mayer-Rokitansky-Küster-Hauser नावाचा आजार झाला होता, जो दर 4,500 महिलांपैकी एकीमध्येच आढळतो. यामुळे योनी आणि गर्भाशयाची वाढ व्यवस्थित होत नाही.
या महिलेचं अंडाशय मात्र व्यवस्थित होते. यामुळे बीजांडं काढणं, दुसऱ्या पुरुषाच्या वीर्यासोबत त्याचा संकर घडवून आणून डॉक्टरांनी ते गोठवून ठेवलं.
या महिलेला काही गोळ्या-औषधी देऊन तिची प्रतिकारशक्ती कमी करण्यात आली होती, जेणेकरून तिचं शरीर या नव्या गर्भाशयाला विरोध करणार नाही.
असा झाला बाळाचा जन्म
याच्या साधारण सहा आठवड्यांनंतर या महिलेची मासिक पाळी सुरू झाली. सात महिन्यांनंतर बीजांडं प्रत्यारोपित करण्यात आली.
आणि अखेरीस 15 डिसेंबर 2017ला संबंधित महिलेनं सिझेरियन पद्धतीनं अडीच किलो वजनाच्या बाळाचा जन्म दिला.
"या पद्धतीनं बाळाचा झालेला जन्म हा वैद्यकीय इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे आता बाळाला जन्म न देऊ शकणाऱ्या कित्येक महिलांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे," असं साओ पावलोच्या डॉ. डॅनी इझेनबर्ग सांगतात.

फोटो स्रोत, PA
"लाईव्ह डोनरची गरज हा मुख्य अडथळा आहे. कारण डोनरची संख्या कमी असते. यामध्ये मुख्यत: कुटुंबातील सदस्य अथवा जवळच्या मित्रांचा समावेश होतो," असं डॉ. डॅनी पुढे सांगतात.
या पद्धतीनं झालेला बाळाचा जन्म खूपच आनंद देणारा आहे, असं लंडनच्या इंपिरियल कॉलेजचे डॉ. सर्जन सेसॉ यांनी म्हटलं आहे.
"यामुळे डोनरची संख्या वाढेल. तसंच कमी पैशांत आणि जिवंत डोनरच्या आरोग्याला हानी न करता ही प्रक्रिया पार पडेल," असं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








