युरोप बड्या शक्तींच्या हातचं खेळणं बनू नये : मॅक्रॉन

जर्मनी आणि फ्रान्समध्ये अधिक चांगले संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत, असं मत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केलं आहे. जर्मनीच्या संसदेत ते बोलत होते. बर्लिनमध्ये युद्धातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते.

जगात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी युरोपवर आहे. युरोप मोठ्या शक्तींच्या हातचं खेळणं बनू नये, असं ते म्हणाले.

युरोझोनचं स्वतंत्र बजेट असलं पाहिजे आणि युरोप अधिक एकसंध बनला पाहिजे, असं ते म्हणाले.

जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी मॅक्रोन यांच्या काही कल्पनांना औपचारिक पाठबळ दिलं आहे. पण इतर बरेच विषय बर्लिनमध्ये वादग्रस्त आहेत. खरं सामर्थ्य हे ऐक्यात आहे, असं ते म्हणाले.

त्यांनी राष्ट्रवादी शक्तींना स्मरणशक्ती नसते, अशी टीका केली. तसेच पुरोगामी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे, ती अस्थिर जगाची गरज आहे, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, "आपले प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत. या शक्ती आपल्या सार्वजनिक चर्चांत हस्तक्षेप करतात, सहिष्णू लोकशाही मूल्यांवर हल्ला करतात आणि आपण एकमेकांविरोधात लढवण्यासाठी प्रयत्न करतील."

सध्याच्या जागतिक संरचनेमध्ये आपल्याला हे फार गांभीर्याने घ्यावं लागेल आपली शक्ती आपल्या ऐक्यात आहे.

गेल्या आठवड्यात मॅक्रॉन यांनी राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेमाचा विश्वासघात असल्याचं म्हटलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित समारंभात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यावर मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती.

मॅक्रॉन यांच्या भाषणानंतर जर्मन आणि फ्रान्सच्या नेत्यांनी स्थलांतर, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, डिजिटल क्षेत्रांतील कंपन्यांची कररचना यावर चर्चा केली.

युरोझोनसाठी नियंत्रित एकत्रित बजेटची घोषणही होण्याची शक्यता आहे.

मर्केल म्हणाल्या, "मॅक्रॉन यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. फ्रान्स आणि जर्मनीमधील सहकार्याची गरज अधोरेखित झाली आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)