You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रान्समधल्या मांस विक्रेत्यांवर सरकारकडे संरक्षण मागण्याची वेळ
कट्टरवादी शाकाहारी लोकांपासून संरक्षण मिळावं म्हणून फ्रान्समधल्या खाटकांनी सरकारला पत्रं लिहिलं आहे. शाकाहारी लोक देशाची पारंपरिक मांस खाद्यसंस्कृती बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
मांसविरोधी ग्रॅफिटी आणि स्टिकर लावून त्यांच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली आहे, असं फ्रेंच फेडरेशन ऑफ बुचर्सचं म्हणणं आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 15 दुकानांवर बनावट रक्त फेकलं गेलं आहे.
"या प्रकारचे हल्ले म्हणजे कट्टरवादाचाच एक प्रकार आहे," असं या पत्रात फेडरेशनचे अध्यक्ष जॉन- फ्रान्सॉय गीहार्ड यांनी म्हटलं आहे.
"फ्रान्सची संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी या प्रकारचा कट्टरवाद काही लोक अवलंबत आहेत. तसंच शाकाहारी लोकांना त्यांची जावनशैली आणि आदर्शवाद इतर लोकांवर लादायचा आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
फ्रान्समध्ये शाकाहारी लोकांची संख्या कमी आहे. 2016मधल्या एका सर्वेक्षणानुसार, फ्रान्समध्ये फक्त 3 % लोक शाकाहारी होते.
" प्रसार माध्यमांमध्ये कट्टरवादी शाकाहारी लोकांच्या जीवनशैलीचं उदात्तीकरण वाढलं आहे, त्यामुळे अशांतता पसरत आहे," असंही गीहार्ड यांनी म्हटलं आहे.
'या घटना नवीन नाहीत'
"फ्रान्सच्या पारंपरिक जीवनात तिथल्या खाटीक समाजाला महत्त्वाचं स्थान आहे. पण आता घडत असलेल्या घटना काही नवीन नाहीत," असं बीबीसीचे पॅरिस प्रतिनिधी लुसी विलियम्स यांनी म्हटलं आहे.
मांस विक्रीत घट झाल्यामुळे शेतकरी गटांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पत्र लिहिलं आहे. मांस उत्पादनावर विपरित परिणाम करणारे नियम बदलावेत, अशी त्यांची मागणी आहे.
मांसविरहित पदार्थांसाठी स्टेक, फिलेट, बेकन आणि सॉसेजेस असे शब्द न वापरण्याची खाद्य उत्पादकांची भूमिका आहे.
शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शाकाहारी जेवण देण्याचा प्रस्ताव संसदेत नाकारण्यात आला होता.
शाकाहारी पदार्थांचा आग्रह धरणाऱ्या एका कार्यकर्त्याला मार्च महिन्यात तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
इस्लामिक कट्टरवाद्यांनी एका खाटकाचा केलेला खून 'न्याय्य' असल्याचं या कार्यकर्त्यानं फेसबुकवर लिहिलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)