You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राउंड रिपोर्ट : झारखंडमध्ये NGOच्या 5 महिलांवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचं संपूर्ण सत्य
- Author, रवी प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी कोचांग (खुंटी)
काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये मानवी तस्करीविरोधात जगजागृती करणाऱ्या एका NGOशी निगडित पाच मुलींवर सामूहिक बलात्कार झाला होता. पाच मुलींचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. तसंच संशयित आरोपींनी त्यांना लघवी पिण्यास भाग पाडलं, अशी माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली हे प्रकरण नेमकं काय आहे, हे बीबीसीनं झारखंडला भेट देऊन जाणून घेतलं.
घटना काय आहे?
झारखंडच्या कोचांग गावातली ही घटना आहे. हे गाव खुंटी जिल्ह्यातल्या अडकी तालुक्यात आहे, पण इथं जर गाडीनं जायचं झालं तर पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातल्या बंदगाव इथून जावं लागतं. इथं घनदाट जंगल असून डोगंरातून चढउतारांच्या रस्त्यानं अर्धा तास चालल्यानंतर कोचांग येतं. इथं सार्वजनिक वाहतून व्यवस्था नीट नसल्यानं लोक रस्त्यानं चालताना दिसतात.
घटना घडली 19 जून रोजी, दुपारीचे 12 वाजले होते. कोचांग चौकपासून 200 मीटर अंतरावर RC मिशनरी स्कूल आहे. या शाळेच्या परिसरात एका चिंचेच्या झाडाखाली बिगरशासकीय संस्थेची एक टीम मानव तस्करीच्या विरोधात जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करत होती.
पाच मुली आणि तीन पुरुष हे पथनाट्य सादर करत होते, तर किमान 300 मुलं आणि ग्रामस्थ तिथं प्रेक्षक म्हणून जमले होते.
हे पथनाट्य सुरू असताना दोन मोटरसायकलवरून पाच जण तिथं आले. त्यांनी काही प्रश्नं विचारले आणि सर्वांना जबरदस्ती पकडून जंगलाच्या दिशेने घेऊन गेले. नाटक सादर करणाऱ्या पुरुषांना मारहाण करण्यात आली.
या घटनेची माहिती न दिल्यामुळे शाळेचे प्राचार्य फादर अल्फान्सो आईंद यांना अटक झाली आहे.
हे सगळं घडलं तेव्हा कोचांग गावातले मार्टिन सोय तिथं उपस्थित होते. त्यांनी सांगितलं, "नाटक सुरू झाल्यानंतर ते चौकात आले होते. त्यांनी या मुलींचं अपहरण केलं. मी या गुन्हेगारांना पूर्वी या परिसरात कधी पाहिलं नव्हतं. ते कोचांगमधले नव्हते."
"सायंकाळी या टीमच्या लोकांना मारहाण झाल्याची माहिती आम्हाला कळली. त्यावेळी बलात्काराची बातमी आमच्यापर्यंत आली नव्हती. पोलीस गावात आल्यानंतर आम्हाला समजलं की या मुलींवर बलात्कार झाला आहे. शाळेचे प्राचार्य फादर अल्फान्सो आईंद यांना अटक करण्यासाठी 300 पोलीस गावात आले. यामध्ये महिला पोलीसही होते. फादर आणि दोन नन यांना ते सोबत घेऊन गेले," सोय यांनी सांगितलं.
प्राचार्यांच्या अटकेवर प्रश्न
फादर अल्फान्सो सद्गृहस्थ आहेत आणि गावातील लोक त्यांचा आदर करतात, असं सोय यांनी आम्हाला सांगितलं.
खुंटी जिल्ह्यातल्या या भागात काही दशकांपूर्वी आदिवासी समाजानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे इथं या धर्माचा मोठा प्रभाव दिसून येतो.
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी कोचांगला आलेले झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार पौलुस सोरेन यांनी या प्रकरणात फादर अल्फांसो यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
सोरेन म्हणतात, "हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालतं. इथं काम करणाऱ्या ख्रिश्चन धर्माच्या विरोधात आहेत. हा चर्चला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण झारखंडमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारकांवर कलम 107नुसार प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणात खोटी कथा रचून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करत आहेत."
ते म्हणाले, "जर पोलिसांना असं वाटत असेल की त्यांना घटनेची माहिती न देणं गुन्हा असेल तर मुख्यमंत्र्यांनी इथं स्वतः येऊन पाहावं की जिथं नेटवर्क नाही, तेव्हा तातडीनं पोलिसांना माहिती कशी देणार?"
पीडित महिलांचा आरोप
या सामूहिक बलात्काराच्या शिकार ठकलेल्या महिला आदिवासी आहेत. त्या खुंटी जिल्ह्याच्या राहणाऱ्या आहेत. त्यातील एक विधवा आणि दोघी अविवाहित असून तिघी खुंटीतील एका NGOसाठी काम करतात. पथनाट्यांच्या माध्यमातून त्या सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार करतात. हेच त्यांचं रोजीरोटीसाठीचं काम.
पोलीस रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पीडितांनी म्हटलं आहे की, "ते तीन लोक होते. बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला विवस्त्र करण्यात आलं आणि आमचे फोटो काढण्यात आले. त्यानंतर आमचा व्हीडिओ बनवण्यात आला, तसंच आमच्या गुप्तांगात काठी घालण्यात आली. काही तासांनंतर आम्हाला कोचांगमधल्या मिशन स्कूलमध्ये सोडून देण्यात आलं."
पोलीस रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, "आमच्या पुरुष साथीदारांना लघवी पिण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्यांना मारहाण करण्यात आली. आम्हाला धमकी देण्यात आली की पत्थलगडी भागात न विचारता यायचं नाही. तुम्ही पोलिसांचे एजंट आहात."
या घटनेनंतर सर्वजण घाबरलेले होते. खुंटीला आल्यानंतर मोबाईलला नेटवर्क आलं तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ही माहिती सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी बाखला यांना दिली.
बाखला सांगतात, "तोपर्यंत रात्र झाली होती आणि हे सर्वजण भेदरलेले होते. मी त्यावेळी खुंटीमध्ये नव्हते म्हणून त्यावेळी मी कुणाशी बोलले नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या एका सहकाऱ्याकडून रांचीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुराग गुप्ता यांना ही माहिती पोहोचवली."
गुप्ता यांनी खुंटीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना ही माहिती दिली आणि पीडितांची तक्रार नोंद करण्यासाठी सांगितलं. त्यानंतर बुधवारी रात्रीपर्यंत तक्रार दाखल झाली.
तथ्य किती, कथानक किती
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांपैकी एक फादर अल्फान्सो आहे.
झारखंड पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि सहाय्यक पोलीस महासंचालक आर. के. मलिक म्हणतात, "या सामूहिक बलात्कार प्रकरणात पत्थलगडी चळवळीच्या समर्थकांचा आणि जहालवाद्यांचा समावेश आहे. या संदर्भात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या आहेत."
"शाळेच्या प्राचार्यांना दोन्ही तक्रारींवरून रिमांडमध्ये घेण्यात आलं आहे. लवकरच इतर संशयितांना अटक केली जाईल. या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली आहे," असं त्यांनी सांगितलं.
पत्थलगडी हा इथला एक भाग असून तिथं आदिवासी लोकांची सरकारच्या विरोधात असहकार चळवळ सुरू करण्यात आली आहे.
या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते शंकर महली बीबीसीशी बोलताना म्हणाले, "पोलिसांनी सरकारच्या सांगण्यावरून हे कथानक रचलं आहे. आम्ही आमचं शासन मागत आहोत आणि सरकार आम्हाला गोवत आहे. कधी आम्हाला नक्षलवादी म्हटलं जातं, कधी अफूची शेती करणारे म्हटलं जातं. तर आता आम्हाला बलात्कारी बनवण्यात येत आहे. यात काहीही तथ्य नाही."
दरम्यान, कोचांगमधील एका पंचायतीनं सामूहिक बलात्कारात सामील असलेल्यांना शासन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)