ब्लॉग : 'आदरणीय पंतप्रधान, हे ट्रोल्स भस्मासूर आहेत, त्यांना पाळणं बंद करा'

    • Author, राजेश जोशी
    • Role, बीबीसी हिंदी रेडिओ एडिटर

आजवर ट्रोल्सचे बाण अशाच लोकांनाच लक्ष्य करत होते ज्यांना सोशल मीडियाच्या भाषेत "लिबटार्ड", "Sickular", "खानग्रेसी" अशी विशेषणं लावली जातात. पण आता या ट्रोल्सच्या निशाण्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही आल्या आहेत.

सुषमा स्वराज यांना तुम्ही pseudo-secular अर्थात खोट्या धर्मनिरपेक्ष म्हणू शकत नाही. त्यांची राजकीय जडणघडण जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांतून झाली नसली तरी भाजपसाठी त्या महत्त्वाच्या नेत्या आहेत.

त्यांना तुम्ही लिबटार्ड, खानग्रेसी असंही म्हणू शकत नाही. कारण त्यांच्या राजकीय करीअरमध्येही त्या सुरुवातीपासूनच काँग्रेसविरोधी राहिल्या आहेत.

सोनिया गांधींना त्यांनी केलेल्या विरोधाच्या कथा फारच प्रसिद्ध आहेत.

2004मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या म्हणून सोनिया गांधी याच पंतप्रधान होणार, असं गृहीत धरलं जात होतं. तेव्हा सोनिया पंतप्रधान झाल्या तर मुंडन करून घेऊ, अशी घोषणा स्वराज यांनी केली होती.

अर्थात तसं करण्याची वेळ काही आली नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

पासपोर्ट प्रकरणात अडकल्या स्वराज

आज सुषमा यांचा उल्लेख का, असा विचार तुम्ही करत असाल, तर थोडी उजळणी करून देतो. सध्या त्या चर्चेत आहेत कारण सोशल मीडियावर आपलं भक्ष्य शोधत फिरणाऱ्या ट्रोल्सनी आता त्यांच्यावरच हल्ला केला आहे.

प्रकरण असं आहे की, लखनौमधील एका दांपत्यानं पासपोर्टसाठी अर्ज केला होता. अर्ज करणारी महिला हिंदू होती तर तिचा नवरा मुस्लीम. या दांपत्याच्या दावा आहे की पासपोर्ट कार्यालयात त्यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला.

त्यामुळे त्यांनी ट्विटरवर अशा कुठल्याही समस्येच्या समाधानासाठी तत्पर असलेल्या सुषमा स्वराज यांच्याकडे न्याय मागितला. स्वराज यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली, आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या हालचालींनंतर पासपोर्ट ऑफिसकडून या दांपत्याला लगेच पासपोर्ट देण्यात आला.

खरंतर एका महिलेनं हिंदू असताना मुसलमानाशी लग्न करणं म्हणजे संघ परिवाराच्या भाषेत मोठा गुन्हा आहे. संघाच्या शब्दकोशात याला 'लव्ह जिहाद' म्हटलं जातं.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मते 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून मुसलमान मुलं हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करतात आणि त्यांचं मग धर्मांतर करून भारतात आपली लोकसंख्या वाढवतात.

संघाच्या या तर्काशी सहमत असलेल्या लोकांच्या नजरेतून पाहिलं तर 'लव्ह जिहाद'मध्ये सहभागी हिंदू महिलेनं सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार करण्याचं धाडस दाखवलं. आणि दुसरं धाडस सुषमा स्वराज यांनी केलं ते म्हणजे त्यांना पासपोर्ट दिला.

गडद कुंकू लावणाऱ्या सुषमा स्वराज ज्या पवित्र हिंदू स्त्रीच्या प्रतीक होत्या त्या अचानक मुस्लीम समर्थक झाल्या. मग काय, या हिंदुत्ववादी ट्रोल्सनी सुषमा स्वराज यांनाच थेट ट्रोल करायला सुरुवात केली.

नंतर स्वराज यांनी खुलासा केला की हे प्रकरण घडलं तेव्हा त्या परदेशात होत्या आणि त्यांच्या गैरहजेरीत यावर काय निर्णय झाला, याची त्यांना कल्पना नव्हती.

सगळेच ट्रोल्स विषारी

संघ परिवाराच्या या प्रचाराचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवर, गल्लीबोळात, रस्त्यांवर आणि परिसरात दिसतो. तर सोशल मीडियावर याचं अधिक हिडीस रूप दिसतं, कारण सोशल मीडियावर तुम्ही कुणावरही थुंकून उभं राहू शकता आणि तुम्हाला कुणी पकडण्याचीही भीती नसते.

म्हणूनच कॅप्टन सरबजीत ढिल्लों नावच्या ट्विटर हँडलवरून सुषमा स्वराज यांना लिहिलं आहे, "ही जवळपास मेलेली बाई आहे. ही उधार घेतलेल्या एका किडनीवर जिवंत आहे आणि तिची दुसरी किडनी कधीही बंद पडू शकते."

इंद्रा वाजपेयी या ट्विटर हॅंडलवरून एका व्यक्तीनं अजून तिखट टीका केली आहे, "लाज बाळगा मॅडम. हा तुमच्या मुस्लीम किडनीचा परिणाम आहे का?"

तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वीच स्वराज यांच्यावर किडनीरोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. संघ परिवाराच्या 'लव्ह जिहाद' प्रचाराच्या प्रभावानं या ट्रोल्सनी त्यांच्या आजारपणाचीही हिंदू आणि मुसलमान, अशी विभागणी केली.

खरंतर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष ट्रोल्सचं पालनपोषण करत असतात. यातील काही ट्रोल्स कमी विषारी असतात तर काही जास्त.

तुम्ही जर तुमच्या स्मरणशक्तीला ताण दिला तर तुम्हाला निखिल दधिच हे नाव लक्षात येईल. गेल्या वर्षी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनानंतर या गुजराती व्यापाऱ्यानं ट्वीट केलं होतं, "एक कुत्री कुत्र्यासारखी काय मेली, सगळी पिलं एका सुरात कुईकुई करू लागली आहेत."

हँडलवर निखिल गर्वानं जाहीर करतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याला फॉलो करतात.

सोशल मीडियावर असलं विष पसरवणारे निखिल दधिच सारखे हिंदुत्ववाही ट्रोल्स त्यांच्या प्रोफाईलवर अभिमानाने लिहितात "Honoured to be followed by honourable Prime Minister."

यामध्ये धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे आणि ब्लॅकमेलिंगची भाषा वापरणारेही बरेच आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांच्या डोक्यावर मोदींचा हात आहे, कारण ते त्यांना फॉलो करतात.

आतापर्यंत असा कोणताही संकेत मिळालेला नाही की यावरून झालेल्या टीकेनंतर पंतप्रधानांनी अशा ट्रोल्सना अनफॉलो केलं आहे.

जेव्हा निखिल दधिच पंतप्रधान मोदी यांचा आश्रय घेत गौरी लंकेश यांना कुत्री आणि त्यांच्या हत्येचा निषेध करणाऱ्यांना कुत्र्यांची पिलं म्हटलं होतं, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

मालवीय म्हणाले होते, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य नागरिकांना फॉलो करतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात. पण पंतप्रधान फॉलो करतात म्हणून कुणालाही चारित्र्याचं प्रमाणपत्र मिळत नाही."

यावर प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी प्रश्न उपस्थित केला होता - "ज्या लोकांना आपले पंतप्रधान ट्विटवर फॉलो करतात त्यातील काही इतके क्रूर आहेत, तरीही पंतप्रधान त्यांच्याकडे डोळेझाक करतात. पंतप्रधानांच हे मौन भयंकर आहे."

यावेळी स्वराज यांनी त्यांना लक्ष्य करणाऱ्या ट्रोल्सना रिट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यात थेट संवाद होत असेलच. तेव्हा अपेक्षा आहे की त्या पंतप्रधानांनाही सांगतील की, 'आदरणीय पंतप्रधान, हे ट्रोल्स भस्मासूर आहेत, त्यांना पाळणं बंद करा'.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)