न्यू कॅलिडोनिया बेट फ्रान्समध्येच राहणार- बहुमताचा कौल

फ्रान्समध्येच राहण्याचा निर्णय न्यू कॅलिडोनिया प्रांताच्या रहिवाशांनी रविवारी बहुमतानं घेतला. काही काळापूर्वी निकाल जाहीर झाला आहे.

हाती आलेल्या अखेरच्या आकडेवारीनुसार 56.4 टक्के लोकांनी फ्रान्समध्येच राहण्याच्य बाजूने तर 43.6 टक्के लोकांनी विरोधात कौल दिला आहे. 81 टक्के नागरिकांनी मतदानात भाग घेतला.

निकालावर प्रतिक्रिया देताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, "हा फ्रेंच प्रजासत्ताकावरचा विश्वास आहे. मला आपण हे एैतिहासिक पाऊल एकत्र टाकले याचा अभिमान वाटतो."

फ्रान्सचा भाग म्हणून राहायचं का फ्रान्समधून बाहेर पडत स्वतंत्र व्हायचं यासाठी फ्रान्सच्या पॅसिफिक महासागरातल्या न्यू कॅलिडोनियामध्ये जनमत चाचणी घेण्यात आली.

काय घडलं होतं?

या प्रदेशातील मूळ रहिवासी कनाक समुदायाच्या लोकांपैकी काहींनी फुटीरतावादी दृष्टिकोन स्वीकारला. त्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाला रोखण्यासाठी दोन दशकांपूर्वीच जनमत चाचणीचा पर्याय समोर ठेवण्यात आला होता.

फ्रान्समधून बाहेर पडून स्वतंत्र व्हावं या विचारांच्या गटाने कनक समुदायाच्या लोकांना वसाहतवादी वर्चस्व झुगारून देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र बहुतांश चाचण्यांच्या संभाव्य निष्कर्षानुसार, फ्रान्समध्ये राहण्यालाच नागरिकांना पसंती दिल्याची स्थिती आहे.

या प्रदेशातल्या 1, 75,000 नागरिक जनमत चाचणीसाठी पात्र आहेत. मात्र एकूण पात्र उमेदवारांपैकी कनक समुदाय जेमतेम 50 टक्के एवढाच आहे.

प्रदेशातल्या युरोपियन मंडळींमध्ये फ्रान्सप्रति राष्ट्रवादाचा जोर तीव्र आहे. कनक समुदायापैकी काहीजणही फ्रान्समध्येच राहण्याला पसंती देणारे आहेत.

माध्यान्हापर्यंत मतदानाचं प्रमाण 41.8 टक्के एवढं आहे. 2014मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये हे प्रमाण 27.3 टक्के एवढंच होतं.

मुख्य फ्रान्सपासून एका टोकाला असणाऱ्या या बेटांना फ्रान्सकडून 1.5 बिलिअन डॉलर एवढी आर्थिक मदत मिळते.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या काही मौल्यवान खनिजांचे साठे आहेत. न्यू कॅलिडोनियात मोठ्या प्रमाणावर साठे आहेत. राजकीय तसंच आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रदेश म्हणून फ्रान्ससाठी न्यू कॅलिडोनियाची उपयुक्तता आहे.

जनमत चाचणीच्या निर्णयानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन जनतेला संबोधित करणार आहेत. न्यू कॅलिडोनियाविना फ्रान्स तितका सुंदर वाटत नाही असं उद्गार मे महिन्यात मॅक्रॉन यांनी काढले होते.

न्यू कॅलिडोनियाला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न नागरिकांना मतदानापूर्वी विचारण्यात येत होता.

बहुसंख्य नागरिकांनी फ्रान्समधून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यास 1977 मध्ये दिजबौटी आणि 1980मध्ये वनातू यांच्यानंतर देशापासून वेगळा होणारा हा पहिलाच प्रदेश ठरणार आहे.

फ्रान्सच्या संसदेत दोन डेप्युटी आणि दोन सिनेटर्स न्यू कॅलिडोनियाचं प्रतिनिधित्व करतात.

न्यू कॅलिडोनिया प्रदेशात स्वत:चं सरकार असून, कायदा तसंच शिक्षण क्षेत्रासंबंधी कायदे पारित केले जातात.

फ्रान्सने 1853मध्ये या बेटांवर हक्क सांगितला. तेव्हापासून हा बेटांचा प्रदेश फ्रान्सची वसाहत म्हणून ओळखला जाऊ लागला.

1980च्या दशकात फ्रान्स सरकार आणि या प्रदेशातील स्थानिक रहिवासी कनक समुदाय यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली होती.

या वादाची परिणती म्हणजे कनक बंडखोरांनी एका गुहेत फ्रान्सच्या काही पोलिसांना ओलिस ठेवलं. फ्रान्सने जोरदार प्रत्युतर दिलं. या संघर्षात कनक समुदायाच्या 19 लोकांची तसंच दोन सैनिकांनी जीव गमावले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)