दृष्टिकोन : रफाल वाद पेटला असताना निर्मला सीतारमन फ्रान्स दौऱ्यावर का?

    • Author, वैजू नरवणे
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसीसाठी फ्रान्सहून

भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आणि भारतात रफालवरून सुरू असलेला वाद हा फक्त योगायोग आहे का?

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सीतारमन या फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांना भेटल्या. AFP या वृत्तसंस्थेनुसार दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंध आणि संरक्षण विषयक सहकार्य वाढवण्यासंबंधी चर्चा झाली.

एक गोष्ट आणखी समजते ती म्हणजे या दौऱ्यादरम्यान त्या दसो एव्हिएशनच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. ही गोष्ट चकित करणारी आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारावर स्वाक्षरी करता आणि तो व्यवहार एका खासगी कंपनीसोबत असतो तेव्हा संरक्षण मंत्र्यांना त्या कंपनीच्या मुख्यालयात जाण्याची काय गरज आहे.

रफाल करार हा सरकारबरोबर झाला नाही ही गोष्ट समजून घ्यायला हवी. भारतीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांचं दसो एव्हिएशनच्या मुख्यालयात जाणं काही छोटी गोष्ट नाही.

गुरुवारी नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी आरोप केला की दसो कंपनीनं भारताबरोबर एक मोठा करार केला आहे आणि ते तेच बोलतील जे भारत सरकार त्यांना सांगेल.

आता हा प्रश्न आहे की निर्मला सीतारमन खरंच या प्रकरणाची सारवासारव करण्यासाठी फ्रान्सला पोहोचल्या आहेत का? निर्मला सीतारमन तिथं पोहोचल्यावर आणि मीडियापार्टनं दावा केल्यानंतर दसो एव्हिएशननं स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिलं. कंपनीचं म्हणणं आहे की रिलायन्सची निवड आम्ही स्वतंत्ररीतीने केली आहे.

मीडियापार्टच्या रिपोर्टनुसार दसो एव्हिएशनचे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी लोइक सेलगन यांनी 11 मे 2017ला केलेल्या एका प्रेझेंटेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना असं सांगितलं की, रिलायन्सला भागीदार म्हणून निवडणं हे अनिवार्य आणि बंधनकारक होतं.

फ्रान्सच्या माध्यमांकडून निर्मला सीतारमन यांच्या दौऱ्याला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं दिसतंय. इथली माध्यमं राष्ट्रवादी आहेत आणि त्यांना नाही वाटत की आपल्या वृत्तांकनामुळे देशाच्या एखाद्या कंपनीचं नुकसान व्हावं.

ज्या प्रकारचा गदारोळ भारतीय माध्यमांमध्ये राफेलवर सुरू आहे तसा प्रकार इथं दिसत नाही.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देखील यावेळी देशात नाहीत. त्यात असं वाटत आहे की फ्रान्सच्या सरकारकडूनही सीतारमन यांच्या दौऱ्याला फारसं महत्त्व दिलं जात नाहीये.

गुरुवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, "भारताच्या संरक्षण मंत्री फ्रान्समध्ये जात आहेत त्यापेक्षा अधिक स्पष्ट काय संदेश असू शकतो." राहुल गांधींनी रफाल प्रकरणात पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दौरा घाई-गडबडीत आखला का?

रफालवर वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मीडियापार्टनं फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांच्या हवाल्यानं बातमी दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं रिलायन्ससोबत भागीदारी करण्याची भारतानं अट घातली होती.

संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी फ्रान्सनं काही खास तयारी केल्याचं दिसत नाहीये. त्यांचं इथं येणं हेच सुचवतं की त्यांचा दौरा घाई-गडबडीत आखण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)