You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राष्ट्रवादाची कास धरू नका - फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचं जागतिक नेत्यांना आवाहन
पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जागतिक नेत्यांना राष्ट्रवादाची कास सोडण्याचं आवाहन केलं आहे.
पॅरिसमध्ये आयोजित या कार्यक्रमाला जगभरातून महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही समावेश आहे. तर भारताचं प्रतिनिधित्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू करत आहेत.
राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्यात फरक करताना हा देशभक्तीचा विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'आपलं हित बघा, बाकीच्यांची पर्वा करू नका' ही जगाला नाकारण्याची भूमिका देशांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असं मॅक्रॉन म्हणाले.
20 मिनिटांच्या भाषणात मॅक्रॉन यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करायला हवा, असं आवाहन जागतिक नेत्यांना केलं. हिंसा किंवा वर्चस्ववादी वृत्ती या दोन्ही चुकांसाठी पुढच्या पिढ्या आपल्याला जबाबदार धरतील. त्यामुळे आपण सारासार विचार करून कृती करायला हवी असंही ते पुढे म्हणाले.
रविवारा दुपारी मॅक्रॉन तसंच जर्मन चॅन्सलर अँगेला मर्केल हे पॅरिस पीस फोरम या शांतता परिषदेला उपस्थित होते. त्यांच्या बरोबरीने पुतिन आणि टर्कीचे रीसेप तय्यप अर्दोगानही हजर होते.
युरोप आणि अन्य ठिकाणीही राष्ट्रवादाचे विचार जोर धरू लागले आहेत असं मर्केल यांनी सांगितलं.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे शांतता परिषदेला उपस्थित नव्हते. अमेरिकेला परतण्यापूर्वी त्यांनी पॅरिसच्या पश्चिमेकडील सुरेसन्समधील एका दफनभूमीला भेट दिली. पहिल्या युद्धात जीव गमावलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना त्यांनी आदरांजली वाहिली. खराब हवामानामुळे अन्य एका दफनभूमीला त्यांनी भेट रद्द केल्यानं वादाला तोंड फुटलं होतं.
1914 ते 1918 या कालावधीत झालेल्या पहिल्या महायुद्धात 9.7 दशलक्ष सैनिक आणि 10 दशलक्ष सामान्य नागरिक मारले गेले होते.
यानिमित्ताने जगभरात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
''या युद्धाशी भारताचा थेट संबंध नव्हता. मात्र भारतीय सैनिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगभर लढले'', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)