You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
20 लाख लोकांच्या नरसंहार प्रकरणी कंबोडियाचे 2 नेते दोषी
कंबोडियात 1970च्या दशकात राज्य करणाऱ्या खमेर रूजचे दोन ज्येष्ठ नेते नरसंहारासाठी दोषी आढळले आहेत. कंबोडियाच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.
92 वर्षांचे न्यूऑन चिया हे खमेर रूज सरकारमध्ये विचारधारा प्रमुख होते आणि 87 वर्षीय के क्यू साम्पॉन हे माजी राष्ट्राध्यक्ष होते. या दोन्ही नेत्यांवर संयुक्त राष्ट्राच्या एका समितीने अंदाजे 20 लाख लोकांची हत्या केल्याचा आरोप लावला होता.
कंबोडियात खमेर रूज या संघटनेनी बंदुकीच्या धाकावर राज्य चालवलं होतं. त्यांच्या प्रशासन काळात व्हिएतनामी मुसलमानांची निवड करून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा आरोप त्या समितीनं केला होता.
हे दोन्ही नेते निकालाच्या आधीपासूनच तुरुंगात आहेत.
कोर्टाने खमेर रूज सरकारच्या तीन नेत्यांविरोधात खटला सुरू केला होता. कंबोडियाचे माजी परराष्ट्र मंत्री हे या खटल्यातील तिसरे आरोपी होते ते 87 वर्षांचे असताना त्यांचं 2013 साली निधन झालं होतं.
शुक्रवारी न्यायाधीश निल नून यांनी पीडितांसमोर हा निकाल वाचून दाखवला.
दोन्ही नेत्यांवर मानवतेविरोधात गुन्हा करणे, अत्याचार करणे, धार्मिक गुन्हे करणे, बलात्कार, बळजबरी लग्न लावणे आणि हत्येसाठी आदेश देणे हे आरोप होते. ते न्यायालयात सिद्ध झाले आहेत.
खमेर रूज ही कट्टर कम्युनिस्ट संघटना होती. 1975 ते 1979 या काळात त्यांनी कंबोडियावर राज्य केलं. मार्क्सवादी नेते पोल पॉट हे कंबोडियाला ग्रामीण युटोपिया बनवू इच्छित होते. त्यांनी लोकांना शहरातून उचलून खेड्यामध्ये स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं.
धनसंचय आणि वैयक्तिक संपत्ती जमा करण्यावर निर्बंध लादण्यात आले. राज्य निधर्मी राहील असं त्यांनी घोषित केलं होतं. मार्क्सवादी कंबोडियाला त्यावेळी कंपूचिया म्हटलं जात असे.
शून्य वर्षाची घोषणा
1970 मध्ये कट्टरवादी सैन्याच्या तुकडीने राजकुमार नॉरदोम सिंहानुक यांची सत्ता उलथवून टाकली आणि खमेर रूज या संघटनेनी राजकारणात येऊन जनतेच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू केले.
किमान पाच वर्षांच्या गृह युद्धानंतर खमेर रूजकडे कंबोडियाच्या बहुतांश भागाची सत्ता आली. 1975 साली खमेर रूजने कंबोडियाची राजधानी नाम पेन्हवर सत्ता मिळवली.
पोल पॉट हे बहुतांश काळ ईशान्य कंबोडियातील पर्वती भागात आदिवासी जनतेसोबत राहिले होते. आदिवासी आत्मनिर्भर होते आणि बौद्ध धर्मापासून दूर होते त्यांचा प्रभाव पोल पॉटवर होता. सत्ता हाती आल्यानंतर पोल पॉट यांनी शून्य वर्षाची घोषणा केली.
20 वर्षांचा संघर्ष
आपल्या नागरिकांना शहरातून हलवून खेड्यात जाण्यास त्यांनी भाग पाडलं. स्वतःला विचारवंत म्हणवून घेणाऱ्याला मारण्याची मोहीम उघडण्यात आली. चष्मा घालणाऱ्या किंवा विदेशी भाषा समजणाऱ्या व्यक्तीवर अत्याचार होत असत.
मध्यमवर्गातील लाखो शिकल्या सवरलेल्या लोकांना छळ केंद्रावर त्रास दिला जात असे किंवा त्यांची हत्या करण्यात आली.
नाम पेन्ह या ठिकाणी असलेलं एस-21 हे तुरुंग कुप्रसिद्ध होतं. या ठिकाणी खमेर रूजच्या शासनकाळात 17 हजार स्त्री, पुरुष आणि बालकांना कैद करून ठेवण्यात आलं होतं.
व्हिएतनामच्या सीमेवर झालेल्या मोठ्या युद्धानंतर 1979मध्ये खमेर रूजची सत्ता पालटली. पण खमेर रूजनं जंगलातून पुढची 20 वर्षं युद्ध सुरू ठेवलं. तेव्हा त्यांचा नेता पोल पॉटचा मृत्यू झाला नव्हता. या काळात अनेक लोक उपासमार, आजार, बेरोजगारी आणि मृत्युदंडामुळे मारले गेले.
1998मध्ये पोल पॉटचा मृत्यू झाला. त्याव्यतिरिक्त अनेक मोठ्या नेत्यांचा मृत्यू झाला. ज्या तीन नेत्यांवर खटला सुरू झाला तेव्हा 2007मध्ये ते तुरुंगातच होते.
द किलिंग फिल्डस
खमेर रूजच्या काळात अमेरिकन पत्रकार सिडनी शॉनबर्ग यांनी रिपोर्टिंग केलं होतं. नंतर 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. शॉनबर्ग यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या आयुष्यातील घटनांवर आधारित द किलिंग फिल्ड या सिनेमाला ऑस्कर मिळाला होता.
शॉनबर्ग यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, की कंबोडियात नरसंहारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 10 लाख सांगितली जाते पण हा आकडा 25 लाख असावा असं काही रिपोर्ट सूचित करतात.
त्या काळात कसे अत्याचार झाले यावर त्यांनी 1980मध्ये सविस्तर रिपोर्ट लिहिला होता. पुढे त्यांनी पुस्तकही लिहिलं होतं.
1975मध्ये शॉनबर्ग आणि त्यांचे साथीदार डिथ प्रान यांना न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकांनी सांगितलं, की देश सोडून परत या. पण त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. शॉनबर्ग आणि प्रान यांना खमेर रूजनं पकडलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रान यांनी खूप विनवणी केल्यावर त्यांना सोडण्यात आलं.
शॉनबर्ग यांच्या रिपोर्टिंगवर बनलेला चित्रपट 'द किलिंग फिल्डस्'ला आठ बाफ्टा आणि तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)