आरोग्य : भल्या पहाटे उठल्यावर आयुष्यात उजेड पडतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ब्रायन लुफकीन
- Role, बीबीसी फ्यूचर
अभिनेत्यांपासून ते सिलिकॉन व्हॅलीतील सीईओंपर्यंत, काही अतियशस्वी लोक हे दिवसात जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून अगदी भलत्या वेळी उठून दिवसाची सुरुवात करतात. तुम्हीसुद्धा असं करावं का?
'आपण आपल्या दिवसाची सुरुवात भल्या पहाटे अडीच वाजताच करतो,' असं मार्क व्हालबर्ग यांनी नुकतंच उघड केलं. मार्क व्हालबर्ग हे हॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेते आहेत. दोन वेळा ऑस्कर पुरस्कारांसाठी त्यांचं नामांकन झालेलं आहे.
भल्या पहाटे उठणं, मग 90 मिनिटांचा व्यायाम, गोल्फ, प्रार्थना आणि त्यानंतर शरीराला ताजेतवाने करण्यासाठी 'क्रायो चेंबर' (थंडगार बर्फात काही मिनिटं बसून राहणं) हे या अभिनेत्याचे दैनंदीन वेळापत्रक. पण रात्री ते 7.30 वाजता व्हालबर्ग आपल्या बिछान्यात असतात.
भल्या पहाटे दिवसाची सुरुवात करणारे व्हालबर्ग हे काही एकमेव सुप्रसिद्ध व्यक्ती नाहीत. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक हेसुद्धा भल्या पहाटे 3.45 वाजताच उठत असल्याचं सांगितलं जातं.
डिस्नेचे बॉस बॉब इगर यांचं व्यायामाचं वेळापत्रक पहाटे 4.25 चं असून, त्यातूनच सकाळी लवकर जिममध्ये जाण्यासाठी एनबीए खेळाडूंना प्रेरणा मिळाली असं म्हणतात.
'यशस्वी व्हायचे असेल, तर सकाळी लवकर उठा'
लिंक्डइनवर आणि एकूणच कॉर्पोरेट क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्यांच्या प्रोफाईलमध्ये बऱ्याचदा एक समान सूत्र पाहायला मिळतं. यशस्वी व्हायचं असेल, तर सकाळी लवकर उठा.
तर मग आता आपण सगळ्यांनीच डोळे चोळत चोळत अति लवकर उठावं का? भल्या पहाटे उठणं आपली कार्यक्षमता वाढवेल का? कदाचित. पण हे इतकं सोपं असणार नाही.
पण जर असं केलं तर आपल्या सूर्योदयापूर्वी उठण्याच्या या सवयीमुळेच आपण किती 'कार्यक्षम' आहोत, हे दाखवून लोकांना प्रभावित करण्याची एक सुप्त इच्छा नक्कीच पुर्ण होईल.
झोपच्या वेळापत्रकाचं गणित जुळवताना
पहाटे अडीच वाजता होणारी दिवसाची सुरुवात म्हणजे अत्यंत मोठा दिवस आणि झोपेचा जवळपास संपूर्ण अभाव, असं जरी वाटत असलं, तरी व्हालबर्ग यांची झोपण्याची वेळ पहाता त्यांना दर रात्री सात तासांची झोप मिळत असल्याचं लक्षात येतं.
कार्यक्षमतेच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे - कारण झोपेच्या अभावामुळे आरोग्य आणि आकलन क्षमतेवर प्रचंड वाईट परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठाचे ख्रिस्तोफर बार्न्स आणि मिशिगन विद्यापीठाचे ग्रेटचेन स्प्रायटझर या दोन संशोधकांनी या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना पुरेशी झोप मिळत आहे की नाही याची खात्री कंपन्यांनी करुन घ्यावी का, अशासारख्या गोष्टींचा त्यांनी यावेळी अभ्यास केला आहे.
स्प्रायटझर यांच्या मते, व्हालबर्गबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी आपली उठण्याची वेळ फक्त वेगळ्या (जरी अत्यंत लवकर) वेळी हलवली आहे, आणि ते प्रत्यक्षात कदाचित जास्त कार्यक्षम आहेत.
"त्याचे काही फायदेही आहेत. तुम्ही एक अशी शिस्त अंगी बाणवता, जेणेकरुन तुम्हाला स्वतःसाठी बराच वेळ मिळतो - कुटुंबिय उठण्यापूर्वी, किंवा तुम्हाला भेटण्याची इच्छा असलेले सहकारी येण्यापूर्वीच तुम्ही तुमचे स्वतःचे ध्येय गाठू शकता,"त्या सांगतात.
पण इतक्या लवकर झोपल्यामुळे त्यांना चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असे 'सामाजिक स्तरावरील संबंध आणि मजबूत सामाजिक नाती निर्माण करण्याच्या क्षमतेवर' पाणी सोडावे लागते.
"माझ्या अंदाजानुसार, जर तुम्ही रात्री साडेसात वाजताच झोपी जाणार असाल, तर डोळ्यावर झोप नसताना जेवणाच्या टेबलवर होणारा कौटुंबिक सुखसंवाद किंवा मित्रांबरोबर वेळ घालवणे यांसारख्या गोष्टींना तुम्ही मुकता, "त्या म्हणतात.
अतिशय लवकर उठण्याची सवय तुमच्या रक्तातच तर नसेल?
माणसं आणि त्यांच्या झोपेच्या सवयी या एका दैनिक चक्राबरहुकूम चालत असतात. त्याच्या शरीरात 24 तासांचं घड्याळ असतं, ज्यानुसार ठराविक अंतराने आपल्यामध्ये जागेची आणि झोपेची भावना चेतवली जाते. प्रत्येक दिवशी एका ठराविक वेळी उठण्या आणि झोपण्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो आणि त्यामुळेच टाईम झोन्स बदलल्यामुळे होणारा जेट लॅग हा आपल्या शरीरासाठी मोठा धक्का असतो.

फोटो स्रोत, Getty Images
या दैनिक चक्राच्या आधाराने संशोधक माणसांची दोन ढोबळ गटात विभागणी करतातः चंडोल (लवकर उठणारे आणि झोपणारे) आणि घुबड (उशीरा उठणारे आणि झोपणारे)
बार्न्स यांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये काही नैसर्गिक वेगळेपणे असते, पण बालपणी आपल्यापैकी अनेकजणांचा कल हा चंडोल असण्याकडे असतो, जो किशोरवयीन अवस्थेतेत घुबडाप्रमाणे होतो आणि जसजसे वय वाढत जाते, आपण पुन्हा एकदा चंडोल पक्षाप्रमाणे होताना दिसतो.
पण अति लवकर उठणारे मार्क व्हालबर्गसारखे लोक, जे नैसर्गिकरित्याच पहाटे २.३० ला जागे होतात, त्यांची संख्या अत्यंत दुर्मिळ असल्याचं बार्न्स यांना वाटतं.
"मानसिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्या, तुम्ही तुमच्या शरीरचक्राशी तुमचे वेळापत्रक जुळवून घेणे तुमच्यासाठी सर्वोत्तम असते," बार्न्स सांगतात.
आणि काही जण, जे अतिशय टोकाचं वेळापत्रक पाळत असतात आणि प्रत्येकाला त्याविषयी सांगत बसतात, त्यांचा कदाचित वेगळा उद्देश असू शकतो.
दुसऱ्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न
पण, काही लोकांना आपण आपला दिवस किती लवकर सुरु करतो याबाबत बढाई मारायला का आवडतं? कदाचित त्यातून आपण अतिशय कार्यक्षम असल्याचा भास निर्माण करणे हाच हेतू असू शकतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे, बऱ्याच संस्कृतींमध्ये 'लवकर निजे, लवकर उठे' या संप्रदायाच्या लोकांबद्दल जरा जास्त कौतुक असतं.
२०१४ मध्ये झालेल्या एका अभ्यासादरम्यान नोकरी करणाऱ्या १२० लोकांच्या झोपण्या-उठण्याच्या सवयींचे निरीक्षण करण्यात आलं होतं.
यामध्ये असं दिसून आलं की, कामाची सुरुवात दिवसा उशीरा करणाऱ्यांना त्यांच्या पर्यवेक्षकांकडून वाईट रेटींग्ज मिळाले होते. त्यांच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांची सद्सद्विवेक बुद्धी कमी होती. इतकंच नाही तर स्वतः घुबड गटात मोडणाऱ्या पर्यवेक्षकांनीचाही आपल्या स्वभावाविरूद्ध असणाऱ्या चंडोल गटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमी नकारात्मक होता.

फोटो स्रोत, Getty Images
"तुमच्या कामाच्या वेळापत्रकाचं मूल्यांकन करताना लोकांच्या मनात काही पूर्वग्रह असतो. जर तुम्ही तुमचा दिवस लवकर सुरु करत असाल, तर तुमच्याकडे अधिक अनुकूलपणे पाहीले जाते," बार्न्स सांगतात. " पण लवकर उठण्यातून तुम्ही काय सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात? लोकांवर छाप पाडण्याचा तुमचा प्रयत्न आहे का?"
सरतेशेवटी, तुमची काहीही इच्छा असली तरी तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकणं गरजेचे असतं. शरीराकडून मिळणारे संकेत ऐका आणि कधी विश्रांती घ्यायची ते समजून घ्या.
दिवसाची लवकर सुरुवात करुन तुम्ही कदाचित खरोखरीच जास्त कार्यक्षम बनालही, पण तरीही तुम्ही हे का करत आहात, ते स्वतः ला विचारा.
कारण काहीही असो, तुम्ही तुमच्या आरोग्यालाच नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. "जेव्हा तुमची उर्जा कमी असते आणि तुम्ही सर्वोत्तम काम करण्याच्या परिस्थितीत नसता, तेव्हा वाईट गोष्टी घडतातच," बार्न्स सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








