You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आफ्रिकेतल्या कॅमेरूनमध्ये 78 शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण
78 शालेय विद्यार्थी आणि तीन कर्मचारी असलेल्या एका शाळेच्या बसचं कॅमेरूनमध्ये अपहरण करण्यात आलं आहे.
पश्चिम प्रांतातलं मुख्य ठिकाण असलेल्या बामेंडामध्ये अडवण्यात आलेल्या या बसमध्ये शाळेचे प्राचार्य देखील असल्याचं असं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं. तर सर्व विद्यार्थी 10 ते 14 वयोगटातले आहेत.
कॅमेरून हा पश्चिम आफ्रिकेतला एक देश असून, ज्या प्रांतात ही घटना घडली, तो भाग नायजेरियाच्या सीमेला लागून आहे.
बामेंडाच्या प्रेसबायटेरिअन उच्च माध्यमिक शाळेतील अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनी घेतली नाही. पण या घटनेसाठी फुटीरतावादी सशस्त्र गटांना जबाबदार असल्याचा आरोप या प्रांताचे गव्हर्नर अॅडॉल्फ लेले ल'आफ्रिके यांनी ठेवला आहे.
गेल्या काही वर्षांत कॅमेरूनच्या वायव्य आणि नैऋत्य प्रांतात फुटीरतावादी गटांनी बंड सुरू आहे. कॅमेरूनचा दोन इंग्रजी भाषिक भागांमध्ये स्वांतत्र्यासाठी झगडणाऱ्या या बंडखोरांनी त्या भागातील शाळांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
प्रेसबायटेरिअन चर्चचे कॅमरून प्रवक्ते रेव्हरंड फोंकी सॅम्युअल फोर्बा यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांचं या अपहरणकर्त्या बंडखोरांशी बोलणं झालं आहे.
"बंडखोरांनी खंडणीची मागणी केली नाहीये तर त्यांनी फक्त शाळा बंद करण्याची मागणी केली आहे. आम्ही तसं आश्वासनही त्यांना दिलं आहे. आता आशा करतो की ते लवकरच मुलांना आणि कर्मचाऱ्यांना सोडतील," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
'अंबा बॉइज'?
या मुलांच्या शोधार्थ एक मोठी मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, काही अपहृत मुलांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ एका अपहरणकर्त्यानेच शूट केला, अशी शक्यता आहे.
एका लहानशा गजबजलेल्या खोलीत ही घाबरलेली मुलं बसलेली या व्हीडिओत दिसत आहेत. शूटिंग करणारी व्यक्ती या मुलांना कॅमेऱ्यात पाहून आपआपली नावं सांगायला लावत आहे.
"अँबा बॉईजनी काल रात्री शाळेतून आम्हाला उचलून आणलंय. आम्ही कुठे आहोत, आम्हाला माहिती नाही," असंही ही मुलं व्हीडिओत बोलतान दिसत आहेत.
अँबाझोनिया हे त्या प्रस्तावित देशाचं नाव आहे, जो फुटीरतावाद्यांना वेगळा हवा आहे. त्याचंच संक्षिप्त रूप म्हणजे अँबा.
जेव्हा हे बंडखोर शाळेत शरले तेव्हा एक विद्यार्थी पलंगाखाली लपून बसल्याने तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बचावला. तेव्हा तिथे काय घडलं हे त्याने बीबीसीला सांगितलं, "माझ्या एका मित्राला त्यांनी खूप मारलं. गप्प बसण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो. त्यांनी काही जणांना गोळ्या घालण्याचीही धमकी दिली. सगळ्या मोठ्या मुलांना त्यांनी गोळा केलं आणि घेऊन गेले. लहान मुलांना मात्र मागेच ठेवलं."
या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ऑफिसचं वर्णन करताना एका शिक्षिकेने सांगितलं की, "जेव्हा मदतीसाठी सैन्य आलं तेव्हा ते मुख्याध्यापकांच्या घरात गेले. तेव्हा कळलं की मुख्याध्यापकांच्या ऑफिसचं दार तोडून हे बंडखोर आत शिरले होते. त्यांनी बरीच तोडफोड केलेली दिसत होती. जमिनीवर फुटलेल्या काचांचा खच पडला होता."
अपहृत मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना
बीबीसीचे एनगाला किलिअन चिमटॉम सांगतात की शाळकरी मुलांच्या अपहरणाची ही या भागातली काही पहिली घटना नाही. याच वर्षी 19 ऑक्टोबरला अॅतियेला बायलिंग्वल हायस्कूलमधून पाच विद्यार्थ्यांचं अपहरण झालं होतं. त्यांचं अपहरण कुणी केलं किंवा ही मुलं कुठे आहेत, याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही.
वायव्य आणि नैऋत्य प्रांतात कॅमेरून सरकार इंग्लिश बोलणाऱ्यांची गळचेपी करते, असा या फुटीरतावाद्यांचा आरोप आहे.
कोण आहेत हे फुटीरतावादी?
कॅमेरूनची मुख्य भाषा फ्रेंच आहे, पण या देशात 20 टक्के लोक इंग्लिश बोलतात. देशाच्या नैऋत्य आणि वायव्य प्रांतात शाळांमध्ये आणि न्यायव्यवस्थेत इंग्लिशला दुय्यम स्थान दिलं जातं, असा आरोप इथल्या वकील आणि शिक्षकांचा आहे.
सरकार इंग्लिश भाषिकांची गळचेपी करते, असा ठपका ठेवत या वकील आणि शिक्षकांनी 2017मध्ये याविरोधात एक मोठं आंदोलन उभं केलं. पण सैन्याने हे आंदोलन योग्यरीत्या हाताळलं नाही आणि लोकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर झाला.
या घटनेचे पडसाद फुटीरतावादाच्या रूपात उमटले. तेव्हापासूनच हे फुटीरतावादी अँबाझोनिया नावाच्या स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत.
कॅमरूनचा इतिहास
1884मध्ये जर्मनीने कॅमेरूनमध्ये वसाहत थाटली. पण 1916मध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याने जर्मन लोकांना इथून पळवून लावलं.
यानंतर तीन वर्षांनी कॅमेरूनची अशी विभागणी झाली की एकीकडे 80 टक्के फ्रेंच लोक होते तर दुसरीकडे 20 टक्के ब्रिटिश.
त्यानंतर 1960 मध्ये फ्रान्सने त्यांच्या नियंत्रणाखालील वसाहतीला स्वातंत्र्य दिलं.
पुढे चालून झालेल्या एका जनमत चाचणीनंतर ब्रिटनच्या ताब्यातील दक्षिण कॅमेरून हा भाग स्वतंत्र कॅमरूनमध्ये सामील झाला तर उत्तर भागाचं इंग्लिश बोलणाऱ्या नायजेरियामध्ये विलीनीकरण झालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)