'...फुलराणी' : आफ्रिकेतल्या वाळवंटात सुरू आहे फुलांची रंगवर्षा

वसंत ऋतूमध्ये सृष्टीचं रूप मंत्रमुग्ध करणारं असतं हे निर्विवाद आहे. पण या ऋतूमध्ये दक्षिण फ्रिकेतील बिडो व्हॅली ज्या अनुपमेय सौंदर्यानं नटलेली असते त्या दृश्याला कशाची सर येणार नाही. एरवी खडकाळ असणारी ही व्हॅली जुलै ते सप्टेंबरच्या आगमनानंतर फुलानं बहरून जाते. जणू अवघ्या सृष्टीनं विविध रंगी फुलांची चादर अंथरली आहे की काय असा भास पाहणाऱ्याला होता.

अगदी काही आठवड्यांसाठी का होईना पण ही व्हॅली तिच्या सौंदर्याच्या शिखरावर असते. आफ्रिकेत वसंताचा हा सोहळा जुलै ते सप्टेंबरच्या रंगतो. हे तीन-चार महिने ही फुलझाडं इथं आनंदानं डोलतात पण पहिल्या उष्ण झुळूक आल्यावर आपले प्राण या सृष्टीला अर्पण करतात. नंतर त्या झाडाचं बी त्याच ठिकाणी जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहतं आणि पावसाची पहिली सर आल्यावर नवीन उन्मेषाने पुन्हा उगवतात.

फोटोग्राफर टॉमी ट्रेनचांर्ड यांनी निसर्गाची ही लीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्यांच्या पत्नीसोबत ते फिरायला गेले असता त्यांना ही फुलं दिसली.

'जेव्हा मी हे दृश्य पहिल्यांदा पाहिलं तेव्हा अगदी अविश्वसनीय वाटत होतं,' असं ते बीबीसीला म्हणाले.

"निसर्गाची ही किमया फक्त काही काळसाठीच आपल्याला दिसू शकते, या क्षणभंगुरतेमुळेच इथलं दृश्य अधिक वैशिष्टपूर्ण झालं आहे. बहुतेक पर्यटक दक्षिण अफ्रिकेत वन्य प्राणी पाहण्यासाठी येताना दिसतात. पण या व्हॅलीत आलेल्या या वन्य फुलांची सर कशालाच येणार नाही. असं मला वाटतं." असा अनुभव टॉमी यांनी सांगितला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)