मुंबईचा नकाशाः तुम्ही पेशव्यांनी तयार केलेला मुंबईचा नकाशा पाहिलाय?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईत भायखळ्यात जिजामाता उद्यान (राणीची बाग) तुम्हाला माहीत असेल. याच बागेच्या प्रवेशद्वाराजवळ डावीकडे इटालियन रेनेसाँ शैलीतली इमारत लक्ष वेधून घेते. हे आहे डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय. मुंबईतलं सर्वात जुनं आणि देशातलं तिसरं वस्तुसंग्रहालय. 1857मध्ये या संग्रहालयाचे दरवाजे जनतेसाठी उघडण्यात आले.

भाऊ दाजी लाड संग्रहालयात मुंबईच्या आजवरच्या प्रवासाच्या अनेक पाऊलखुणा पाहायला मिळतात. तेव्हाचं बाँबे आणि आताचं मुंबई शहर देशातलं आघाडीचं औद्योगिक केंद्र होतं.

जगभरातून मुंबईत येणाऱ्यांना इथल्या संपन्न संस्कृतीची आणि भारत देशाची ओळख व्हावी या उद्देशानंच संग्रहालयाची पायाभरणी झाली होती.

'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम' नावानं सुरुवातीला हे संग्रहालय ओळखलं जायचं.

1975मध्ये या संग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल उर्फ भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ त्याचं नाव या संग्रहालयास देण्यात आलं.

या संग्रहालयाचं 2008 मध्ये नूतनीकरण झालं. आज या संग्रहालयात मुंबईच्या जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे आणि माणसांची माहिती सांगणाऱ्या अनेक वस्तूंचा खजिना पाहायला मिळतो.

भाऊ दाजी लाड

भाऊ दाजी लाड (इ.स. 1822 - मे 31, इ.स. 1874) हे निष्णात डॉक्टर होते. इतिहास-संशोधक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबईचे पहिले भारतीय नगरपाल (शेरीफ) म्हणूनही या शहराच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

काय काय आहे या संग्रहालयात?

1. पेशव्यांच्या प्रतिनिधींनी तयार केलेला मुंबई परिसराचा नकाशा (1770)

अठराव्या शतकात, पेशवे माधवराव यांच्या काळात तयार करण्यात आलेला मुंबईचा नकाशा इथे आहे. हा नकाशा नेहमीच्या प्रमाणबद्ध नकाशांसारखा नाही, पण त्या काळातल्या साष्टी आणि मुंबई बेटांविषयी महत्त्वाची माहिती देतो.

2. वरळीचा विकास (1940)

वरळी आणि परिसराचे हे दोन नकाशे इथं विकास कसा होत गेला हे दाखवतात. पूर्वी वरळीच्या एका टोकाला केवळ कोळ्यांचीच वस्ती होती.

मग कापड गिरण्या आणि गिरणी कामगारांसीठी चाळी उभारण्यात आल्या. या सर्व काळात वरळी कसं बदललं ते या नकाशांतून स्पष्ट होतं.

3. मुंबईतल्या कलेचा नमुना

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधला सिरॅमिक potteryचा नमुना.

19व्या शतकाची अखेर आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात जे.जे. मध्ये तयार करण्यात आलेल्या अशा कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजण्यात आलं.

4. एसएस सायाम, मुंबई (1897)

एकोणिसाव्या शतकात लंडनहून पश्चिम आशिया आणि भारतामार्गे ऑस्ट्रेलिया असा प्रवास करणाऱ्या जहाजाचा नमुना.

1897मध्ये माझगाव डॉकमध्ये हे जहाज दुरूस्तीसाठी आलं होतं, तेव्हा दायल कानजी यांनी त्याचं मिनिएचर मॉडेल तयार केलं होतं.

5. ड्रेजर 'कूफूस' (1914)

समुद्राच्या तळातून गाळ काढणारं मोठं यंत्र अर्थात ड्रेजरचं हे मॉडेल बॉम्बे पोर्ट ट्रस्टनं 1914 मध्ये संग्रहालयाला दिलं होतं.

अशा प्रकारच्या ड्रेजरनी काढलेला गाळ मुंबईत ठिकठिकाणी भराव घालण्यासाठी वापरण्यात आला होता.

6. मुंबईचे मूळ निवासी

मुंबईचे मूळ रहिवासी असलेला कोळी समाज तसंच पाठारे प्रभू समाजाची वेशभूषा, संस्कृती दर्शवणारी टेराकोटा क्ले मॉडेल्स.

एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही मॉडेल्स तयार करण्यात आली होती.

7. जुन्या काळातले खेळ

19व्या आणि 20व्या शतकातील ग्रामीण जीवन तसंच त्या काळात खेळल्या जाणाऱ्या खेळांचं प्रतिबिंबही संग्रहालयात पाहायला मिळतं.

8. हस्तिदंती पेटी

मुंबई परिसरात अशा सुबक पेट्या तयार केल्या जात, ज्या युरोपात 'बाँबे बॉक्स' म्हणून प्रसिद्ध झाल्या.

संग्रहालयातल्या या पेटीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर मराठी वेशातल्या कालिका देवीचं चित्र आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)