You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओबामा आणि क्लिंटन यांच्या घरी कुणी पाठवल्या 'स्फोटक वस्तू'?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल आणि हिलरी क्लिंटन तसंच बराक ओबामा यांच्या घरी कुणीतरी स्फोटक वस्तू पाठल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिली आहे.
न्यूयॉर्क शहराच्या उपनगरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते जॉर्ज सोरोस यांच्या घरी बाँब पाठवल्याच्या दोनच दिवसांत ही घटना उजेडात आली आहे.
बिल क्लिंटन हे 1993 ते 2001 या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यात डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला होता.
क्लिंटन यांचं घर न्यूयॉर्क शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या चपाक्वा भागात आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार क्लिंटन यांच्या घरात येणाऱ्या पत्रांची छाननी करणाऱ्या तंत्रज्ञाला एक वस्तू पहिल्यांदा सापडली.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिलरी क्लिंटन यांना पहिलं संशयास्पद पाकिट 23 ऑक्टोबरला पाठवण्यात आलं होतं.
आज सकाळी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2018 ला बराक ओबामा यांच्या घरी दुसरं पाकिट पाठवण्यात आलं. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने ते लक्षात आणून दिल्याचंही गुप्तचर विभागाच्या या निवेदनात पुढे म्हटलं आहे.
"ही दोन्ही पाकिटं त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच लक्षात आलं. ज्यांच्यासाठी ही पाठवली होती त्यांना ती मिळालीही नाही आणि मिळण्याचा धोकाही नाही," असं या निवेदनात सांगितलं आहे.
FBIच्या मते त्यांना या संशयास्पद पाकिटांबद्दल कल्पना होती आणि ते पुढील माहिती घेत आहेत.
ओबामा यांच्या प्रवकत्यांनी या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यांनी पत्रकारांना गुप्तचर विभागाच्या निवेदन वाचायला सांगितलं.
याआधी जॉर्ज सोरोस यांच्या घरी अशीच स्फोटकं आढळली होती. सोरोस हे उदारमतवादी विचारांचे मानले जातात आणि त्यांच्या तशा कामांसाठी ते अनेकदा उजव्या विचारांच्या लोकांचे लक्ष्य ठरतात.
व्हाईट हाऊसच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलं की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्हाईट हाऊस या प्रकरणाला "अत्यंत गंभीरतेने" हाताळत आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी या घटनेचा निषेध केला आहे. "दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घटना घृणास्पद आहेत. जे कुणी यामागे असतील त्यांना चांगलाच धडा शिकवला जाईल," असं त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)