You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खाशोग्जींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल: सौदीचे युवराज
पत्रकार जमाल खशोग्जी यांच्या खुनासाठी जबाबदार प्रत्येकाला कठोर शिक्षा केली जाईल, असं सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान म्हणाले.
एका व्यापारी संमेलनात बोलताना ते म्हणाले की "हा गुन्हा सगळ्या सौदींसाठी अत्यंत दु:खद घटना आहे. त्यामुळे टर्कीसोबत निर्माण झालेला दुरावा भरून काढू."
जमाल खाशोग्जी हे 2 ऑक्टोबर रोजी टर्कीची राजधानी इस्तंबुलच्या सौदी अरेबियाच्या दूतावासातून बेपत्ता झाले होते. आधी दोन आठवडे त्यांच्या ठावठिकाणा माहीत नसल्याचं सांगणाऱ्या सौदीवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत गेला.
त्यामुळे अखेर सौदीने हे मान्य केलं की खाशोग्जी यांची हत्या त्याच दिवशी वकिलातीत झाली होती.
युवराज काय म्हणाले?
"या दुर्दैवी क्षणी अनेक जण संधीचा फायदा घेत सौदी अरेबिया आणि टर्कीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही असं कधीच करू शकणार नाही. टर्की आणि सौदीमध्ये कधीही दुरावा राहणार नाही," असं युवराज सलमान म्हणाले.
युवराज सलमान हे Future Investment Initiative या गुंतवणूक परिषदेत बोलत होते. सौदी अरेबियात सुरू असलेल्या या गुंतवणूक परिषदेवरही या खुनाची छाया पसरली आहे.
सौदीच्या व्यापार संबंधांसाठी अतिमहत्त्वाच्या या संमेलनावर खाशोग्जी खून प्रकरणानंतर अनेक मोठ्या देशाच्या प्रतिनिधींनी बहिष्कार टाकला आहे.
या प्रकरणांनंतर मंगळवारी युवराज सलमान प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसले पण ते फार काही बोलले नाहीत. त्यांनी वडील राजे सलमान यांच्याबरोबर खाशोग्जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
आंतरराष्ट्रीय बहिष्कार
हा खून पूर्वनियोजित होता, असा दावा टर्कीने केल्यानंतर अमेरिकेने खाशोग्जी यांच्या खुन्यांना अद्दल घडवू, असा इशारा दिला आहे. सौदी अरेबियानं हे प्रकरण दडपण्यासाठी केलेला प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे. हा कट ज्यांनी रचला ते संकटात असतील, असंही ट्रंप म्हणाले आहेत.
तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी या प्रकराणातील 21 संशयितांचा व्हिसा रद्द केला असून जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होईल, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष आणि मी स्वतः या परिस्थितीबद्दल नाराज आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं काही सौदी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा खून कसा झाला याचं वृत्त दिलं आहे. खुनानंतर त्यांचा मृतदेह गोधडीत गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी एका व्यक्तीकडे सोपवण्यात आला, असं या वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेचे नागरिक असलेले आणि वॉशिंग्टन टाइम्सचे स्तंभलेखक असलेले खाशोग्जी यांच्या खुनासंदर्भात सौदी अरेबियाने दिलेली माहिती आणि टर्कीचा दावा परस्परविरोधी होता. सुरुवातीला खाशोग्जी यांचा खून झालेला नाही, असा दावा करणाऱ्या सौदी अरेबियाने नंतर टर्कीच्या दूतावासात झालेल्या मारामारीत खाशोग्जी यांचा खून झाला, असा खुलासा केला होता.
सौदीचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी केलेला खुलासा मान्य करणार का, असा प्रश्न पाँपेओ यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "आमचे लोक जगभर विखुरलेले आहेत. आम्ही आमची माहिती जमवू आणि त्यातून वस्तुस्थिती समजून घेवू."
सौदी अरेबियाच्या धोरणांचे टीकाकार असलेल्या खाशोग्जी यांच्या खुनाचा अनेक देशांनी निषेध केला असून या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिवाय ट्रंप यांनी CIAच्या संचालकांना या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी टर्कीला पाठवले आहे.
सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी मंगळवारी कॅबिनेटची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी खाशोग्जी खून प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल, असं म्हटलं आहे. दुसरीकडे सौदीच्या राजकुमारांनी खाशोग्जी यांच्या कुटुंबीयांची रियाधमध्ये भेट घेतली अशी बातमी सौदीच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.
रविवारी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अदेल अल जुबेर यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना या खुनात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाचा कसलाही सहभाग नसल्याचं म्हटलं होतं.
"ही फार मोठी चूक आहे आणि त्यानंतर हे प्रकरण दडपून टाकण्याचा झालेला प्रकार तर यापेक्षाही भयंकर आहे," असं ते म्हणाले होते.
तर एका सौदी अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीत असं म्हटलं आहे की, "खाशोग्जी यांना सौदी अरेबियात परत पाठवण्याचा प्रयत्न सुरू होता या झटापटीत त्यांचा गळा दाबण्यात आला आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह एका गोधडीत गुंडाळून विल्हेवाट लावण्याचं काम एकाकडे देण्यात आलं. या घटनेनंतर सौदी अरेबियाच्या राजकुमारांच्या दोघा सहकाऱ्यांना कामावरून हटवण्यात आलं आहे आणि गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी समितीही स्थापण्यात आली आहे."
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, "खाशोग्जी यांना प्रश्न विचारली जात असताना राजकुमारांचा हा सहकारी स्काईपवर आला. दोघांनी खाशोग्जी यांचा अपमान केल्यानंतर सौद-अल-कहातनी याने, "या कुत्र्याचं डोक मला हवं आहे," अशी सूचना दिल्याचं सांगितलं जातं.
टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी या स्काईपचं ध्वनिमुद्रण असल्याचं म्हटलं आहे, पण ही क्लिप अमेरिकेला द्यायला त्यांनी नकार दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)