पत्रकार जमाल खाशोग्जी यांची हत्या पूर्वनियोजित होती - टर्कीचे राष्ट्राध्यक्ष

पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्या पूर्वनियोजित होती, असा दावा टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. खाशोग्जी यांचा मृतदेह कुठे आहे, याचं उत्तर सौदी अरेबियाने द्यावं, अशी मागणी रेसीप तय्यप एरडोगन यांनी केली.

मंगळवारी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांसमोर बोलताना एरडोगन म्हणाले, "खाशोग्जी यांच्या हत्येचे ठोस पुरावे टर्कीकडे आहेत. इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासामध्ये 2 ऑक्टोबरला त्यांचा खून झाला होता."

एरडोगन यांनी सांगितलं की खाशोग्जी यांच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी आणि तासांपूर्वी 15 जण सौदीहून तीन गटात इस्तंबूलमध्ये वेगवेगळ्या विमानाने आले होते. या प्रकरणी सौदी अरेबियात 18 लोकांना अटक करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

त्या सर्व 18 लोकांवर इस्तंबूलमध्ये खटला चालावा. ज्यांचाही यात सहभाग होता, त्यांना शिक्षा मिळावी, अशी मागणी एरडोगन यांनी केली.

पण टर्कीने आधी दावा केल्याप्रमाणे या घटनेच्या व्हीडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही.

2 ऑक्टोबर रोजी तुर्कीच्या इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात खाशोग्जी गेले आणि परत आलेच नाही. ते इथून सुखरूप बाहेर पडले, असं सौदी अरेबियानं दोन आठवडे म्हटलं. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांनी मान्य केलं की खाशोग्जी यांचा एका मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

सोमवारी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदल अल झुबेर यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं की "खाशोग्जी यांची हत्या एका अनियंत्रित एजंटने केली. ही मोठी चूक झाली, पण यामध्ये युवराज मोहम्मद बिन सलमान यांची काही भूमिका नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)