You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खाशोग्जींचं गूढ : डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्र्यांना सौदीला पाठवलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ यांना सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पाठवलं आहे. इस्तंबूल येथील दूतावासातून सौदीचे पत्रकार जमाल खाशोग्जी हे बपत्ता झाल्यानंतर उद्भवलेल्या आंतरराष्ट्रीय वादाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
पाँपेओ सौदी राजे किंग सलमान यांची भेट घेणार आहेत.
सौदी सरकारच्या ध्येयधोरणांचे टीकाकार राहिलेले जमाल खाशोज्गी 2 ऑक्टोबर रोजी इस्तंबूलमधल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात शिरताना शेवटचे दिसले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहे.
त्यांना सौदीच्या काही लोकांनी मारलं असावं, असा आरोप टर्कीच्या अधिकाऱ्यांनी केला. परंतु सौदी प्रशासनाने या आरोपांचं खंडन केलं आहे.
खाशोग्जींच्या गायब होण्यामागे पैसे घेऊन हत्या करणाऱ्यांचा हात असावा, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं. मात्र याला दुजोरा देणारा कुठलाही पुरावा त्यांनी दिला नाही.
खाशोग्जी यांचं काय झालं, याबाबत राजे सलमान यांना काहीही माहिती नसल्याचं ट्रंप यांनी सांगितलं. म्हणूनच पाँपेओ यांना सौदीला पाठवत असल्याचं ट्रंप यांनी स्पष्ट केलं.
"खाशोग्जी यांच्याबाबत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सौदीच्या राजेंना याप्रकरणाबाबत काहीच माहिती नाही. त्यांना खरंच माहिती नसेल किंवा त्यांच्या डोक्यात दुसरं काही सुरू आहे, यात मला स्वारस्य नाही," असंही ट्रंप पुढे म्हणाले.
दरम्यान, चौकशीदरम्यान खाशोग्जी यांचा मृत्यू झाला, अशी घोषणा करण्यासाठी सौदी अरेबिया तयारी करत असल्याच्या काही बातम्या अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. त्यांचं अपहरण करण्याची योजना होती, असंही या बातम्यांमध्ये म्हटलं आहे.
आमचे अधिकारी दूतावासाची कसून तपासणी करत आहेत, असं टर्कीने स्पष्ट केलं. खाशोग्जी यांच्या कथित हत्येसाठी पुरावे गोळा करत असल्याचं टर्कीचं म्हणणं आहे. आपल्याकडे या घटनेचं रेकॉर्डिंग आहे, ज्यात त्यांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याचा पुरावा आहे, असा टर्कीचा दावा आहे.
मात्र तपास अधिकारी दूतावासात जाण्यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना आत जाताना पाहिल्याचं इस्तंबूलमधील पत्रकारांनी सांगितलं.
याप्रकरणी विश्वासार्ह तपास व्हायला हवा, असं निवेदन UK, फ्रान्स आणि जर्मनीने केलं आहे.
युरोपियन संघाच्या फ्रेड्रिका मोघेरिनी म्हणाले, "आम्हाला पारदर्शक तपास यंत्रणा आवश्यक आहे. यावर सगळ्या देशांचं एकमत आहे. सौदी आणि टर्की यांनी प्रकरणाची संयुक्तपणे सखोल चौकशी करावी, या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय संघाचं एकमत आहे.".
हे पाहिलंत का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)