You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमाल खाशोग्जी: ओसामा बिन लादेनची मुलाखत घेणारा पत्रकार
2 ऑक्टोबर रोजी लग्नाबद्दलची कागदपत्रं आणण्यासाठी इंस्तंबूल येथे असलेल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात गेलेले पत्रकार जमाल खाशोग्जी परतलेच नाही.
सुरुवातीला ते बपत्ता असल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांचा कसून शोध घेतला जाऊ लागला. मात्र नंतर त्यांची हत्या झाल्याचा दाट संशय जिथे हा दूतावास आहे, त्या टर्कीच्या सरकारने व्यक्त केला होता.
त्यानंतर झालेल्या तपासाअंती सौदीच्या काही एजंट्सनी त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह अॅसिडमध्ये टाकून संपवल्याचा खुलासा टर्कीच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
त्या हत्येच्या साधारण 14 महिन्यांनी सौदी अरेबियाच्या एका कोर्टाने पाच जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
त्यांची हत्या का झाली असावी? त्यांची पत्रकारिता, त्यांचं सौदी सरकारविरोधात उभं राहणं, सरकारच्या धोरणांवर टीका करणं त्यांना भोवलं का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मृत्यूनंतर उपस्थित झाले होते.
त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यास ते, त्यांची पत्रकारिता आणि व्यक्तिमत्त्व कसं होतं, हे आपल्या लक्षात येऊ शकते.
खाशोग्जी यांची कारकीर्द
- जमाल खाशोग्जी यांचा जन्म मेडिना येथे 1958 मध्ये झाला. अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीतून ते MBA झाले.
- त्यानंतर ते सौदी अरेबियात परतले आणि 1980 च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता करायला सुरुवात केली. सौदी अरेबियात चालणाऱ्या संघर्षाचं त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रातून वार्तांकन केलं.
- ओसामा बिन लादेन यांच्याबद्दलच्या बातम्या करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी 1980 ते 1990 या काळात त्यांनी अनेकदा ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती.
- मध्य आशियातल्या महत्त्वांच्या घडामोडीचं त्यांनी वार्तांकन केलं होतं. कुवैतमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचं रिपोर्टिंग त्यांनी केलं आणि 1990 मध्ये ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे डेप्युटी एडिटर बनले.
- 2003मध्ये ते अल वतन या वर्तमानपत्राचे संपादक झाले. मात्र दोनच महिन्यात सौदीच्या प्रशासनाविरोधात टीका केल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं.
- त्यानंतर लंडनला गेले तिथून ते वॉशिंग्टनला गेले आणि सौदी अरेबियाचे माजी गुप्तचर विभागाचे प्रमुक प्रिन्स तुर्की बिन फैसल यांचे सल्लागार झाले.
- 2007 मध्ये ते अल-वतनला परतले.
- 2011 मध्ये अरब देशांत उठाव झाल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.
- 2012मध्ये अल-अरब या येऊ घातलेल्या वृत्तवाहिनीचा प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. ही वाहिनी अल जजिरा या वाहिनीची प्रतिस्पर्धी ठरेल असं म्हटलं जात होतं.
- 2015 मध्ये बहरीनमध्ये ही वृत्तवाहिनी लाँच झाल्यानंतर 24 तासांच्या आतच प्रक्षेपण बंद झालं. कारण त्यांनी बहारीनच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
- सौदी अरेबिया या विषयाचे तज्ज्ञ म्हणून खाशोज्गी यांना अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्यांमध्ये पॅनेलिस्ट म्हणून निमंत्रित केलं जात असे.
- 2017मध्ये सौदी अरेबिया सोडून ते अमेरिकेला गेले. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रात त्यांनी सप्टेंबरमध्ये स्तंभलेखनास सुरुवात केली.
मोहम्मद बिन सलमान यांना विरोध
अटक होण्याच्या भीतीने मी तसेच माझ्या अनेक सहकाऱ्यांना विजनवासात जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
मोहम्मद बिन सलमान यांनी देशात अनेक आर्थिक आणि सामाजिक सुधारणांचं धोरण अवलंबलं होतं. त्यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्या लोकांना अटक होत असल्याचं त्यांचं मत होतं.
सौदी अरेबिया सरकारविरोधात भूमिका मांडल्यामुळे त्यांना अनेकदा सरकारच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची उदाहरणं आहेत. ते अल हयातमध्ये त्यांचा स्तंभ येत असे. हा स्तंभ बंद करण्यात आला. हा स्तंभ बंद करण्यासाठी सौदी सरकारनं प्रकाशकांवर दबाव टाकला असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.
इतकंच नव्हे तर सौदी अरेबिया आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या वाढत्या जवळकीवर त्यांनी टीका केल्यामुळे आपल्याला ट्वीट करण्यावर बंदी घालण्यात आली होती असं देखील ते म्हणाले होते.
"मी माझं घर, माझं कुटुंब आणि माझी नोकरी सोडली आणि आता मी त्यांच्याविरोधात आवाज उठवतोय. असं केलं नाही तर जे तुरुंगात आहे त्यांची फसवणूक केल्यासारखं आहे. ज्यावेळी अनेक जण गप्प बसताना दिसत आहेत तेव्हा मी बोलतोय. सौदी अरेबिया पूर्वीपासूनच असं नव्हतं. एक सौदी अरेबियन म्हणून मला वाटतं चांगल्या स्थितीची अपेक्षा ठेवणं हा आमचा हक्क आहे," असं ते म्हणत.
सौदी सरकारनं जहालवाद्यांविरोधात मोहीम उघडली होती. पण काही अतिजहालवाद्यांना सरकारनं पाठीशी घातल्याची टीका त्यांनी केली.
सौदीच्या राजाची तुलना त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामिदीर पुतीन यांच्याशी केली होती.
खाशोग्जी यांचा शेवटचा लेख 11 सप्टेंबरला प्रकाशित झाला. शुक्रवारी ते बेपत्ता झाले आणि ते सांगण्यासाठी वॉशिंग्टन पोस्टने त्यांच्या स्तंभाच्या जागी कोरी जागा सोडली. त्यांनी शेवटच्या लेखात येमेन संघर्षातील सौदीच्या सहभागावरून टीका केली होती.
मी त्यांची वाट पाहतच राहिले...
2 ऑक्टोबरला तुर्कीतील सौदीच्या दूतावासात ते त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रं घ्यायला गेले होते. एका तुर्की स्त्रीशी विवाह करता यावा म्हणून त्यांना घटस्फोट हवा होता. त्यांच्या वाग्दत वधू हतीस सेगिस म्हणाल्या की तिने त्यांची बराच वेळ वाट पाहिली. मात्र ते बाहेर आले नाहीत.
त्या म्हणाल्या की खाशोग्जी यांना इमारतीत प्रवेश करताना मोबाईल बाहेर ठेवायचा होता. मी जर बाहेर आलो नाही तर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तेय्यप एर्डोगन यांना संपर्क करायला सांगितलं.
शेवटच्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले?
बेपत्ता होण्याच्या तीन दिवस आधी बीबीसीच्या 'न्यूज अवर' या कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली होती. फोनवर झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, "मला माझ्या देशात परत जाता येईल असं वाटत नाही."
"ज्या लोकांना अटक होतेय ते फक्त धोरणाला विरोध म्हणून विरोध करणारे नसतात तर त्यांच्याकडे स्वतंत्र डोकं असतं. मी स्वत:ला विरोधक मानत नाही. मी नेहमी असं म्हणतो की मी फक्त लेखक आहे. माझ्या मनातलं सांगण्यासाठी मला मोकळं वातावरण हवं आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये मी तेच करतो."
"मला लिहिण्यासाठी ते एक व्यासपीठ देतात. माझ्या देशातसुद्धा मला असं स्वातंत्र्य मिळावं अशी माझी इच्छा होती."
सौदीत सुधारणा आणण्याच्या निर्णयावरसुद्धा त्यांनी टीका केली होती. "ज्या सुधारणा होत आहे त्यांच्याबद्दल काहीही चर्चा झाली नाही. काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी युवराज नवीन प्रकल्पांची घोषणा करतात, त्यांची माहिती आम्हाला देतात. या प्रकल्पांची चर्चा संसदेत, वर्तमानपत्रात झालेली झालेली नसते. लोक फक्त टाळ्या वाजवून प्रतिसाद देतात. असं चालत नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)