खाशोग्जी प्रकरणातलं गूढ वाढवतंय सौदी युवराज सलमान यांच्यासमोरील अडचणी

    • Author, फ्रँक गार्डनर
    • Role, बीबीसी संरक्षण प्रतिनिधी

डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर सर्वात पहिला परदेश दौरा केला तो सौदी अरेबियाचा. त्यामुळे अर्थातच सौदीच्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.

गेल्यावर्षी मेमध्ये ट्रंप त्यांच्या एअर फोर्स वन या विमानाने रियाधमध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पश्चिम आशियासंबंधीच्या धोरणाला पूर्णपणे बगल दिली होती. ओबामा यांनी इराणसोबत अणुकरार करून चूक केल्याचं ट्रंप यांना नेहमीच वाटत होतं.

डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या परदेश धोरणात पश्चिम आशियाला सर्वोच्च स्थान दिलं आहे. येमेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने बराक ओबामा यांनी शस्त्रास्त्र खरेदीवर बंदी लादली होती. ट्रंप यांनी ही बंदी उठवली.

मानवाधिकारांबाबत उपदेश करण्यापासूनही ट्रंप यांनी अंतर राखलं. याबदल्यात सौदी युवराज मोहम्मद बिन-सलमान यांनीही व्हाईट हाऊस, अमेरिकेची गुप्तचर संस्था, पेंटॅगॉन आणि हॉलीवूडचा दौरा केला. याशिवाय लंडनमध्येही त्यांचं स्वागत झालं. मात्र त्यावेळी युद्धविरोधी निदर्शनांचा सामना त्यांना करावा लागला.

दुसरीकडे सौदी अरेबियाही आधुनिकतेची कास धरत काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. ज्यात महिलांना गाडी चालविण्याचा अधिकार देण्यात आला. मनोरंजनासाठीचे नियम शिथिल करण्यात आले आणि धार्मिक बाबतीत लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे काही अधिकारही काढून घेण्यात आले.

यादरम्यान सौदीने एका महत्त्वाकांक्षी योजनेचीही घोषणा केली. या योजनेअंतर्गत सौदीच्या उत्पन्नाचं मुख्य स्रोत असलेल्या तेलाव्यतिरिक्त वेगळ्या स्रोताची पायाभरणी करण्यात येणार आहे. वाळवंटात पाचशे अब्ज डॉलर खर्चून भविष्यातल्या शहराची निर्मिती करण्यात येणार आहे.

तेलावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सौदीमध्ये गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात जगभरातील देशांनी सहभाग घेतला.

सौदी अरेबियामध्ये बरंच काही बदलत आहे. मात्र हे सर्व होत असतानाच अनेक घटना अशाही घडत आहेत ज्या युवराज मोहम्मद-बिन सलमान हे एक उदारमतवादी सुधारक असू शकत नाही, असेच संकेत देत आहेत.

त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अनेक प्रिन्स आणि व्यापाऱ्यांना एका आलिशान हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवल्याची घटनाही याचंच एक उदाहरण.

इतकंच नव्हे तर त्यांनी लेबेनॉनचे पंतप्रधान साद हरिरी यांच्याकडेही राजीनाम्याची मागणी करून त्यांना काही काळ नजरकैदेत ठेवल्याचं बोललं जातं आहे.

त्यांच्या सुधारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. या सुधारणांविरोधात कोणी ट्वीट केलं तरी त्यालाही तुरुंगात टाकण्याचे आदेश आहेत.

सौदीमधले ख्यातनाम पत्रकार जमाल खाशोग्जी तुर्कीतल्या अंकारास्थित सौदीच्या वाणिज्य दूतावासातून 2 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहेत. ते दूतावासातून जिवंत बाहेर पडले होते, याचे ठोस पुरावे अजून सापडलेले नाहीत. त्यांचा खून झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खाशोग्जी एकेकाळी सौदी राजघराण्याच्या खूप जवळचे होते. मात्र काही राजकीय धोरणामुळे ते राजघराण्याच्या विरोधात गेले आणि त्यानंतर राजघराण्याचे सर्वात मोठे टीकाकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं.

या मुद्द्यावरून जगभरात युवराज सलमान यांच्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सौदीचे हितचिंतक डोनाल्ड ट्रंप यांनही म्हटलं आहे की या प्रकरणात सौदीची चूक आढळल्यास त्यांना 'कठोर शिक्षा' मिळायला हवी.

दुसरीकडे सौदीचं म्हणणं आहे की, खाशोग्जी दूतावासातून तत्काळ बाहेर पडले होते.

अमेरिका आणि सौदी यांचे आपापसात हितसंबंध जोडलेले आहेत. दोन्ही देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सचा शस्त्रास्त्र करार झाला आहे.

पत्रकार खाशोग्जी प्रकरण म्हणजे कतार आणि तुर्की यांनी सौदीला बदनाम करण्यासाठी आखलेला कट होता, अशा अफवा पसरवल्या जात आहेत.

मात्र 33 वर्षांचे युवराज सलमान ज्यांच्याकडे सौदीचे दूरदर्शी उद्धारकर्ते म्हणून बघितलं जात होते, ते अजूनही तसेच आहेत का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सौदी अरेबिया येमेनमध्ये सुरू असलेल्या एका अनावश्यक युद्धातही सहभागी आहे. शेजारी कतारसोबत त्यांचा टोकाचा वाद आहे. कतार दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचा सौदी अरेबियाचा आरोप आहे. त्यामुळे इतर आखाती देशांना सोबत घेऊन कतारला नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न सौदीकडून सुरू आहेत. मात्र त्यामुळे सौदीचंच नुकसान होऊ शकतं.

युवराज सलमान यांनी अनेकांना आलिशान हॉटेलमध्ये बंद करूनसुद्धा कॅनडाशी मानवाधिकारावरून भांडण उकरून काढलं आहे.

अशा सर्व परिस्थितीत आपल्या परंपरावादी धोरणांमुळे सौदीच्या समस्या वाढू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)