You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमाल खाशोग्जी मृत्यूबद्दलची सगळी माहिती समोर आणू: सौदीच्या कबुलीनंतर टर्कीचं वचन
दोन आठवड्यांच्या नकारानंतर अखेर पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा मृत्यू झाला असल्याचं सौदी अरेबियानं मान्य केलं आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी टीव्हीनं त्यांच्या हत्येच्या बातमीस दुजोरा दिला आहे.
सरकारी टीव्हीनं प्राथमिक चौकशीचा हवाला देत म्हटलं आहे की, खाशोग्जी यांचा टर्कीतल्या इस्तंबूल येथील दूतावासात एका संघर्षादरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी गुप्तवार्ता विभागाचे उपप्रमुख अहमद अल असीरी आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे वरिष्ठ सहकारी साउद अल कथानी यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.
या प्रकरणाशी संबंधित 18 सौदी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
सौदीच्या या कबुलीजबाबानंतर टर्कीने आपण खाशोग्जी प्रकरणाविषयी सगळंकाही उघड करू, असं म्हटलं आहे. "टर्की कधीच कुठल्याही प्रकरणात अशी सारवासारव होऊ देणार नाही," असं सत्ताधारी पक्षाच्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे.
पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा मृत्यू झाला आहे, असं सौदी अरेबियानं प्रथमच मान्य केलं आहे.
खाशोग्जी हे सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे टीकाकार होते. गेल्या वर्षापासून ते अमेरिकेत राहत होते.
ते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करायचे. 2 ऑक्टोबरला त्यांना इस्तंबूलमध्ये शेवटचं पाहण्यात आलं होतं. मैत्रिणीबरोबर त्यांचं लग्न ठरलं होतं. त्याविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ते सौदी अरेबियाच्या दूतावासात गेले होते.
बातम्यांनुसार, सौदी अरेबियाच्या शाह सलमान यांनी गुप्तचर विभागाच्या पुनर्गठनासाठी युवराज सलमान यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची समिती नेमण्याचा आदेश दिला आहे.
शाह सलमान यांनी टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रचेप तैय्यप अर्दोआन यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर सरकारी मीडियात यासंबंधीची माहिती जाहीर करण्यात आली.
"या दोघांनी एकमेकांकडील माहितीची देवाणघेवाण केली आणि चौकशीत सहकार्य करण्यासाठी कायम ठेवण्याचं जाहीर करण्यात आलं आहे," असं टर्की राष्ट्राध्यक्षांशी संबंधित सूत्रांनी सांगितलं.
खाशोग्जी यांच्या मृतदेहाचा शोध टर्की पोलीस घेत आहेत. खाशोग्जी यांचा मृतदेहाची जवळच्याच जंगलात विल्हेवाट लावण्यात आली असावी, अशी शंका काही अधिकाऱ्यांनी वाटते आहे.
खाशोग्जी कोण होते?
खाशोग्जी यांचा जन्म 1958मध्ये मदीना येथे झाला होता. अमेरिकेतल्या इंडियाना स्टेट विश्वविद्यालयात त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण पूर्ण केलं.
1980ला सौदीत परतल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. एका स्थानिक वृत्तपत्रासाठी ते अफगाणिस्तावरील सोव्हिएतच्या आक्रमणाच्या बातम्या कव्हर करत होते.
यादरम्यान त्यांनी अल्-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचीही भेट घेतली होती. 1980 ते 1990च्या दशकात त्यांनी अनेकदा ओसामा यांची मुलाखत घेतली.
टर्कीकडे पुरावे?
सौदी अरेबियातील पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात खून झाला आहे, हे सिद्ध करणारे सबळ पुरावे द्यावेत अशी सूचना अमेरिकेने टर्कीला केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, जर पुरावे असतील तर ते सादर करावेत.
आज सौदीच्या कबुलीजबाबानंतर टर्कीच्या सत्ताधारी AKP पार्टीचे प्रवक्ते ओमर सलिक म्हणाले, "जे काही झालं, आम्ही सर्वकाही समोर आणू. कुणालाही कुठलाही संशय राहता कामा नये."
अनाडोलू वृत्तसंस्थेनुसार सलिक म्हणाले, "आम्ही कुणावरही आत्ताच आरोप करत नाही आहोत, पण जे काही झालं, आम्ही ते दबू देणार नाही. सगळंकाही बाहेर येईल."
2 ऑक्टोबरला काय घडलं?
खाशोग्जी अमेरिकेचे नागरिक असून ते वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी सौदी युवराजांच्या धोरणांवर टीका करू नये, असे कथितरीत्या धमकावल्यानंतर गेले एक वर्षभर ते अज्ञातवासात होते.
टर्कीतील एका महिलेशी ते लग्न करणार होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रं घेण्यासाठी ते दूतावासात गेले होते.
सौदी अधिकारी यांचं म्हणणं होतं की, खाशोग्जी दूतावासातून बाहेर पडले त्यावेळी त्यांना कसलीही इजा झालेली नव्हती.
पण टर्कीच्या अधिकाऱ्यांना असं वाटतं की, दूतावासातील इमारतीमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. सौदीच्या एजंटांनी त्यांना मारल्याचा संशय आहे. काही माध्यमांनी सौदीचे एजंट टर्कीत येताना आणि बाहेर पडतानाचे व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)