फेसबुकवर सायबर हल्ला : 5 कोटी युजर्सची सुरक्षा धोक्यात

फोटो स्रोत, Reuters
- Author, डेव्ह ली
- Role, बीबीसी प्रतिनिधी (तंत्रज्ञान), अमेरिका
फेसबुकच्या सुरक्षेसंदर्भातील उणिवांचा फटका जवळपास 5 कोटी युजर्सना बसला आहे. हा सायबर हल्ला करणाऱ्यांनी फेसबुकवरील View As या फिचरमधील उणिवांचा वापर करून जवळपास 5 कोटी युजर्सच्या अकाऊंटचा ताबा घेतला असं कंपनीनं म्हटलं आहे. यामध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांच्या अकाऊंटचाही सहभाग आहे.
मंगळवारी हा प्रकार उघडकीला आला. या संदर्भात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
सायबर हल्ला प्रकरणातील युजर्सचे अकाऊंट पुन्हा रीलॉग करण्यात आले आहेत.
कंपनीच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाचे उपाध्यक्ष गय रोसेन म्हणाले, "या फिचरमधील उणिवा दुरुस्त करण्यात आल्या आहेत. जे अकाऊंट प्रभावित झाले होते ते रिसेट केले आहेत. शिवाय उपाययोजना म्हणून इतर 4 कोटी अकाऊंटही रिसेट करण्यात आले आहेत."
शुक्रवारी फेसबुकच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली.
ज्या प्लॅटफॉर्मवर फेसबुकच्या मदतीने लॉग इन करता येतं त्यांचा ही अॅक्सेस या हॅकर्स घेऊ शकतात, असं फेसबुकने म्हटलं आहे.
कुणाला बसला फटका?
जगभरात याचा फटका 5 कोटी युजर्सना बसला आहे, पण देशनिहाय आकडेवारी उपलब्ध नसल्याचे फेसबुकने आयर्लंडमधील डेटा नियामक संस्थेला सांगितलं आहे. कंपनीने या युजर्सना पुन्हा लॉग इन करायला सांगितले असून त्यांना पासवर्ड बदलण्याची गरज नाही.
आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. संबंधित अकाऊंटचा गैरवापर झाला का, माहिती चोरली गेली का हे अजून स्पष्ट झालेलं नाही, असं कंपनीनं म्हटलं आहे. आमच्यासाठी युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे जे घडलं त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
'View As' काय आहे?
फेसबुक युजर्सना त्यांचं प्रोफाईल इतरांना कसं दिसतं हे पाहण्यासाठी 'View As' हे फिचर वापरलं जातं. हा हल्ला करणाऱ्यांनी या फिचरमधील काही बग शोधून फेसबुकचे टोकन अॅक्सेस मिळवले आणि त्याचा वापर करून अकाऊंटमध्ये अॅक्सेस मिळवला.
टोकन अॅक्सेस या डिजिटल की च्या सहाय्याने फेसबुकचं अकाऊंट लॉग इन राहातं, त्यामुळे अकाऊंट सुरू करताना पुन्हा पासवर्ड वापरावा लागत नाही.
फेसबुकला काय फटका?
युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेवरून फेसबुक संदर्भात बरेच प्रश्न उभे आहेत.

शुक्रवारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक युजर्सची सुरक्षेला फार महत्त्व देतं असं म्हटलं आहे. तसेच काही समाजकंटक फेसबुकवर सतत हल्ला करत असतात असंही त्यांनी म्हटलं आहे.
'फॉरेस्टर' या संस्थेतील विश्लेषक जेफ पोलार्ड म्हणतात फेसबुककडे युजर्सचा फार मोठ्या प्रमाणावर डेटा असल्याने फेसबुकने सतत अशा हल्ल्यांसाठी सज्ज असलं पाहिजे.
हे बग्ज का राहिले होते, यावर कुणावर कारवाई होईल का, या संदर्भात बीबीसीने फेसबुकला विचारणा केली असता कोणतंही उत्तर मिळू शकलेलं नाही.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








