फेकन्यूजला आळा घालण्यासाठी फेसबुक घेणार यूजर्सची मदत

मार्क झकेरबर्ग

फोटो स्रोत, Mark Zuckerburg/Facebook

फोटो कॅप्शन, मार्क झुकरबर्ग

फेसबुकचं न्यूज फीड विश्वासार्ह बनवण्याच्या दृष्टीनं आपण कटिबद्ध आहोत अशी घोषणा फेसबुकनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केली आहे. न्यूज फीड विश्वासार्ह बनवण्यासाठी खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या बातम्यांनाच प्राधान्य दिलं जाईल, असं फेसबुकनं म्हटलं आहे.

"युजर सर्व्हेंचा अभ्यास करून कोणती संस्था अधिक विश्वासार्ह बातम्या देते हे ठरवलं जाणार आहे," असं फेसबुकनं म्हटलं.

"फेसबुक युजर्सच्या न्यूज फीडमध्ये सध्या 5 टक्के बातम्या दिसतात. त्या कमी करून 4 टक्क्यांवर आणल्या जातील," असं फेसबुकचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

"काही लोक फेसबुकवर फेक न्यूज पसरवतात. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला," असं मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

मार्क झुकरबर्ग

फोटो स्रोत, Mark Zuckerberg/Facebook

फोटो कॅप्शन, मार्क झुकरबर्ग

ट्विटर देखील विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीनं पावलं उचलत आहे. 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी रशियन बॉट अकाउंटवरून ट्वीट केली जाऊ लागली होती. या अकाउंटला लाइक करणाऱ्या किंवा या अकाउंटवरील ट्वीट रिट्वीट करणाऱ्या 6.7 लाख युजर्सला ट्विटरने नोटीस पाठवली आहे.

बातम्यांची सत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी आधी फेसबुकचे कर्मचारी उचलत असत. पण आता फेसबुकनं आपल्या धोरणात बदल करून बातम्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी युजर्सची मदत घेण्याचं ठरवलं आहे. "बातम्यांची सत्यता पडताळून पाहण्याचं काम फेसबुकचे कर्मचारी करतील असा निर्णय आम्ही घेतला होता पण त्या ऐवजी दुसरा पर्याय काय आहे याचा आम्ही शोध घेतला," असं झुकरबर्ग म्हणाले.

"आम्ही तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार केला होता. पण तरीदेखील वस्तुनिष्ठतेचा प्रश्न राहिलाच असता. त्या पेक्षा आम्ही तुमची म्हणजेच फेसबुक समुदायाची मदत घेणार आहोत. कोणतं न्यूज आउटलेट अधिक विश्वासार्ह आहे आणि कोणतं नाही, हे वाचकांनीच ठरवावं," असं झुकरबर्ग म्हणाले.

"फेसबुकवर जशी एखादी जाहिरात झळकते तसं न्यूज फीडमध्ये एखाद्या ब्रॅंडचा लोगो दाखवण्यात येईल. तुम्ही हा ब्रॅंड ओळखू शकता का? आणि हा ब्रॅंड तुम्हाला विश्वासार्ह वाटतो का? असं त्यांना विचारण्यात येईल. त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन न्यूज आउटलेट्सच्या विश्वासार्हतेची रॅंकिंग ठरवली जाणार आहे," असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

अद्याप फेसबुकनं या नव्या प्रयोगाला व्यापक स्तरावर सुरुवात केली नाही. काही वाचक आपल्या आवडीच्या कंपन्याना विश्वासार्ह समजतात. पण काही कंपन्यांची विश्वासार्हता बहुतेक वाचकांनी मान्य केलेली असते. वाचकांचा राजकीय कल कोणत्याही बाजूने असला तरी काही कंपन्यांच्या विश्वासार्हतेबद्दल बहुसंख्य लोकांच्या मनात शंका नसते.

"फेसबुकवर सनसनाटी बातम्यांचं पेव फुटलेलं आहे, दिशाभूल करणारी माहिती देखील फेसबुकवर फिरत असते. तसंच ध्रुवीकरणाचाही प्रयत्न होताना दिसतो," असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

झुकरबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

नव्या वर्षाच्या सुरुवातीला झुकरबर्ग यांनी आपण फेसबुक स्वच्छ करणार असा संकल्प केला होता. फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवण्याचं प्रमाण वाढलं आहे.

"जर त्यांच्यावर वेळीच आळा घातला नाही, तर हे प्रमाण वाढतच जाईल," असं झुकरबर्ग यांनी म्हटलं.

युजर्स फीडबॅकवरुन रॅंकिंग ठरवण्याचा प्रयोग सर्वांत आधी अमेरिकेत राबवला जाणार आहे. या प्रयोगाचे निकाल सार्वजनिक केले जाणार नाहीत.

"रॅंकिंग ठरवण्यासाठी अनेक घटक लक्षात घेतले जातील, त्यापैकी वाचकांचा फीडबॅक हा एक घटक आहे," असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं.

"वाचकांनी दिलेल्या फीडबॅकचे निकाल जाहीर केले जाणार नाहीत, कारण या निकालांमुळं त्या विशिष्ट ब्रॅंडबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दलचं पूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही. एखाद्या विशिष्ट बातमीबद्दल वाचकांना काय वाटतं? याचा तो फीडबॅक असू शकतो हे देखील आपल्याला गृहित धरावं लागेल, म्हणून आम्ही हे निकाल जाहीर करणार नाहीत," असं स्पष्टीकरण फेसबुकनं दिलं.

बीबीसीचे टेक्नोलॉजी प्रतिनिधी डेव्ह ली यांचं विश्लेषण

जेव्हा फेसबुकसारखी मोठी कंपनी आपलं धोरण बदलते तेव्हा त्याचा फायदा काही जणांना होऊ शकतो तर काही जणांना नुकसान होऊ शकतं.

बातम्यांच्या क्षेत्रात ज्या कंपन्यांची पाळंमुळं घट्ट रुजली आहेत अशा, न्यू र्क टाइम्स किंवा बीबीसी सारख्या कंपन्यांना या बदलाचा फायदा होऊ शकतो. पण जे ब्रॅंड या क्षेत्रात नव्याने आले आहेत त्यांना याचा फटका बसू शकतो. नवे ब्रॅंड विश्वासार्ह असले तरी लोक त्यांना ओळखतील की नाही हा प्रश्न कायम राहतोच. त्यामुळं त्यांचं नुकसान होऊ शकतं.

बझफीड ही वेबसाइट सुरुवातीला फक्त व्हायरल कंटेटसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळं ही वेबसाइट गंभीर बातम्या देत नाही असा एक ग्रह झाला होता. पण कालांतरानं बझफीडनं बातम्या द्यायलाही सुरुवात केली. बझफीडसारख्या कंपन्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा असा झुकरबर्ग यांच्या टीमसमोर पेचप्रसंग उभा राहिला होता, हे नाकारता येणार नाही.

विज्ञान क्षेत्रातील प्रकाशनांच्या वाचकांची संख्या कमी असते पण ते विश्वासार्ह असू शकतात. अशा परिस्थितीत फेसबुक काय निर्णय घेईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या नव्या नियमांचा फटका स्थानिक न्यूज वेबसाइट्सला बसणार नाही. त्यांना संरक्षण दिलं जाईल, असं फेसबुकच्या न्यूज फीड विभागाचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी म्हटलं आहे.

"त्या-त्या भागात राहणाऱ्या लोकांना स्थानिक बातम्या पाहणं हे सुलभ होईल अशी व्यवस्था आम्ही नक्की करू. ज्या बातम्या स्थानिक वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे त्या त्यांना देण्याचं काम यापुढं देखील सुरू राहील," असं मोसेरी यांनी म्हटलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)