You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या देशात प्रत्येक घरावर टांगल्या आहेत बाहुल्या
- Author, जॅकलिन जेंकेन्सला
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
कधी कधी जे बदल मोठी क्रांती घडवून आणू शकत नाहीत त्या गोष्टी निर्जीव गोष्टी घडवून दाखवतात. ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल पण युरोपमधल्या चेक रिपब्लिक देशाच्या बाबतीत ही गोष्ट 100 टक्के खरी ठरली आहे.
खेळण्यातल्या बाहुल्या ज्यांना आपण कठपुतळ्याही असंही म्हणतो. त्या आज चेक रिपब्लिक देशाची ओळख बनली आहे. फक्त ओळखच नव्हे, या बाहुल्यांनी अनेक शतकांचा इतिहास त्यांच्यात सामावून ठेवला आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त या बाहुल्यांमुळे चेक रिपब्लिकचे लोक आपली पारंपरिक भाषा बोलू शकतात. या बाहुल्यांनी चेक संस्कृती आणि भाषेचं संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
17व्या शतकात जेव्हा बोहेमियन प्रदेशावर ऑस्ट्रियाच्या हॅब्सबर्ग घराण्याचं राज्य होतं, तेव्हा चेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर होती. याच काळात ख्रिश्चन धर्म प्रोटेस्टंट आणि कॅथलिक अशा दोन गटांमध्ये विभागला होता. दोन्ही गटांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू होते.
याच वेळेस बिला होराची लढाई झाली होती. या लढाईला व्हाईट माउंटनची लढाई असंही म्हटलं जातं. हा पर्वत सध्याच्या चेक रिपब्लिकमध्ये आहे. या लढाईत प्रोटेस्टंट बोहेमियांचा कॅथलिकांनी दारूण पराभव केला होता.
ही लढाई चेक रिपब्लिकच्या इतिहासात सगळ्यांत जास्त महत्त्वाची आहे. या लढाईनंतर युरोप दोन भागांमध्ये वाटला गेला आणि अनेक प्रकारच्या राजनैतिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक सीमारेषा बनल्या.
चेक रिपब्लिकवर हॅब्सबर्ग घराण्याची सत्ता कायम झाली. ही लढाई जवळपास तीस वर्ष चालली. त्यात चेक प्रोटेस्टंटांना कॅथलिकांना हरवलं.
या युद्धात पणाला लागलेली गोष्ट म्हणजे चेक लोकांची मातृभाषा. भाषा ही त्यांची ओळख होती. चेक रिपब्लिकचा (तत्कालिन झेकोस्लोव्हाकिया) राजा फर्डिनांड दुसरा याने चेक लोकांवर जर्मन भाषा लादली. या राजाला बिगर-कॅथलिक लोक अजिबात पसंत नव्हते. तो बिगर-कॅथलिकांना धोकादायक मानायचा.
सुरुवातीला बुद्धिजीवी वर्गाने या भाषा आक्रमणाचा विरोध केला. पण नंतर त्यांनीही शासनकर्त्यांची भाषा स्वीकारावी लागली. अगदी कलाकारांनाही फक्त जर्मन भाषेतच व्यक्त होण्याची परवानगी होती.
फक्त बाहुल्यांना होती परवानगी
बदलत्या परिस्थितीत चेक भाषा एक बोलीभाषा बनली, फार थोडे लोक ती बोलू शकत होते. 1600मध्ये जेव्हा प्रोटेस्टंट कोर्टाने (या पंथाच्या महत्त्वाच्या लोकांची समिती) चेक रिपब्लिकची राजधानी प्राग सोडली तेव्हा हा देश आणखी 200 वर्षं मागे गेला.
पण ज्या लोकांना मातृभाषेविषयी विशेष प्रेम होतं त्यांनी भाषा वापरण्याची एक नामी युक्ती शोधली. त्यांनी आपला विरोध दर्शवायला बाहुल्यांच्या खेळाचा वापर करायला सुरुवात केली.
कारण राजा फर्डिनांडच्या (दुसरा) काळात फक्त बाहुल्यांनाच चेक भाषा बोलण्याची परवानगी होती.
17व्या शतकात चेक रिपब्लिकचे कलावंत चर्चच्या खुर्च्यांवर नक्षीकाम करायचे. पण चेहरे काढणं त्यांना जमत नव्हतं. म्हणून त्यांनी विचित्र प्रकारचे चेहरे कोरायला सुरुवात केले आणि या चेहऱ्याच्या (बाहुल्यांच्या) माध्यमातून ते भाषा टिकवून ठेवायचे.
अशा मुठभर लोकांच्या प्रयत्नांमुळे एक नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी भाषा वाचली हे पटायला जरा कठीण जातं. पण या लोकांचे प्रयत्न या कठपुतळ्यांच्या दोऱ्यांमध्ये बांधले जाऊन पिढ्यान पिढ्या पुढे सरकत राहिले. याच कारणांमुळे चेक रिपब्लिकच्या लोकांच्या मनात या बाहुल्यांची एक खास जागा आहे.
राजधानी प्रागच्या प्रत्येक बाजारात हरेक दुकानात बाहुल्या टांगलेल्या दिसतील. अजूनही बऱ्याचशा बाहुल्या लाकडाच्याच बनवल्या जातात. या बाहुल्यांमध्ये राजा-राणी, चेटकीण, शेतकरी, जनावरं अशा सगळ्यांच्या बाहुल्या असतात.
फरक इतकाच आहे एकेकाळी या बाहुल्या लोकांची भाषा आणि भावनांचं जतन करणार साधन होतं तर आता या सजावटीच्या वस्तू आणि मुलांच्या खेळण्यातल्या गोष्टी बनल्या आहेत. आजही गल्लीबोळात पपेट शो होतात. प्रागच्या नॅशनल थिएटरमध्ये मोठ्या-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हे कार्यक्रम बघायला स्थानिक लोक तसंच पर्यटकही येतात.
या बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या लोकांमुळे चेक रिपब्लिकची तरुण पिढी त्यांची मातृभाषा अजूनही बोलू शकते.
एक अशी मातृभाषा जी काही शतकांपूर्वी नामशेष होण्याच्या मार्गावर होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)