पाहा देखणे पक्षी आणि त्यांचे अनोखे फोटो

फ्लेमिंगोंची भांडणं, भक्ष्यासाठी दबा धरून बसलेला अहिंगा पक्षी, वेस्टर्न क्राऊन जातीच्या कबुतराचा सूर्यप्रकाशात चमकणारा तुरा असे नेमक्या वेळी काढलेले फोटो तुम्ही पाहिलेच पाहिजेत. या वर्षातले पक्ष्यांचे सर्वोत्तम फोटो नुकतेच निवडण्यात आले. ते फोटो आणि त्या फोटोंमागची गोष्ट फोटोग्राफर्सच्याच शब्दात.

पहिला फोटो काढला आहे पेरू देशाचे फोटोग्राफर पेद्रो जार्क यांनी. त्यांनी या फोटोला 'ब्लॅक फ्रायडे' असं नाव दिलं. ब्लॅक फ्रायडे म्हणजे अमेरिकेत ख्रिसमससाठी खरेदी सुरू होते तो दिवस. त्या दिवशी बाजारांमध्ये प्रचंड गर्दी असते, कचकच असते. सगळीकडे व्यवहारावरून बोलणी सुरू असतात, भांडणांचे आवाज येत असतात.

माद्रिदमधल्या एका पक्षी उद्यानात हा फोटो काढला तेव्हा हे फ्लेमिंगोही कर्कश आवाजात भांडण करत होते. म्हणून या फोटोला पेद्रोंनी 'ब्लॅक फ्रायडे' असं नाव दिलं.

या फोटोला बेस्ट पोर्टफोलियोचं बक्षीस मिळालं आहे. पेट्र बँबूसेक यांनी हा फोटो काढला आहे. "ब्राझीलच्या पँटानल प्रदेशात गेलो असताना हा क्षण मी कॅमेऱ्यात कैद केला आहे. "बोटीतून जात असताना मला एक अहिंगा पक्षी शिकार करताना दिसला. मी नावाड्याला बोटीचा वेग कमी करायला सांगितला. बोट अशा प्रकारे वळवायला लावली की त्या पक्षाच्या मानेवर प्रकाश पडेल," असं पेट्र बॅंबूसेक यांनी सांगितलं.

डेव्हिड एस्टन यांनी हा सिंगापूरच्या जुराँग बर्ड पार्कमध्ये हा फोटो काढला आहे. हा फोटोत वेस्टर्न क्राऊन्ड जातीचं कबुतर दिसतं आहे. या फोटोबद्दल ते म्हणतात, "त्या कबुतराचा तुरा सूर्यप्रकाशाने चमकतो आहे असा फोटो मला काढायचा होता. पण मला दिसलेलं कबुतर त्यांचं डोकं वळवत नाही तोवर मला थांबावं लागलं. हे पक्षी फारच पटकन उडून जातात त्यामुळे मला जास्त शटर स्पीड वापरावा लागला."

साल्वाडोर कोलव्ही नामिबियातल्या नामिब-नौक्लुफ्ट नॅशनल पार्कमधल्या वाळूच्या टेकड्यांमध्ये फिरत होते. ते सांगतात, "मी खरंतर ऑरिक्स जातीच्या काळवीटांच्या शोधात होतो. पण अचानक मला एक शहामृग दिसलं. इतक्या लांब, इतक्या प्रतिकूल हवामानात फिरणाऱ्या शहामृगाचा फोटो घ्यायलाच हवा असं मला वाटलं."

आयल ऑफ वाईटवरून झेपावणारा हा बगळा टिपलाय ब्रिटीश फोटोग्राफर सिएन्ना अॅडरसन यांनी.

काळ्या आभाळात झेपावणारा हा बगळा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्यांनी एकाच जागेला आठवडाभरात तीनदा भेट दिली.

सॅव्हरियो गाटो यांनी पाण्यात मस्त आंघोळ करणारा हा लाल मानेचा फॅलारोप पक्षी टिपला आहे.

निकोस बुकास यांनी नांगरलेली माती रॉबिन पक्षाच्या पायांना लागलेली पाहिली होती. नांगलेल्या जमिनीतल्या अळ्या पकडताना त्यांच्या पायाला माती लागते.

फेब्रुवारी महिन्यात ग्रीसमधल्या इक्कीसोक्सोरीतलं बटाट्याचं शेत नांगरत असताना त्यांनी एका दाताळ्याच्या (शेतीतलं अवजार) शेजारी एक अळी ठेवली. त्या अळीच्या शोधात आलेल्या रॉबिनला मेजवानी मिळाली आणि निकोस यांना हा फोटो.

हा फोटो काढला आहे वर्षातले सर्वात तरुण छायाचित्रकार ठरलेल्या योहान कालबर्ग यांनी. स्टॉकहोममधल्या घराशेजारच्या तळ्याजवळ त्यांनी हा फोटो काढला आहे. त्यासाठी त्यांना पहाटे तीन वाजता उठावं लागलं होतं. हा ग्रेट क्रेस्टेट ग्रेब पक्षी सकाळाच्या सोनेरी उन्हात मस्त आंघोळ करताना दिसत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)