मुंबईचे फ्लेमिंगो पावसाळ्यात कुठे जातात?

    • Author, आरती कुलकर्णी आणि प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठी

मुंबईजवळ ठाण्याच्या खाडीपट्ट्यात सध्या फ्लेमिंगोंचे मोजके थवे उरले आहेत. आता एकेक करत हे गुलाबी थवे परतीच्या मार्गाला लागतील आणि त्यांचा स्थलांतराचा प्रवास नॉनस्टॉप पूर्ण करतील.

या पक्ष्यांना मुंबईच्या समुद्रावरून ते कच्छच्या रणापर्यंतचा टप्पा गाठायचा आहे. फ्लेमिंगो जसे सराईत जलतरणपटू आहेत तसेच ते कित्येक मैल अंतर कापून स्थलांतर करणारे उत्तम प्रवासीही आहेत.

मुंबईत येणाऱ्या या फ्लेंमिंगोंसाठी ठाण्याच्या खाडीपट्ट्यात अभयारण्य तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे यावर्षी या पक्ष्यांना हक्काचं घर मिळालंय. आता तर हे फ्लेमिंगो बघण्यासाठी ऐरोलीच्या खाडीतून बोटीने जाता येतं.

ओहोटीच्या वेळी बोटीने खाडीत गेलं की उथळ पाण्यातल्या दलदलीत खाद्य टिपणारे फ्लेमिंगो पाहायला मिळतात. कधीकधी तर फ्लेमिंगोंचे हे गुलाबी थवे आपल्या डोक्यावरून विहरत जातात.

मुंबई नगरीत 1997 पासून हे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येऊ लागले. याआधी शिवडीच्या जेट्टीजवळ हजारोंच्या संख्येने हे पक्षी दिसायचे. पण शिवडी-न्हावाशेवा या सागरी सेतूच्या बांधकामामुळे त्यांचं हे वसतिस्थान धोक्यात आलं. यासाठीच ठाणे आणि वाशीच्या खाडीपट्ट्यात 1,690 हेक्टरचं फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आलं आहे.

फ्लेमिंगोंची सैर

मुंबईकरांनी यावर्षी या पाहुण्यांना जवळून निरखण्याचा आनंद लुटला. महाराष्ट्राच्या मॅनग्रोव्ह सेलतर्फे पक्षीनिरीक्षकांसाठी इथे खास बोटींची सोय करण्यात आली आहे. या भागातले स्थानिक मच्छिमार आणि स्वयंसेवी संस्थांनी इथे इकोटूरिझमचा उपक्रम राबवला आणि मुंबईकरांना फ्लेमिंगोंची सैर घडवून आणली.

'आयनेचर वॉच' चे आयझॅक किहिमकर सांगतात, "मुंबईमध्ये ग्रेटर आणि लेसर या दोन्ही प्रकारचे फ्लेमिंगो येतात. ग्रेटर फ्लेमिंगो हे मोठ्या आकाराचे आणि पांढरट असतात आणि त्यांची मानही लांबलचक असते. लेसर फ्लेमिंगो हे लहान आणि जास्त गुलाबी असतात. या दोन्ही प्रकारच्या फ्लेमिंगोंचे थवे आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळतात."

पंख लाल का?

ठाणे, वाशी, भांडुप पंपिंग स्टेशन या पट्ट्यात खारफुटीच्या दाटीमुळे या पक्ष्यांना संरक्षण मिळतं. शिवाय इथे असलेलं विशिष्ट प्रकारचं शेवाळ, कोळंबी हे त्यांचं मुख्य खाद्य आहे. या खाद्यामध्ये बिटा कॅरोटिनचं प्रमाण जास्त असतं. या द्रव्यामुळेच त्यांच्या पंखांना लालसर गुलाबी रंग येतो.

मुंबईत येणाऱ्या या पाहुण्यांचं मूळ घर कच्छच्या रणामध्ये आहे. तिथल्या निर्मनुष्य असलेल्या खाऱ्या दलदलीमध्ये हजारो फ्लेमिंगो राहतात. त्यांचं प्रजननही तिथेच होतं. म्हणूनच या भागाला 'फ्लेमिंगो सिटी' असं नाव देण्यात आलं आहे.

पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली हे त्यांच्या वसतिस्थानाचा अभ्यास करण्यासाठी उंटाच्या पाठीवरून मैलोनमैल प्रवास करून या गुलाबी शहरात गेले होते.

फ्लेमिगोंचे हे थवे हिवाळ्यात, नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास खाद्याच्या शोधात मुंबईच्या दिशेने येतात. ते इथे येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची तपकिरी रंगाची पिल्लंही पाहायला मिळतात. मुंबईच्या किनाऱ्यावर ही पिल्लं मोठी होऊ लागतात. परतीच्या प्रवासापर्यंत त्यांच्या पंखांना लालसर छटा येऊ लागते.

पावसाळा सुरू होण्याच्या आतच फ्लेमिंगो पुन्हा एकदा आपल्या कच्छच्या रणातल्या मायभूमीकडे परतू लागतात. पण त्याआधी इथल्या खाडीत त्यांचं लयदार नृत्य पाहायला मिळतं. फ्लेमिंगो माना वेळावून छोट्याछोट्या थव्यांमध्ये गोलगोल फिरत राहतात. त्यांचं हे नृत्य एखाद्या बॅलेसारखं दिसतं. हा त्यांचा 'कोर्टशिप डान्स' असतो. या नृत्यातून नर आणि मादी आपली जोडी बनवतात आणि कच्छच्या रणात गेल्यानंतर त्यांची वीण सुरू होते.

कच्छच्या रणामधल्या दलदलीत ते मातीची घरटी बनवतात आणि त्यात दोन अंडी घालतात. अलीकडेच लिटिल रण ऑफ कच्छ या भागातही पक्षीप्रेमींना त्यांची ही मातीतली घरटी आणि विणीची वसाहत दिसली आहे. डॉ़. मोनिका गेरा यांनी फ्लेमिंगोंची ही घरटी टिपली आहेत.

त्या सांगतात, फ्लेमिंगो त्यांच्या विणीच्या हंगामानंतर ही घरटी सोडून गेले होते. या वसाहतीत रिकाम्या घरट्यांमधून पिल्लं उडून गेली होती. काही घरट्यांमध्ये अंडी शिल्लक होती पण त्यातून पिल्लू बाहेर येण्याची शक्यता नव्हती. इथे या पक्ष्यांच्या पाऊलखुणा उरल्या होत्या.

या छायाचित्रांमुळे 'लिटिल रण ऑफ कच्छ' मधलं फ्लेमिंगोंचं विणीचं ठिकाण सगळ्यांसमोर आलं.

कच्छचं रण ते मुंबई आणि पुन्हा मुंबईहून कच्छचं रण असा फ्लेमिंगोंचा प्रवास गेली 20 वर्षं सुरू आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या स्थलांतराची जागा संरक्षित राहावी म्हणून 10 वर्षांसाठीचा संरक्षण आराखडा तयार करण्यात आला आहे.

यामध्ये फ्लेमिंगोंच्या निमित्ताने इथली खारफुटी आणि पाणथळ जागांमध्ये येणारे सुमारे 150 प्रजातींचे पक्षी यांचंही संरक्षण होणार आहे, असं वनखात्याच्या मॅनग्रोव्ह सेलचे वरिष्ठ वनाधिकारी एन. वासुदवेन यांनी सांगितलं.

"'शिवडी-न्हावाशेवा सी लिंक' च्या बांधकामामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच त्यांच्यासाठी हे अभयारण्य बनवण्यात आलं. पण आता याच भागातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिगत मार्गही जातो. हा मार्ग जमिनीखालून जात असल्यामुळे फ्लेमिंगोंच्या अधिवासाला कोणतीही बाधा येणार नाही," असं एन. वासुदेवन यांचं म्हणणं आहे.

पण या प्रकल्पाच्या बांधकामाच्या वेळी फ्लेमिंगोंचा अधिवास संकटात सापडणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल, असं पक्षीतज्ज्ञांना वाटतं.

मुंबईसारख्या शहरात वेगवेगळे प्रकल्प येतच राहणार आहेत पण या विकासासोबतच या पाहुण्या पक्ष्यांची काळजी घेणं हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असं आयझॅक किहिमकर म्हणतात.

मुंबईमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आणि त्यांना मुंबईने आपलंसं केलं. हे फ्लेमिंगोही आता मुंबईचेच झाले आहेत. हे पक्षी इथे वर्षानुवर्षं येत राहतील, अशी आशाही त्यांना वाटते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)