You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात गोळीबार, दोन ठार
फ्लोरिडातील जॅक्सनव्हिले इंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका बंदूकधारी व्यक्तीनं गोळीबार केला. त्यात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्लेखोराची ओळख डेव्हिड कट्झ अशी सांगण्यात आली आहे. तो 24 वर्षांचा असून बाल्टिमूरचा रहिवासी आहे. या घटनेनंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा कुणी भागीदार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत 11 जण जखमी झाले आहे.
जॅक्सनव्हिले लॅंडिंग या ठिकाणी व्हीडिओ गेम टुर्नामेंटच्या वेळी ही घटना घडली. जॅक्सनव्हिले लॅंडिंग हा मोठा मॉल आहे, त्या ठिकाणी दुकानं, रेस्तराँ आणि व्हीडिओ गेम्स पार्लर आहेत.
कट्झकडे फक्त हॅंडगन होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तो व्हीडिओ गेममध्ये हरला त्यानंतर त्यानं गोळीबार केला असं वृत्तांकन स्थानिक माध्यमांनी केली होते. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
गेल्या काही वर्षांत फ्लोरिडात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. 2016मध्ये पल्स नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी 49 जण ठार झाले होते. पार्कलॅंडमधल्या मार्जरी स्टोनमन डग्लस शाळेत फेब्रुवारी महिन्यात गोळीबार झाला होता. त्यात 17 जण ठार झाले होते.
त्या ठिकाणी व्हीडिओ गेम खेळण्यासाठी आलेल्या द्रिनीनं ट्वीट केलं आहे, "माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. गोळी माझ्या अंगठ्याला लागली. मी हे ठिकाण सोडून जात आहे. मी इथं परत कधीच येणार नाही."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)