खरंखुरं सोनं असलेल्या या मिठाईचा भाव ऐकून तुम्ही थक्क व्हाल

    • Author, दिपलकुमार शहा
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

सूरतला 'डायमंड हब' म्हणजे हिऱ्याचं शहर म्हणतात. पण इथले हिरेच नाही तर इथले पदार्थसुद्धा एवढे प्रसिद्ध आहेत की 'सूरतचं जेवण आणि काशीचं मरण' अशी म्हणच या शहरात प्रचलित झाली आहे.

याच सूरतमधली एक मिठाई सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण या मिठाईची किंमत चक्क 9,000 रुपये प्रति किलो आहे.

'गोल्डन स्वीट' नावाची ही मिठाई बघण्यासाठी सध्या शहरातल्या '24 कॅरेट' या दुकानात मोठी झुंबड उडाली आहे. पण ही मिठाई इतकी महाग का आहे?

दुकानाचे मालक रोहन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आम्ही पाच प्रकारच्या मिठाया तयार केल्या आहेत, त्या तयार करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम पदार्थांचा वापर केला आहे."

"या मिठाईसाठी लागणारं केशर आम्ही स्पेनहून मागवलं आहे. आम्ही 180 नंबरचा काजू आणि सोन्याचं पान या मिठाईसाठी वापरलं आहे. या मिठाईसाठी लागणारं सोनं हे दागिन्यासाठी लागणाऱ्या सोन्यापेक्षासुद्धा महाग आहे. ते खाण्यासाठी वापरायचं असल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करावी लागली आणि त्यामुळे ते जास्त महाग झालं."

रोहन यांचं कुटुंब गेल्या आठ पिढ्यांपासून मिठाईचा व्यवसाय करत आहे. ते सांगतात, "आम्ही काजू कतली, नर्गिस कलाम, पिस्ता बादशाह, ड्रायफ्रूट बहार, आणि केसर कुंज हे प्रकार तयार केले आहेत."

नुकतंच त्यांच्या दुकानाला 50 वर्षं पूर्ण झाली, त्यामुळे काहीतरी विशेष करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी ही 9,000 रुपये प्रति किलोची मिठाई बनवली.

व्वा! सुवर्ण महोत्सव साजरं करायला याहून अधिक अस्सल काय म्हणावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)