You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पावसाला सुगंध मातीचा, विजेचा आणि ढगांचाही
वैशाख वणव्याच्या तडाख्यात एक दिवस आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमू लागते. वारा वाहू लागतो आणि पावसाचे टपोरे थेंब अलगद जमिनीवर उतरू लागतात आणि मृद्गंधाचा दरवळ सुरू होतो. तो दरवळ तुम्हाला घेऊन जातो पहिल्या पावसाच्या आठवणीत.
कितीतरी कवी आणि साहित्यिकांच्या रचना या मृद्गंधांने भारून गेली आहेत. पावसाला हा गंध दिला तरी कुणी आणि तो संपत कसा नाही, असा प्रश्न विचारण्याचा मोह मात्र अनेकांना होतो.
हा प्रश्न जसा तुम्हा आम्हाला, कवी, साहित्यिकांना पडतो तसाच हा प्रश्न संशोधकांनाही पडतो. हा प्रश्न पडलेल्या संशोधकांनी विज्ञानाच्या आधारे या मृद्गंधाचा शोध घेतला आहे. अत्तराच्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्यांनीही गंधाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मन मोहरून टाकणाऱ्या या सुगंधामागे थोडं रसायनशास्त्रही आहे. वादळी वाऱ्यानंतर स्वच्छ हवा आणि ओल्या मातीला येणाऱ्या या सुगंधामागे जीवाणू, वनस्पती आणि वीजांचाही वाटा असतो.
मृद्गंध
रणरणत्या उन्हात जमीन सुकून गेलेली असते. अशा जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा मृदगंध दरवळतो. हा सुगंध जीवाणूंपासून निर्माण होतो. ऑस्ट्रेलियातील 2 शास्त्रज्ञांनी 1960च्या दशकात यावर संशोधन केलं आहे.
जॉन इन्स सेंटरमधील मॉलिक्युलर बायॉलॉजीचे प्रमुख प्रा. मार्क बटरनर म्हणाले, "असे जीवाणू मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. जेव्हा आपण म्हणतो आपल्याला ओल्या मातीचा सुगंध येत आहे, तेव्हा प्रत्यक्षात आपण या मातीतील विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंमुळे निर्माण झालेल्या रेणूंचा सुगंध येत असतो."
चांगल्या प्रकारच्या मातीमध्ये स्ट्रेम्प्टोयाईस नावाचा जीवाणू असतो त्यातून जिओस्मिन नावाचा रेणू मिळतो. याचा उपयोग काही प्रतिजैविकं बनवण्यासाठी होत असतो.
जेव्हा पाणी जमिनीवर पडतं तेव्हा जिओस्मिन मोठ्या प्रमाणावर निर्माण होतं. पावसानंतर तर हे प्रमाण फारच जास्त असतं.
बटनर म्हणतात मनुष्य आणि इतर अनेक प्राणी या सुगंधाला संवेदशील असतात.
1960च्या दशकात इसाबेल बीअर आणि आर. जी. थॉमस यांनी या सुगंधाला 'पेट्रीकोर' असं नाव दिलं. भारतात उत्तर प्रदेशमध्ये या सुगंधाचं अत्तर मिळतं. याला 'मिट्टी का अत्तर' असं नाव आहे.
सुगंधी द्रव्य बनवण्याच्या उद्योगात सध्या जिओस्मिनाचा वापर मोठ्या प्रमाणावर अत्तर बनवण्यासाठी होतो.
अत्तरतज्ज्ञ मरिना बार्सेनिला म्हणाल्या, "पाऊस पडल्यानंतर मातीचा जो सुगंध असतो, तसाच सुगंध जिओस्मिनला असतो. हा अगदी प्राथमिक सुगंध असतो. हा सुगंध किती जरी सौम्य केला तर आपण तो ओळखू शकतो."
याचा सुगंध जसा मोहक असतो, त्या उलट या रेणूची चव मात्र अनेकांना आवडत नाही.
डेन्मार्क इथल्या अलब्रोग विद्यापीठातील संशोधक प्रा. जेप नेल्सन म्हणाले, "हा रेणू विषारी नाही. याची चव आपल्याला का आवडत नाही, याबद्दल अजून तरी माहिती नाही."
वनस्पतींचा सुवास
प्रा. नेल्सन म्हणतात, "संशोधनाअंती असं कळलं आहे की जिओस्मिनचा संबंध टेर्पेनशीही असावा. टेर्पेन अनेक वनस्पतीमध्ये सुगंधाचा स्रोत आहे."
रॉयल बॉटनिकल गार्डनमधील प्रा. फिलिप स्टीव्हन्सन सांगतात पावसामुळे हा सुगंध बाहेर येऊ शकतो. ते म्हणाले, "पानावर असलेल्या शिरांमध्ये साधारणपणे सुगंध निर्माण करणाऱ्या रसायनांची निर्मिती होते. पावसात या शिरांची हानी होते. त्यामुळे ही रसायनं बाहेर पडतात. सुकलेल्या वनस्पतींतून ही पावसामुळे अशी रसायनं बाहेर येतात."
दीर्घकाळ जर पाऊस पडला नाही आणि फार जास्त काळ कोरड्या स्थितीचा सामना करावा लागला तर वनस्पतींमधील चयापचय क्रिया मंदावलेली असते. पण पावसामुळे वनस्पतीना नवजीवन मिळतं आणि त्या असा सुगंध उत्सर्जित करतात.
विजांचा कडकडाट
वादळी वाऱ्यांचाही या पावसाळ्यातील सुगंधात भूमिका असते. विजाचा कडकडाट आणि इतर विजेच्या भारांमुळे ओझोनचा गंध निर्माण होतो.
युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपीमधील प्रा. मारिबेथ स्टोलझेनबर्ग म्हणतात, "विजा, वादळ आणि पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारते. हवेतील धूळ, एअरोसोल्स आणि इतर कण पावसामुळे निघून जातात आणि हवा स्वच्छ होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)