मृदगंधाचं अत्तर कसं तयार केलं जातं?

    • Author, आरती बेटीगेरी
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

गुलाबापासून अत्तर किंवा गुलाब जल तयार करण्याची भारतात जुनी परंपरा आहे. उत्तर भारतातले अनेक परिवार अत्तर बनवण्याचं काम करतात. गुलाबाचेच नाही तर पहिला पाऊस पडल्यावर जसा मातीचा सुगंध येतो तसं म्हणजेच मृद्गंधाचं अत्तर तयार केलं जातं.

काही वर्षांपूर्वी एका भारतीय माणसाने मला खास अत्तराविषयी सांगितलं होतं. एखाद्या द्रव्याला उष्णता देऊन थंड करून त्याला शुद्ध करण्याच्या प्रक्रियेतून हे अत्तर तयार होतं. मान्सूनच्या अर्थात पहिल्या पावसाचा गंधाची झलक या अत्तरामध्ये अनुभवायला मिळते.

मला हे अत्तर अगदीच हवं होतं. सिथेंटिक प्रणालीतून तयार होणारी सेंट्स, परंपरागत अत्तरं, तेलआधारित परफ्युम या सगळ्यामध्ये मृद्गंधाचं फील देणारं अत्तर शोधून सापडणं कठीण होतं. जुन्या दिल्लीतल्या 'गुलाब सिंग जोहरीमल' या ठिकाणी हे खास अत्तर मिळतं अशी माहिती मला मिळाली होती.

गुलाब सिंग यांचे कुटुंबीय 200 वर्षांपासून अत्तर निर्मित्तीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सकाळी दुकान उघडल्यापासून विविध स्तरातली माणसं त्यांच्या दुकानात सुगंधी अत्तरांसाठी गर्दी करतात. चांगले कपडे लेवून वावरणाऱ्या महिला, आंग्ल भाषा आणि देहबोली असणारी देशी मंडळी, आपल्या प्रेमासाठी अत्तरं धुंडाळणारी तरुण मंडळी अशी सगळ्या प्रकारची माणसं जोहरीमल यांच्या दुकानात येत असतात. बावनकशी सुगंधांचं घर म्हणजे गुलाब सिंग यांचं दुकान.

दुकान चालवणारी सातवी पिढी

गच्च वस्ती, वायरींचीं जंजाळ म्हणजे जुनी दिल्ली. चांदणी चौक या भागाची खास ओळख. चांदणी चौकाच्या लगतच असलेल्या दारिबा कलन नावाचा चिंचोळा रस्ता अत्तरविश्वाचं माहेरघर. 1659मध्ये वसवण्यात आलेली दिल्ली मुघल साम्राज्याची राजधानी होती. त्यावेळच्या चांदणी चौकाचं रूप वेगळं होतं. रुंद ऐसपैस रस्ते, कालवे आणि आखीवरेखीव वास्तू असा चांदणी चौक देखणा होता.

पण आता चांदणी चौक गर्दी आणि गच्चगोळ वस्तीचा झाला आहे. एका सकाळी गुलाब सिंग यांच्या सुगंधी द्रव्यांच्या दुकानात दहा वाजता मी पोहोचले. गाड्या, बस आणि रिक्षा यांच्या आवाजाने परिसर निनादला होता. माणसं आपापल्या नोकरी-व्यवसायात दंग होती. घोडे आणि बकऱ्यांचा आवाजही परिसरात घुमत होता.

या भाऊगर्दीत गुलाबजींचं दुकान नक्की कुठे आहे लक्षातच येत नाही. दुकानाची आतली रचना साधीशीच भासते. काही मोजकी माणसं ग्राहकांच्या प्रतीक्षेत काऊंटरच्या पल्याड बसलेली असतात. नीट पाहिलं तर नक्षीकामाच्या अनेक खुणा दिसू लागतात. लाकडी शिसवी फर्निचर, काळ दर्शवणारं जुनं भलंथोरलं घडयाळ यांच्या बरोबरीने एक फलक आपलं लक्ष वेधून घेतो. त्यावर 1816 असे आकडे असतात. दुकानाची स्थापना कधी झाली हे स्पष्ट करण्याचं काम हा फलक करतो.

वडील आणि काकांच्या बरोबरीने प्रफुल्ल गुंधी सध्या हे दुकान चालवतात. मी आणि माझे भाऊ हे दुकान चालवणारी सातवी पिढी आहे असं प्रफुल्ल आत्मविश्वासाने सांगतात. नुकतंच पुतण्यानेही म्हणजे आठव्या पिढीने दुकानाच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली आहे असं प्रफुल्ल सांगतात.

फुलांच्या अर्कापासून अत्तरं तयार केले जातात

दुकानाच्या देदीप्यमान इतिहासाबद्दल फार माहिती नाही. 1857 बंडावेळी दुकानाचं नामोनिशाण नष्ट झालं असावं असं गुंधी सांगतात. मात्र या कशासंदर्भातही पुरावे नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. बोलता बोलता त्यांनी एक जाडजूड ग्रंथ दाखवला. जुन्या दिल्लीतल्या परफ्युम दुकानाचं चित्र ते दाखवतात. जीर्णशीर्ण झालेलं त्या चित्रात दुकानाचं नाव दिसत नाही. गुंधी यांना ते गुलाब सिंग जोहरीमल असल्याचा विश्वास वाटतो.

बॉक्ससारखी रचना असलेला एक बॉक्स ते दाखवतात आणि त्या बॉक्सची सगळी गुणवैशिष्ट्यं उलगडून सांगतात. गुंधी एकामागोमाग एक अत्तराची दुनिया समोर मांडतात. मोगरा, कमळ, फ्रँगिपनी अशा अनेकविध फुलांचा गंध त्या अत्तरांचा आधार असतो. यातला सगळ्यांत खास प्रकार म्हणजे गुलाबाच्या तेलापासून बनलेलं अत्तर. 10 मिलीलीटरसाठी तब्बल 33,000 रुपये खर्च करावे लागतात. त्याचा गंध मंदसा असला तरी तरी त्याला गोड गंध असतो.

"आम्ही बहुतांशी भारतीय अत्तरांची विक्री करतो. फुलांच्या अर्कापासून ही अत्तरं तयार केले जातात," हे बोलता बोलता त्यांनी आणखी एका अत्तराची बाटली उघडली आणि माझ्या मनगटावर थेंब शिंपडले.

हजारो वर्षांपासून चालत डिस्टलिशन प्रक्रिया त्यांनी समजावून दिली. मध्ययुगीन कालखंडात भारतात आलेल्या मुघल प्रशासकांनी या प्रक्रियेचं पुनरुज्जीवन केलं असावं. एका बंद पेटीत फुलं आणि अन्य साहित्य एकत्र करून त्यावर उकळतं पाणी सोडलं जातं. यानंतर त्या फुलांचा अर्क काढून साठवला जातो.

गुंधी सांगतात, "डिस्टीलिशन प्रक्रियेसाठी आम्ही तांब्याची भांडी आणि बांबू वापरतो. प्राचीन काळी याचाच वापर केला जात असे. तंत्रज्ञानात फार बदल झालेला नाही."

गुलाबाच्या अत्तरासाठी गुंधी स्वत: गुलाबाची लागवड करतात. देशातलं अत्तर निर्मितीचं केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशातल्या कन्नौज येथे तयार होणारी परफ्युम्स विकत घेतली जातात. याव्यतिरिक्त जगभरातून विविध अत्तरं विकत घेतली जातात. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मनगटावर अत्तराचा सुगंध अनुभवायला मिळतो. केवडा नावाच्या अत्तरात केशराचा गंध असतो. ओडिशा राज्यात या अत्तराची निर्मिती होते. दक्षिणेतल्या कोइंबतूर येथे जाईच्या फुलापासून अत्तर बनवलं जातं.

गुंधी एकामागोमाग एक अत्तरांचा खजिना पेश करतात. एकेक अत्तर मनात रुंजी घालत असतानाच तो क्षण आला. मृद्गंधाचं अत्तर. मिट्टी म्हणजे धरती तसंच गिल म्हणजे ओलं. वरुणराजाच्या पहिल्या आगमनानंतर ओल्या मातीचा गंध दरवळतो. हे अत्तर मृद्गंधाचा अनुभव देतं. गुंधी अलगद मिट्टी अत्तराचा ठिपका माझ्या मनगटावर टेकवतात. माझ्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासाठी ते आतूर असतात.

'उष्णता वाढत गेली की माणसांना अत्तर लावावं वाटतं'

माझ्या मनगटावरच्या त्वचेतून एक उष्ण, वैभवशाली आणि उबदार गंध उमटला. दिल्लीत अनेक वर्ष राहिल्यानंतर तप्त झालेल्या धरतीवर पावसाचं होणारं पहिलं आक्रमण मी अनुभवलं आहे. तो क्षण आणि मातीचा तो ओलसर गंध अवर्णनीय असतो. ते निसर्गाने आपल्याला दिलेलं अत्तर असतं. त्यात जराही कृत्रिमता नसते. हाच गंध अत्तराच्या रूपात भर उन्हाळ्यात अनुभवायला अनेकांना आवडतो. खूप आतवर दडलेला सुगंध यात असतो. असा सुगंध जो पावसाची आठवण करून देतो आणि मन मोकळं करतो.

"वसंत ऋतू सुरू असताना सुगंध जाणवत नाही. परंतु जशीजशी वातावरणातली उष्णता वाढत जाते अधिकाअधिक माणसांना हे अत्तर लावावं असं वाटू लागतं," असं गुंधी सांगतात.

हे अत्तर नक्की कसं तयार करतात? प्रदीर्घ श्वास घेऊन मातीचा वास भरून घेताना माझ्या डोळ्यासमोर ते पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघणारे कामगार आले. मग लाल मातीच्या मोठा ढिगारा उपसताना आणि तो ढीग मग तांब्याच्या डेऱ्यांमध्ये डिस्टिलेशनसाठी रचताना दिसले.

"तो गंध निर्माण करण्यासाठी तांब्याच्या भांड्यांमध्ये आम्ही फुटक्या मडक्यांची भुकटी विखरुन टाकतो. त्यावर पाणी टाकतो आणि तापवतो," असं गुंधी यांनी विषद केलं.

या भांड्यातून निघणारी वाफ आणि चंदनाचं तेल यांचं मिश्रण केलं जातं. तेल सुगंध शोषतं आणि पाणी वेगळं केलं जातं. जेव्हा तुम्ही या अत्तराचा गंध टिपता तेव्हा त्यात चंदन हा गाभा असतो. पण मृद्गंध भरून राहिलेला असतो. तो पहिल्या पावसाचा गंध असतो.

सुगंधी संभाषण सुरू असतानाच एक जोडपं दुकानात अवतरलं. रातराणीच्या सुगंधाचं अत्तर तुमच्याकडे आहे का, असं महिलेनं विचारलं. जाईच्या सुगंधाच्या अत्तराचा उल्लेख करत तिने विचारलं.

रातराणीच्या सुगंधाचं अत्तर आमच्याकडे नाही असं गुंधी यांनी सांगितलं. पण आमच्याकडे ट्यूबरोसचं अत्तर आहे. ते शोधायला गुंधी दुकानात लुप्त झाले. जुन्या काचेच्या जगसह ते अवतरले.

महिलेनं तिच्या हाताकडे पाहिलं. अनेक अत्तरांच्या सुवासाने तिचा हात सुगंधी झाला होता. मधमाशा माझ्या मागे लागतील असं त्या गमतीने म्हणाल्या.

त्यानंतर त्यांनी मिट्टी अर्थात मृद्गंधाच्या अत्तराची मागणी केली. मी दरवर्षी जर्मनीत जाऊन योग आणि ध्यानधारणा शिकवते. मातीच्या सुगंधाचं अत्तर आमच्याकडे असल्याचं मी सांगते तेव्हा युरोपियन व्यक्तींचा विश्वासच बसत नाही.

आम्ही दोघांनी मातीच्या अत्तराची कुपी घेतली आणि निघालो. वातावरणातला उष्मा वाढून घामट व्हायला होत होतं. उत्तर प्रदेशातल्या तप्त दुपारी उन्हाने काहिली होत असताना मृद्गंधाच्या अत्तराचे थेंब मी मनगटावर टेकवतो आणि तनामनाला सुखावणारा गंध शरीरात भारून राहतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)