You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेडिंग फोटोग्राफरवरची नाराजी या वधूला पडली महागात!
असं अनेकदा होतं... तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण टिपण्यासाठी तुम्ही एक व्यक्ती नेमता. आणि मग ती व्यक्ती कधी अप्रतिम काम करते आणि आपले ते क्षण आपल्यासोबत आजीवन असतात. पण ते क्षण जर मनासारखे नाही टिपले गेले तर...?
कॅनडातल्या एका वधुसोबत कदाचित असंच झालं. मग तिने वर्षभर त्या वेडिंग फोटोग्राफरचा इंटरनेटवर सतत अपप्रचार करून तिचा व्यवसाय उद्ध्वस्त केला. तिचा राग कमी झाला का, देव जाणे! पण तिला यासाठी मोठी किंमत मोजावी लागली - तब्बल 1 लाख 15 हजार डॉलर, म्हणजेच अंदाजे 75 लाख रुपये!
ते झालं असं, आपल्या लग्नाचे फोटो काढण्यासाठी कॅनडातील एमिली लिआओ यांनी अमारा वेडिंग नावाच्या एका फोटोग्राफी कंपनीची निवड केली. ठरल्याप्रमाणे त्यांनी अमारा वेडिंगला अॅडव्हान्स दिलं. त्यांनी लग्नाचे फोटो काढले तसंच लग्नासाठी इतर सेवा (मेकअप, फुलं) प्रदान केल्या.
अमारा वेडिंगच्या फोटोग्राफर किटी चॅन यांनी त्यांना फोटो सुद्धा दिले. पण हे फोटो आमच्या मनासारखे आले नाही, असं म्हणत एमिली यांनी उरलेले पैसे देण्यास नकार दिला. चॅन यांनी एमिली आणि त्यांच्या पतीकडे पैशांची मागणी केली. पण ते त्यांनी दिलेच नाही.
मग 2015 साली फोटोग्राफर चॅन यांनी एमिली आणि त्यांच्या पतीला न्यायालयात खेचलं. हे प्रकरण न्यायालयात असतानाच एमिली यांनी 'अमारा वेडिंग' विरोधात फेसबुक आणि चीनमधील सोशल मीडिया विबोवर बदनामी करणारा मजकूर टाकण्यास सुरुवात केली.
साहजिकच अमारा वेडिंगच्या व्यवसायाला त्याचा फटका बसला आणि बघता बघता त्यांचा धंदा बंद पडला.
न्यायाधीशांसमोर एमिली यांना आपले फोटो समाधानकारक नाहीत, असा दावा सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांनाच दंड ठोठावला. त्या विरोधात त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली पण तिथं देखील अमारा वेडिंगच्या बाजूने निकाल लागला.
या मोहिमेत त्यांनी हेतुपुरस्सर त्यांची बदनामी केल्याचं न्यायालयाने सांगितलं आणि न्यायालयाने 1 लाख 15 हजार डॉलरचा (अंदाजे 75 लाख रुपये) दंड ठोठावला.
22 फेब्रुवारी रोजी ब्रिटिश कोलंबिया सुप्रीम कोर्टाने हा निर्वाळा दिला.
काही काळानंतर एमिली यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी चॅन यांची माफी मागितली पण तोपर्यंत त्यांचं नुकसान जे झालं होतं ते झालंच.
"एमिली यांच्या कृतीमुळे माझं व्यावसायिक नुकसान झालं. ते आता कधीच भरून निघू शकत नाही," असं चॅन यांनी CBC न्यूजला गेल्या आठवड्यात म्हटलं.
"जर तुम्ही इंटरनेटवर कुणाविरोधात काही बोलाल तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल इतकंच मला लोकांना दाखवून द्यायचं होतं," असं चॅन म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)