You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियकरांना जिवंत जाळणाऱ्या राणीची गोष्ट
अफ्रिकेच्या इतिहासाची पानं चाळली तर लक्षात येईल अंगोलाची राणी एनजिंगा एमबांदी यांचं नाव सर्वांत लोकप्रिय ऐतिहासिक व्यक्तींपैकी एक आहे.
त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी लाभली होती आणि त्या धाडसी होत्या. त्यांनी 17व्या शतकात अफ्रिकेतल्या युरोपीय भांडवलशाही आणि वसाहतवादाविरोधात दंड थोपटले होते.
पण काही लोक त्यांना क्रूर म्हणत असत. त्यांनी आपल्या सत्तेसाठी आपल्या भावाला देखील मारलं होतं असं देखील म्हटलं जातं.
इतकंच नाही तर ज्या पुरुषासोबत त्यांनी सेक्स केला त्याला त्यांनी जिवंत जाळून टाकलं असं म्हटलं जातं.
असं असलं तरी त्या अफ्रिकेच्या इतिहासातील सर्वांत लोकप्रिय महिलांपैकी त्या एक आहेत यावर सर्व इतिहासकारांचं एकमत आहे.
एनजिंगा यांनी एमबांदू लोकांचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी अफ्रिकी देश एनदोंगो आणि मतांबावर राज्य केलं होतं.
स्थानिक भाषेत एनदोंगो या भागाला एनगोला असं म्हटलं जात असे. पोर्तुगीज लोक याच नावानं या भागाला ओळखत असत. नंतर एनगोलाचं नाव अंगोला असं झालं.
पोर्तुगाली सैनिकांनी सोन्या-चांदीसाठी एनदोंगोवर हल्ला केला होता. पण त्यांना सोन्या-चांदीच्या खाणी मिळाल्या नाहीत.
राणी एनजिंगा यांचा जन्म या हल्ल्याच्या 8 वर्षांनंतर झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव राजे एमबांदी किलुंजी होतं. लहानपणापासूनच त्या वडिलांबरोबर हल्लेखोरांविरोधात लढल्या असं म्हटलं जातं.
1617मध्ये राजा एमबांदी किलुंजी यांचं निधन झालं. त्यानंतर एनगोला (तत्कालीन अंगोला)चं राज्य एनगोला एमबांदी यांनी सांभाळलं. पण त्यांच्याकडे आपल्या वडिलांसारखा करिश्मा आणि बहिणीसारखी बुद्धिमत्ता नव्हती.
त्यांना ही भीती वाटू लागली की लोक त्यांच्याविरोधात कटकारस्थान करतील.
त्याच भीतीतून त्यांनी एनजिंगा यांच्या मुलगा म्हणजे स्वतःच्याच भाच्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
पण युरोपीय आक्रमकांविरोधात हा राजा निकराचा लढा देऊ शकत नव्हता. ही गोष्ट स्थानिक लोकांच्या लक्षात येऊ लागली होती.
बहिणीला सत्तेमध्ये समान वाटा द्या आणि दोघं मिळून राज्य करा असा सल्ला त्यांना दिला गेल्या नंतर एनजिंगा एमबांदी सक्रिय राज्यकर्त्या बनल्या आणि भावासोबत राज्यकारभार पाहू लागल्या.
मुत्सद्देगिरीत तरबेज
एमजिंगा पोर्तुगीज मिशनऱ्यांकडून पोर्तुगीज भाषा शिकल्या. त्या उत्तम मुत्सद्देगिरी करत असत.
एकदा त्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांसोबत बोलणी करण्यासाठी लुआंडाला गेल्या. तिथं त्यांनी काळे आणि गोरे एकत्र राहत असल्याचं पाहिलं. काळ्या-गोऱ्यांच्या संबंधातून तयार झालेली संतती पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.
त्याहीपेक्षा त्यांना दुसऱ्या एका गोष्टीचं वाईट वाटलं, अफ्रिकन लोकांना एका रांगेत उभं केलं जात असे आणि त्यांना जहाजातून लुआंडाबाहेर पाठवलं जात असे. त्यांची गुलाम म्हणून विक्री केली जात होती हे पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. काही वर्षांतच लुआंडा गुलामांच्या विक्रीचं मोठं स्थान बनलं.
त्या भागातून फेरफटका मारल्यानंतर त्या पोर्तुगीज गव्हर्नरसोबत तहासाठी गेल्या. पोर्तुगीज गव्हर्नर जोआओ कोरिए डे सोउसा यांनी त्यांना एका ठिकाणी बोलवलं होतं.
इतिहासकार सांगतात, की गव्हर्नर खुर्चीवर बसला होता आणि त्यानं एनजिंगा यांना बसण्यासाठी खुर्ची दिली नाही. मग एक नोकर पुढे आला आणि खाली गुडघ्यावर बसला. त्याच्या पाठीवर एनजिंगा बसल्या. पोर्तुगीज आणि एनगोला हे समान स्तरावर आहेत असं त्यांना सूचित करायचं होतं, असं इतिहासकार म्हणतात.
पोर्तुगीज गव्हर्नरसोबत बराच वेळ वाटाघाटी चालल्या. पोर्तुगीज सरकारनं एनगोलाचं सार्वभौमत्व मान्य करायचं त्या वाटाघाटीत ठरलं. पोर्तुगीज सेनेनं एनगोला सोडावं हे देखील ठरलं, पण व्यापारासाठी रस्ते मोकळे सोडण्यात येतील असा तह झाला.
पोर्तुगालसोबत संबंध सुधारावेत यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यांनी आपलं नाव एना डे सूजा असं ठेवलं. त्यावेळी त्यांचं वय 40 वर्षं होतं.
पण पोर्तुगाल आणि त्यांच्यात चांगले संबंध राहिले नाही. त्यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.
एनजिंगा जेव्हा राणी झाल्या
1624मध्ये त्यांचा भाऊ एका छोट्या बेटावर जाऊन राहिला होता. तिथंच त्यांचं निधन झालं.
एनजिंगा यांच्या भावाच्या निधनाशी निगडित अनेक कथा सांगितल्या जातात.
काहींच्या मते, एनजिंगा यांनी त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भावावर विषप्रयोग केला होता.
तर काहींना त्यांनी आत्महत्या केली असं वाटतं.
हे सगळं सुरू असतानाच, एनजिंगा एमबांदी यांनी पोर्तुगाल आणि काही जवळच्या लोकांनी दिलेल्या आव्हानांचा सामना करत एनदोंगोची पहिली राणी होण्याचा मान मिळवून दाखवला.
अंगोलाच्या राष्ट्रीय लायब्ररीचे संचालक जाओ पेड्रो लॉरेंको यांच्या मते, "आफ्रिकेत वर्षानुवर्षें सुरू असलेल्या महिलांच्या शोषणाच्या विरोधात एमबांदी यांनी केलेला संघर्ष हा नेहमीच लक्षात राहणारा आहे."
ते म्हणतात, "त्या आणि त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांमुळेच आफ्रिकेत सत्तेत राहूनही त्या प्रदेशाच्या विकासात महिलांनी दिलेलं योगदान समजून घेता येतं."
काही सूत्रांच्या मते, एनजिंगा या अतिशय क्रूर राणी होत्या.
राज्याच्या सीमेवर असलेल्या इमबांगला योद्ध्यांची मदत घेऊन त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना केला आणि स्वत:चं आसन बळकट केलं.
बरीच वर्षं स्वत:च्या राज्याचं नेतृत्व केल्यानंतर त्यांनी एनजिंगाच्या शेजारी असलेल्या मुतांबा राज्यावरही ताबा मिळवला.
शिवाय, स्वत:च्या राज्याचं रक्षणही चोखपणे केलं.
ब्राझिली आणि पोतृगाली लेखिका जोस एडुआर्डो अगआलुसा म्हणतात, "एनजिंगा या युध्दकौशल्यातही तरबेज होत्या. फक्त महान योद्धाच नव्हे तर त्या एक महान रणनितीकार आणि राजकारणी होत्या."
"त्या पोर्तुगालविरुद्ध लढल्या आणि डचांशी मात्र त्यांनी मैत्री केली. पण जेव्हा इतरांशी लढायचं असेल तेव्हा वेळप्रसंगी त्यांनी पोर्तुगालींची मदतही घेतली."
सेक्सनंतर पुरुषांना जाळलं जात असे
फ्रान्समधील तत्त्वज्ञ मार्किस दे सादे यांनी मिशनरी गिओवानी कावेजी यांच्या गोष्टींवर आधारित 'द फिलॉसॉफी ऑफ द ड्रेसिंग टेबल' हे पुस्तक लिहिलं.
कावेजी यांनी असा दावा केला की, एनजिंगा तिच्या प्रियकरांसोबत सेक्स केल्यावर त्यांना जाळून ठार मारायच्या.
मध्ययुगात ज्याप्रमाणे राजे उपभोगासाठी अनेक महिला ठेवत असत, त्याला जनानखाना म्हटलं जात असे. त्याचप्रमाणे एनजिंगा यांच्या ताफ्यातही अनेक पुरुष असत, त्याला चिबदोस म्हणत. त्यात राहणाऱ्या पुरुषांना महिलांचा पोशाख दिला जात असे.
ज्यावेळी एनजिंगाला कोणाशीही सेक्स करायचा असायचा तेव्हा त्या चिबदोसमध्ये असलेल्या पुरुषांना आपसात लढाई करावी लागत असे.
त्या लढाईत जिंकणाऱ्याला त्यानंतर जी वागणूक मिळायची ती मृत्यूपेक्षाही भयानक असायची.
त्या पुरुषांना सेक्सनंतर जाळून टाकण्यात येत असे.
अर्थात, कावेजीच्या गोष्टी या ऐकीव माहितीवर आधारित आहेत, असंही मानलं जातं. त्यात इतिहासकार असंही म्हणतात की या गोष्टीला आणखीही बाजू असू शकतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)