पाणीटंचाईचा ग्राऊंड रिपोर्ट : 'लहान मुलंही झेपेल तसं पाणी ने-आण करतात'

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"हे बाथरूम (सरकारी योजनेतून बांधून मिळालेलं संडास) मिळालं आम्हाला. आता सांगा त्याच्यासाठी पाणी कुठून आणणार. इथं प्यायला पाणी नाही अन् इतक्या लांबून आणलेलं पाणी बाथरूमला कसं वापरणार. गावातले भरपूर लोक बाहेरच जातात," विहिरीवरून नुकतंच दोन हंडी पाणी भरून आणल्यानंतर मंगल पवार यांना हे सांगताना दम लागत होता.

"एक ते दीड किलोमीटर लांबून पाणी भरायला यावं लागतं. तीनवेळा आम्हाला पाणी भरावं लागतं. दिवसभर शेतमजुरीच्या कामाला जातो. पाणी शेंदताना दम लागतो. हातपायाला गोळे येतात. ओझं वाहून आणल्यानं मान दुखते. सगळं अंगं दुखतं."

डोक्यावर पाण्यानं भरलेला हंडा घेऊन चालत येणाऱ्या सीताबाई त्यांना होणारा त्रास सांगत होत्या. घामाच्या धारेबरोबरच डोक्यावरच्या हंड्यातून हिंदकळणारं पाणी त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत होतं.

सलग चार वर्षं दुष्काळ बघणाऱ्या मराठवाड्यात पाणीटंचाईनं आणखी कठोर स्वरुप घेतलं आहे. बहतांश ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे महिलांची पायपीट अजुनही थांबलेली नाही.

बीबीसी मराठीने मराठवाड्यातील या ग्राऊंड रिपोर्टमध्ये पाणीटंचाईचा सर्वाधिक त्रास सोसणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या.

औरंगाबाद-हैदराबाद हमरस्त्यावरून जिंतूरकडे वळल्यानंतर शहराच्या बाजारपेठेतून जावं लागतं. इथूनच पंधरा किलोमीटरवर असलेल्या येलदरी धरणातून शहराला पाणीपुरवठा होता.

येलदरी धरणाच्या रस्त्यावर शेवडी आणि माणकेश्वर ही मोठी गावं. येलदरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेनेच जिंतूरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आहे. शेवडी आणि माणकेश्वर या गावांना याच जलवाहिनीचा काय तो आधार.

याच रस्त्यावर असणाऱ्या माणकेश्वर गावानं जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून गळणाऱ्या पाण्यावर अनेक उन्हाळे काढले आहेत.

टेकड्यांचा परिसर. खालच्या बाजूला उतारावर वसलेलं गाव. साधारणतः तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या. गावात बऱ्यापैकी सिमेंटचे रस्ते झालेले.

सायंकाळी आम्ही या गावात पोहोचलो तेव्हा रस्त्यावरच असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून गळणारं पाणी भरण्यासाठी हंडे घेऊन आलेली काही लहान मुलं तिथं दिसली.

थोडावेळ थांबल्यावर गावातल्या वेगवेगळ्या गल्ल्यांमधून रिकामे हंडे घेऊन येणारी ही मुलं बघून अस्वस्थ वाटलं. इथंच एका दुकानाशेजारी संजय धोपटे भेटले. माणकेश्वर ते जिंतूरदरम्यान ते सीटर रिक्षा चालवतात.

"गावातले लोक शेतात कामाला जातात. ते आता घरी येऊ लागले असतील. थोड्यावेळानं इथं तुम्हाला बाया-माणसांची गर्दी दिसेल," संजय म्हणाले.

"मग ही लहान मुलं?"

"ही होय. त्यांना जसं झेपेल तसं आपलं पाणी ने-आण करतात."

इथंच आम्हाला सुमनबाई बुधवंत भेटल्या. लग्न होऊन या गावात येऊन त्यांना तीस वर्षं झाली. तेव्हापासून दरवर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याच्या त्या म्हणाल्या.

"लोक रात्री दोन-दोन वाजेपर्यंत पाणी भरतात," सुमनबाई म्हणाल्या. त्यांनीच आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी खालच्या गावालगत शेतात एक विहीर असल्याचं सांगितलं.

तिकडं वळालो. गाव ओलांडून गेल्यावर नागंरलेलं शेत दिसलं. पलिकडं दूरवर एक विहीर आणि तिथं पाणी शेंदण्यासाठी महिलांची झालेली गर्दी नजरेच्या टप्प्यात दिसत होती.

शेताच्या कडेनं एक धुळीनं माखलेली पायवाट. गावात पाणी वाहून आणण्यासाठी महिलांना हाच रस्ता.

उसतोड मजुरीचं काम करणाऱ्या सीताबाई घाटे इथंच आम्हाला भेटल्या. गावाची सार्वजनिक विहीर आणि सीताबाई यांच्या घरादरम्यान अख्ख गाव येतं. गाव ओलांडून त्यांना पाणी न्यावं लागतं.

गावाच्या एका कडेला पक्क्या भितींच्या पत्रे टाकलेल्या दोन खोल्या. गेल्याच वर्षी घरकुलांतर्गत बांधकाम झालं. घरात एक बल्ब जमेल तेवढा उजेड पाडण्याचा प्रयत्न करत होता. सीताबाई पाण्याची खेप घेऊन आल्या तेव्हा, घरात त्यांचे पती रामराव घाटे होते.

"घर खुप लांब आहेत. त्यात दिवसाला सात-आठ हंडे पाणी प्यायला लागतं. उन्हाळ्यामध्ये पाण्यापायी हाल होतात. उन्हाचा त्रास होतो.

"पाणी खोल गेलं. विहीरीची दगडं उघडी पडलीत. दहा-बारा खेपा माराव्या लागतात. पाणी काढायला अवघड होतं.

"दिवसभर लोकाच्या शेतात मजुरीला जावं लागतं. पाणी काढताना दम लागतो. हातपायाला गोळे येतात. ओझं वाहून आणल्यानं मान दुखते. हातपाय दुखतात. एक किलोमीटरवर जायचं-यायचं. एकाच वेळेला दोन-तीन भांडी पाणी आणावं लागतं," सीताबाई यांनी सारं चित्र डोळ्यासमोर उभं केलं.

"ग्रामपंचायतीची विहीर कोरडी पडल्यानं पाणीपुरवठा बंद झाला आहे.

पाणी पुरत नाही. साऱ्या गावाला त्या एका विहिरीवरूनच पाणी आणावं लागतं. प्यायचं पाणी तेच आहे," त्या म्हणाल्या.

रामराव आणि सीताबाई हे दरवर्षी ऊसतोडीला जातात. सहा महिने गावाबाहेरच असतात. ऊसतोडीहून गावात परतल्यावर दरवर्षी पाणीटंचाई 'आ' वासून उभी असते.

मराठवाड्यात ग्रामीण भागात फिरलात तर अशा अनेक गावात ऊसतोड मजुरांची मोठ्या संख्येनं घर सापडतात. दर उन्हाळ्यात त्यांची पाण्यासाठी पायपीट ठरलेली असते.

"लेकरं बाळासकट सगळेच ऊसतोडीला जातो. मला तीन मुली आणि दोन मुलं आहेत. मागच्यावर्षी मोठ्या मुलीचं लग्न झालं. आम्हाला शेती नाही. ऊसतोडीवर जावं लागतं. सहा महिने पोटापाण्याचा प्रश्न सुटतो.

"ऊसतोडीवरून परत आलो की गावात दुसऱ्याच्या शेतावर मजूरी करतो. आता ऊसतोडीचे पैसे उचले आहेत. दिवाळीनंतर जाऊ उसतोडीला," सीताबाई यांनी माहिती दिली.

गावातले जेष्ठ शेतकरी तात्याराव काकडे यांनी गावाच्या वरच्याबाजूला सहा किलोमीटरवर धरण असूनही गावाला पाणी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

"कशाचं पाणी. घडाभर पाणी नाही मिळतं. पाणी द्या आम्हाला. दुसरं काही नका देऊ," लिंबगावमध्ये भेटलेल्या 80 वर्षाच्या आजी अगदी त्रासून बोलत होत्या.

औरंगाबाद-सोलापूर हायवेवर पाचोड हे बाजारपेठेचं गाव आहे. इथून जवळचं आठ किलोमीटरवर लिंबगाव आहे. मुख्य रस्त्यापासून थोड्या आत गावाच्या सार्वजनिक विहीरीवर महिलांची झुंबड उडालेली होती.

ग्रामपंचायतीतर्फे इथून दूरवर असलेल्या विहीरीतून पाणी उपसा करून या विहीरीत सोडलं जातं. दीड-दोन दिवसांत जेवढं पाणी उपलब्ध होईल तेवढंच गावाला मिळणार.

आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सरकारी यंत्रणेची माणसं आली असावीत असं लोकांना वाटलं. त्यामुळे अनेकांनी गावाला टँकर सुरू करा, अशी मागणी करायला सुरुवात केली.

विहीरीत पाणी नावाला. जेवढं खरडून काढता येईल, तेवढं पोहऱ्यात घेण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न. इथं आम्हाला मंगल पवार भेटल्या. त्यांच्या घरात आठ सदस्य.

गावातच विटाच्या दोन खोल्या. बाजूलाच पत्र्याचं कूड. एका कोपऱ्यात काही दिवसांपूर्वीच सरकारी योजनेतून बांधलेलं संडास. मीटर न घेतल्यानं घरात वीज नाही.

अंगणात ठेवलेल्या ड्रममधील गढूळ पाणी परिस्थिती कथन करत होती.

घराच्या आवारात गेल्या गेल्या "तुमच्या देखत आडावरून आणलं. गाळून ठेवतो आणि तेच पाणी पितो. लहानग्यांनाही हेच पाजावं लागतं," असं म्हणत मंगल पवार यांनी ड्रमकडे बोट दाखवलं.

सतत जड हंडे वाहून आणल्यानं त्या ओझ्यानं महिलांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

"उन्हात पाय पोळतात. उन्हाचा फटका बसतो. त्रास किती सांगायचा तुम्हाला. सगळं अंग दुखतं. सकाळी उठलं की चालावंस वाटतं नाही.

"एकाच वेळेस दोन-दोन भांडी डोक्यावर वाहून आणावी लागतात. खराब पाणी असलं की लहान लेकरांना जुलाब, उल्टी सुरू होतात. पाण्याची सोयच नाही या गावात. सांगाल तेवढं कमी आहे," मंगलताई सांगत होत्या.

"दररोज सकाळी झाडाझूड झाली की पाण्याचे हंडे घेऊन बाहेर पडावं लागतं. घरात आठजण आहेत. या सगळ्यांसाठी मला एकटीला पाणी आणावं लागतं.

हागणदारीमुक्त गावाअंतर्गत मंगल पवार यांच्या कुटुंबासाठी संडास मंजूर झाला. सहा महिन्यांपूर्वी संडास बांधण्यात आला.

"हे बाथरूम (सरकारी योजनेतून बांधून मिळालेलं संडास) मिळालं आम्हाला. आता सांगा त्याच्यासाठी पाणी कुठून आणणार. इथं प्यायला पाणी नाही अन् इतक्या लांबून आणलेलं पाणी बाथरूमला कसं वापरणार. गावातले भरपूर लोक बाहेरच जातात," अशी माहिती मंगल पवार यांनी दिली.

"जसं लग्न होऊन या गावात आले तसं मी डोक्यावरून पाणी वाहून आणू लागले. दिवसातून दोनवेळेस पाण्याच्या खेपा टाकाव्या लागतात.

"आता शेतात कामं चालू आहेत. तेवढ्याच पाण्यावर भागवावं लागतं. घरी राहिलो की धुण्याभांड्याला, आंघोळीला पाणी लागतं. एक ते दीड ड्रम पाणी वापरायला लागतं. घरातलं सगळी भांडी भरून ठेवावी लागतात. ते पण पुरत नाही. परत रात्री शेतातून आलं की प्यायचं पाणी आणायला जावं लागतं," मंगलताई यांनी सगळा दिनक्रम सांगितला.

"ग्रामपंचायतीचं पाणी अर्ध्या हिवाळ्यापर्यंत टिकतं. मग आडावरून वाहून आणावं लागतं. हा पाणी प्रश्न कधी सुटेल? आमची समस्या मांडा तुम्ही सगळी."

"गावातल्या सगळ्याच बायकांना पाण्याचा त्रास आहे. आडावर आमच्यासारख्या बायकांना तरी दोन हंडे पाणी भरता येतं. पण म्हाताऱ्या बायांनी काय करावं," आडात असलं तरी पोहऱ्यात पाणी सहजासहजी मिळत नसल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं.

लिंबगावला 2012मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरी आजही ती योजना पूर्ण झालेली नाही. फक्त विहीर बांधून झाली आहे.

दोन दिवसांतून एकदा विहीरीत पाणी सोडलं जातं. त्याच पाण्यावर गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न होतो. 1 मे पासून टँकरची मागणी करूनही टँकर मिळाला नसल्याची माहिती सरपंच नंदा पवार यांनी दिली.

लिंबगावपासूनच तीन-चार किलोमीटर अंतरावर रांजणगाव दांडगा हे गाव आहे. या गावाच्या अलिकडंच मुस्लीम समाजातील शेतकऱ्यांची वस्ती आहे. या वस्तीचा पाण्याचा स्त्रोत हा तिथून अर्धा किलोमीटरवर असलेली एकमेव विहीर हाच आहे. इथं आम्हाला पन्नाशीच्या गुलशन आपा भेटल्या.

सुरूवातीला विहीरीवर जमलेल्या महिलांना सरकारी खात्याचंच कुणीतरी आल्याचं वाटलं. त्यांनी टँकरचं पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.

"दिनभर पाणीकी खेपा मारते. गंदे पाणी को देखनेकू दिल नही बोलता. बच्चे बिमार होरे. एकबार का खाना नही हूआ तो चल्ता पर अच्छा पाणी दो हमकू," एका दमात गुलशन आपांनी सारं सांगितलं.

"दररोज शेतातल्या विहीरीवर पाण्यासाठी यावं लागतं. आता रोजे सुरू झाल्यानं पाणी घेऊन जाणं अवघड झालं आहे. घसा कोरडा पडतो. पाय दुखतात. चक्कर आल्यासारखं होतं. मग दोनऐवजी एकच हंडा घेऊन जाते.

"सहा दिवसांनी टँकर वस्तीवर येतो. पाणी पण भरू देत नाही. सहा दिवसांपर्यंत त्यात जंतू होऊन जातात. उपवासाला कसं काय हे पाणी प्यायचं आम्ही," त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

महिलांमध्ये किडनी आणि मणक्यांचे आजार

"कोसो दूरवरून डोक्यावरून पाणी वाहून आणण्याने महिलांमध्ये मणक्याचे आणि हाडांशी संबधित आजार बळावतात. अशुद्ध पाण्यामुळे मुतखड्यासारखे किडनीशी निगडित आजारही उद्भवतात," अशी माहिती डॉ. अमोल अन्नदाते यांनी दिली.

वैजापूर तालुक्यात (औरंगाबाद) मुतखड्याचा आजार असलेल्यांचं प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक माहिती डॉ. अन्नदाते यांनी दिली.

"विहीरीतल्या किंवा बोअरच्या पाण्यात क्षार आढळतात. आपण खरडून खरडून पाणी उपसत असल्यानं यातून जंतूसंसर्गाचा धोका जास्त असतो.

"या भागात मुतखड्याचं प्रमाण फार जास्त आहे. वैजापूर तालूक्यात आम्ही घेतलेल्या 25 ते 30 कॅम्पमध्ये ही बाब प्रकर्षानं समोर आली. आपण पाण्याचा कमतरतेमुळे कमी पाणी पितो. त्यामुळे लघवीतल्या मार्गानं जंतुसंसर्गांचं प्रमाण वाढतं.

"कडक उन्हात लांब चालत जायचं, पाणी काढायचं, डोक्यावर वाहून आणायचं या सगळ्या प्रक्रियेत पाणी आणणाऱ्या महिलांची स्वतःची शरिरातील पाण्याची गरज प्रचंड वाढते.

"बहूसंख्य महिलांना अॅनिमिया असतो. शरिरात रक्त कमी असते. ग्रामीण भागात बहूतांश महिलांमध्ये ही समस्या आहे. यामुळे लवकर दम लागतो. चालायला त्रास होतो. थकवा येतो. बऱ्याच महिलांच्या याच तक्रारी असल्याचं जाणवतं.

"डोक्यावर पाणी वाहून आणण्यामुळे सर्व्हायकल स्पाँडेलिसिसचे आजार महिलांमध्ये वाढले आहेत. आधीच कॅल्शियमचं प्रमाण कमी त्यात जास्त चालल्याने हाडे दुखायला लागतात. अतीश्रमामुळे हाडं ढिसूळ होत असल्याचं बघायला मिळालं," अशी माहिती डॉ. अन्नदाते यांनी दिली.

मराठवाडा आणि पाणीटंचाई

मराठवाड्यात 2016च्या दुष्काळात तब्बल चार हजारावर टँकर धावत होते. यावर्षी 2018मध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 373 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला होता. मे महिन्याच्या शेवटी हाच आकडा 800 टँकरपर्यंत आला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)