You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘माझं एक सिक्रेट आहे, या गोष्टीबद्दल मी माझ्या जीवलगाशी कायम खोटं बोलते’
आजही जर बाई पुरुषापेक्षा जास्त पैसे कमवत असेल तर पुरुषाचा इगो दुखावतो. अशा परिस्थितीत आपण स्त्री-पुरूषांच्या वेतनातली तफावत कशी कमी करणार? UKमधील एका स्त्रीने मांडलेले तिचे अनुभव. लेखिकेच्या इच्छेनुसार तिचं नाव उघड करण्यात आलेलं नाही.
माझं एक सिक्रेट आहे. खरं पाहाल तर त्यात सिक्रेट ठेवण्यासारखं काही नाही. पण एका गोष्टीविषयी मी माझ्या जीवलगाशी कायम खोटं बोलते. ती गोष्ट म्हणजे माझा पगार.
माझा बॉयफ्रेण्ड आणि मी एकत्र राहतो. आम्ही सगळंच एकमेकांबरोबर शेअर करतो. आमचं घर, सामान, बँक अकाऊंट, आशा-आकांक्षा, स्वप्न, अगदी आत खोल दडलेली भीतीही... फक्त एक बाब सोडून.
मला माझ्या साथीदाराविषयी सगळं माहिती आहे, अगदी अशा गोष्टी ज्या मला कधीच माहीत करून घ्यायच्या नव्हत्या - जसं काही काळ त्याचे दुसऱ्या बाईशी असणारे संबंध.
त्यालाही मी दारुच्या नशेत केलेल्या सगळ्या मूर्खपणाविषयी माहिती आहे. असा मूर्खपणा जो मी विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहे.
प्रेम आणि संपूर्ण पारदर्शकता
पण मी त्याला एक गोष्ट सांगितली नाही कधी. माझा पगार. माझ्या अस्तित्वाचा एक मोठ्ठा भाग मी माझ्या साथीदारापासून का लपवून ठेवतेय?
2017 साली या विषयावर एक सर्व्हे झाला होता. त्यात एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली होती. मिलेनियल म्हणजे 90च्या दशकात जन्मलेल्या मुलींना त्यांच्या पुरुष साथीदारांपेक्षा जास्त पगार मिळवण्याची भीती वाटत होती.
सर्व्हेत सहभागी झालेल्या मुलीने तिचं नाव न सांगण्याच्या अटीवर हेही सांगितलं की, जेव्हा तिला कळलं की तिला तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त पगार आहे तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. आपण जास्त कमावतो याची तिला लाजही वाटली.
अर्थातच या सर्व्हेनंतर ट्विटरवर तुफान खडाजंगी झाली. काही लेखही प्रसिद्ध झाले की, आजकालच्या मुलींना त्यांच्या पुरुष साथीदारांपेक्षा जास्त पैसा कमावण्यात ना कसली भीती वाटत ना लाज. 2018 आहे यार, आपण सगळेच स्त्री-पुरुष वेतनात समानता यावी म्हणून झगडतोय. नवऱ्यापेक्षा जास्त कमावणाऱ्या बाईचं अर्थातच कौतुक आहे.
हीच सगळी बडबड मी माझ्या मित्र-मैत्रिणींसमोर आणि सोशल मीडियावरही केली. मी म्हटलं की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणावर, पुरुषांकडे कायम स्त्रियांपेक्षा जास्त हक्क असण्यावर एकच उपाय आहे - स्त्री-पुरुषांचं वेतन समान असावं. जास्त नाही तरी निदान समान वेतन मिळावं महिलांना.
मी घडाघडा आकडेवारीही म्हणून दाखवली की वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या सांगण्यानुसार आत्ता असलेली वेतनातली असमानता पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी किमान 217 वर्ष जावी लागणार आहेत.
पण प्रत्यक्षात काय केलं मी? माझा पगार लपवून ठेवला. लोका शिकवे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!
सध्या मी आणि माझा बॉयफ्रेण्ड कुठेतरी फिरायला जाण्याची आतुरेने वाट पाहात आहोत. अगदी पहिल्यांदा एकमेकांना भेटलो तेव्हापासून ते आजतागायत आम्ही कुठेही फिरायला गेलेलो नाही. आम्हाला कधी परवडलंच नाही. आम्ही फक्त काम, काम आणि कामच करत राहिलो.
पण आता असं झुरत बसायची आम्हाला गरज नाही. मला एक चांगली नोकरी मिळाली, माझा पगार वाढला आहे. आता आम्हाला सुट्टी घालवण्यासाठी कुठेतरी फिरायला जाणं शक्य आहे. आमच्या दोघांचा खर्च मला परवडू शकतो.
पण हे स्पष्टपणे माझ्या बॉयफ्रेण्डला सांगण्याऐवजी मी गप्प राहिले. मी माझ्या बचत खात्यात 5000 पाऊंडस साठवले आहेत आणि याबद्दल त्याला काहीही माहित नाहीये. त्याला वाईट वाटेल या भीतीने मी सांगितलंच नाही.
मी जेव्हा माझ्या बॉयफ्रेण्डला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याच्यापेक्षा माझा पगार 20,000 पाऊंडसने जास्त होता. तो माळीकाम करतो आणि मी एका प्रकाशन संस्थेत काम करते.
आमच्या 6 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये फक्त एकदाच 2016/17 मध्ये त्याला माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. कारण मला जे आवडतं ते काम करण्यासाठी मी कमी पैशात एका ठिकाणी काम करायला होकार दिला.
आता आम्ही सोबत राहातो. आमच्यापैकी कोणी एक मरेपर्यंत आम्ही सोबत राहू अशी आमची आशा आहे आणि तरीही त्याला माझ्या पैशांबद्दल काहीही माहिती नाही.
का म्हणाल तर ती गंमतच आहे. ज्यावेळेस माझा साथीदार घरातला 'कमावता पुरुष' होता तेव्हा आमचं नातं सगळ्यात घट्ट होतं.
तो मला खर्चायला पैसे द्यायचा. आम्ही फिरायला गेलो की खर्च करायचा. आम्ही बाहेर जेवलो की बीलही तोच भरायचा आधी कधी कधी मला कपडेही घेऊन द्यायचा. मला ते कधीच आवडलं नाही.
तो अधून-मधून बोलून दाखवायचा की माझ्यामुळे त्याचा कसा खर्च होतो आहे, पण आत कुठेतरी असा 'कर्ता पुरुष' असणं त्याला फार सुखावत होतं.
माझ्या गरजा पूर्ण करता न येणं हा त्याला कमीपणा वाटतो हेही त्याने बोलून दाखवलं.
त्यावर्षात मी काही फारसे पैसे कमावत नव्हते. पण माझ्या कामासाठी मला एक अवॉर्ड मिळालं. तो मनापासून खुश झाला. आणि असं वाटलं की माझ्या यशात थोडाफार त्याचाही हातभार लागला कारण त्याने माझी आर्थिक जबाबदारी उचलली होती. त्याशिवाय हे शक्य झालं नसतं.
मला आठवतं, आम्ही माझा वाढदिवस सेलिब्रेट करायला बाहेर गेलो होतो. येताना त्याने कॅबचे पैसे दिले. आम्ही घरी आलो आणि त्या दिवशीच्या सेक्सचा आनंद काही वेगळाच होता.
खरं म्हणजे त्या संपूर्ण वर्षभरात सेक्सचा आनंद अवर्णनीय होता. जसं काही आम्ही एक बॅलन्स साधलाय. त्याने करायचं काम तो करतोय आणि मी करायचं काम मी.
माझा बॉयफ्रेण्ड अत्यंत हुशार आहे. त्याच्या परीने तो यशस्वीही आहे. आणि मला माहितेय की माझ्या यशाचा त्याला अभिमान आहे. पण मला त्याची 'गरज' आहे ही भावना त्याला खूप आवडते. म्हणूनच कदाचित मी त्याच्यापासून सत्य लपवते.
मी त्याला आजतागायत खरं का सांगितलं नाही? त्याच्या बाजूला पडल्या पडल्या हा विचार करत मी कित्येक रात्री जागून काढल्या आहेत.
मला नक्की काय हवंय मग? चांगला प्रश्न आहे. बरं, मी एकटीच ढोंगी नाही. आजही ज्या स्त्रिया कमावत्या आहे आणि त्यांच्या कमाईवर घर चालतं, त्या स्वतःच्या कमाईची माहिती द्यायला का-कू करतात.
2016 साली हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की ज्या कुटुंबात नवरे पार्ट-टाईम काम करतात किंवा अजिबात काम करत नाहीतच त्या कुटुंबांमध्ये नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते.
या सर्वेक्षणाची लेखिका अॅलेक्झांड्रा किलवाल्ड लिहितात की, "घरात कमवता आणि कर्ता पुरुषच असला पाहिजे अशी ठाम धारणा असल्यामुळे असं होतं."
माझ्या घरात काही श्रीमंती वाहून जात नव्हती. माझ्या खात्यात जे मी चार-दोन पैसे साठवले आहेत ते फार नाहीयेत. रिहाना, बियॉन्से आणि मेगन मर्कलच्या संपत्तीच्या तुलनेत तर नाहीच नाही.
पण मी माझ्या घरच्यांना पै-पै वाचवताना पाहिलं आहे. दारावर देणेकरी येऊन उभे राहिले की कसं वाटतं ते मी अनुभवलंय आणि माझ्या आईला तिच्या सगळ्या मौल्यवान गोष्टी, दागिने फोनवरून विकताना ऐकलंय. त्यामुळे माझ्या खात्यात जी काही साठवलेली रक्कम आहे ती माझ्यासाठी फार मोठी आहे.
माझे आई-वडील दोघ गरीब घरातून आले. पण नंतर, ऐशीच्या दशकात माझ्या वडिलांनी बँकिंग क्षेत्रात खूप पैसा कमावला. त्यांचं शिक्षण काही विशेष झालेलं नव्हतं पण त्यांनी जेवढा पैसा कमावला तेवढा आमच्या अख्ख्या खानदानात कोणी पाहिला नव्हता.
पण नव्वदच्या दशकात माझे वडील सर्वस्व हरले. त्यांची नोकरी गेली, आणि मग आमचं घरही.
काही वर्षं हलाखीत काढल्यानंतर माझ्या आईने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता घरातली 'कमावती' ती झाली होती. याच गोष्टीमुळे नंतर माझे आई-वडील वेगळे झाले. का? कारण माझ्या वडिलांच्या पुरुषी इगोला हे सहन झालं नाही की माझी आई त्यांच्यापेक्षा जास्त कमावते आणि तिच्या पैशावर घर चालतं.
ते लोकांना सांगायचे की, आईचा बिझीनेस खरं तर तेच चालवतात. त्यांची भांडण व्हायची कारण आईने आठवड्याच्या खर्चाला दिलेले पैसे ते एका दिवसात उडवून टाकायचे. त्यांचे वादही मी ऐकले आहेत. मी लहान होते तरी या सगळ्या प्रकारावर माझे आजोबा कसे कुत्सित टोमणे मारायचे तेही मला कळायचं.
माझ्या आईच्या पैशावर घर चालायला लागलं तेव्हा काय झालं ते मी लहान असताना पाहिलं. आताचं म्हणाल तर बाई पुरुषापेक्षा जास्त पैसा कमवत असली की काय होतं हे मी माझ्या जवळच्या मैत्रिणींच्या बाबतीत पाहतेय.
माझी एक मैत्रीण आहे मेलिसा (नाव बदललेलं आहे). ती यशस्वी फ्री-लान्सर फोटोग्राफर आहे. गेल्या काही वर्षांत तिने स्वतःच्या पैशाने घर घेतलं. तिचा बॉयफ्रेण्डला नोकरी नव्हती तेव्हा त्याला सपोर्ट केला. ते सुट्टीवर गेले तेव्हा खर्च केला. बिलं भरली, अगदी घरचा किराणाही भरला.
चारचौघात तो हेच म्हणतो की 'सक्षम स्त्री' बरोबर राहाणं त्याला खूप भावतं. पण प्रत्यक्षात तो माझ्या मैत्रिणीला मानसिकरीत्या किती छळतो ते मी पाहिलंय. जेव्हाही ती कामासाठी किंवा शूटसाठी बाहेर जाते तेव्हा तो माझ्या मैत्रिणीचं मानसिक खच्चीकरण करणारे मेसेज पाठवतो.
अजून एक मैत्रीण आहे, तिला आपण कायली म्हणू. ती मॅनेजमेंट कन्सलटंट आहे आणि तिच्या माजी बॉयफ्रेण्डपेक्षा दुप्पट कमवतेही. तेही सहजपणे.
मी 'माजी' म्हटलं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. शेवटी कायलीच्या बॉयफ्रेण्डने तिला सोडलंच. ती स्वतःच मोठं घर सोडून त्याला बरं वाटावं म्हणून एका स्वस्तातल्या फ्लॅटमध्ये राहायला गेली. तरीही त्यांचं नातं संपलं.
त्यानंतर ती आत्ता आत्तापर्यंत डेटवर गेल्यानंतर तिचा पगार सांगायला घाबरायची.
मी तिला सांगते की, तुझ्या पगाराची तुला लाज वाटायला नको. तू जशी आहेस तशी राहा, कोण काय म्हणत हा विचार करुन दबून राहून नकोस. हे मी तिला सांगते आणि स्वतः आचारणात आणत नाही कारण मला माहितेय ती सिंगल आहे. मी सिंगल असते तर मीही तेच केलं असतं.
बाई घर चालवत असली की काय होतं हे मी माझ्या जवळच्या लोकांच्या अनुभवावरून पाहिलं आहे. माझा बॉयफ्रेण्ड जेव्हा घर चालवत होता तेव्हा त्याच्या वागण्यातला बदल मी अनुभवला आहे. त्यामुळेच माझ्या पगारचं सत्य मी माझ्या साथीदाराला सांगवं की नाही याविषयी माझी द्विधा मनस्थिती आहे.
मला लाज पण वाटते. लाज वाटते कारण मी माझ्या साथीदाराला पूर्ण सत्य सांगत नाहीये. त्या माणसापासून गोष्टी लपवतेय ज्याला खरं तर मी सगळं काही आडपडदा न ठेवता सांगायला हवं. पण त्याहीपेक्षा जास्त मला या गोष्टीची लाज वाटते की मी त्या जगात राहाते की ज्यात अजूनही यशस्वी स्त्रीला असं जगावं लागतं.
स्त्री-पुरुष वेतनातला फरक आपण कसा भरून काढणार जर सर्वाधिक पैसा कमवणाऱ्या स्त्रिया सोडा, साध्या माझ्यासारख्या स्त्रिया आपल्या साथीदारांचा इगो न दुखावता काही हजार पाऊंडस पण जास्त कमावू शकत नाहीत?
वैयक्तिक आयुष्यात माझी खूप इच्छा आहे की माझा बॉयफ्रेण्ड आणि मी समान पातळीवर असावेत. माझ्या उत्पन्नविषयी त्याला खुलेपणाने सांगता यावं. ही भीती नसावी की माझा पगार त्याला कळाला तर तो माझा तिरस्कार करेल.
पण मला आयुष्यभर त्याच्यापेक्षा जास्त कमवायचा दबाव नकोय. मला त्याला जबाबदारी नकोय, त्याने माझी जबाबदारी घेऊ नये. आम्ही समान असावं, मग आमच्या बँकेत काहीही बँलन्स का असेना.