You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबाद ऑनर किलिंग : 'तिच्या घरचे आम्हाला मारुन टाकतील याची आजही भीती वाटते'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गगन आणि प्रीती यांनी 2017 मध्ये आंतरजातीय विवाह केला. पण, लग्नाला 4 वर्षं उलटून गेले तरी त्यांच्या मनातील भीती कायम आहे.
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगावमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या तरुणीनं घरच्यांच्याविरोधात जात प्रेमविवाह केला होता.
या घटनेविषयी विचारल्यावर गगन म्हणाले, "अशा घटना ऐकल्या की बायकोच्या घरचे आम्हाला मारतील अशी भाती आजही वाटते. कारण या अशा प्रवृत्तीवर विश्वास ठेवता येत नाही.
"औरंगाबादसारखी घटना ऐकली की आजही अंगावर काटा येतो. या अशा लोकांवर आपण विश्वास नाही ठेवू शकत. सख्ख्या बहिणीला मारणारा माणूस कुणालाही मारू शकतो. खरं तर प्रेमविवाह करताना मुलगा किंवा मुलगी आपलेच घरचे आपल्याला ठार मारतील, असा विचार करू शकत नाही. पण, हे असं झालं की जुनं सगळं आठवायला लागतं."
2018मध्ये बीबीसी मराठीनं या जोडप्याची बातमी कव्हर केली होती. औरंगाबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ती पुन्हा शेयर करत आहोत.
नगर जिल्ह्यातलं एक गाव. पाटोळे आणि पाटील कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहत. अशातच पाटील कुटुंबीयांची लेक प्रीती आणि पाटोळे कुटुंबातला मुलगा गगन यांची नजरानजर झाली.
इतरांच्या नजरा चुकवून ते एकमेकांकडे बघायला लागले, एकमेकांकडे पाहून हसायला लागले. नंतर याचं रुपांतर प्रेमात झालं आणि आयुष्य सोबत घालवण्याची त्यांनी खूणगाठ बांधली. पण मध्येच माशी शिंकली.
"लग्नाचा विषय निघाला की मी घरच्यांना आमच्याबद्दल सांगायचं ठरवलं होतं. पण मी सांगायच्या अगोदरच कुणीतरी माझ्या वडिलांना आमचं सुरू आहे म्हणून सांगितलं. हे ऐकून वडिलांनी मला त्यांच्या गावाबाहेरच्या फॅक्टरीत डांबून ठेवलं," घरच्यांना प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर काय घडलं, ते प्रीती सांगत होत्या.
"तुला काय करायचं आहे? असं मला घरच्यांनी विचारलं. मी म्हटलं, मला गगन आवडतो. माझं त्याच्याशी लग्न लावून द्या. मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की, तू असं केलं तर आम्ही त्याला मारून टाकू. तू आमची मुलगी आहेस म्हणून तुला समजावून सांगत आहोत. तुझ्यासाठी आम्ही त्याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधू," प्रीती पुढे सांगत होत्या.
ताटातूट
नंतर प्रीती यांना काही दिवस मामांकडे पाठवण्यात आलं. मग त्यांची रवानगी पुण्यातल्याच त्यांच्या मावशीकडे करण्यात आली. त्यांचा मोबाईल काढून घेण्यात आला.
"मावशीच्या घरचे मला तिच्या नणंदेच्या मुलाशी बळजबरीनं बोलायला लावायचे. तो मुलगा पुण्यात नोकरीला होता आणि मी त्याच्याशी लग्न करावं म्हणून घरचे मागे लागले होते. माझी इच्छा नसतानाही घरचे त्याला फोन करायचे आणि मला त्याच्याशी बोलायला लावायचे," प्रीती मावशीकडल्या दिवसांबद्दल सांगत होत्या.
"मामाच्या घरी गेले तर आजीनं सणकन माझ्या कानाखाली लावली. 'गगनचं नाव परत काढलंस तर तुला विष पाजू,' अशी धमकीही तिनं मला दिली," प्रीती सांगत होत्या.
प्रीती तिकडे अडकलेल्या असताना गगन नगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. प्रीती यांचा फोन लागत नाही म्हटल्यावर त्यांचं मन लागेना.
प्रीतीच्या शोधात...
शेवटी प्रीती मुंबईच्या मावशीकडे असल्याचं गगन यांना कळलं. प्रीतीच्या मैत्रिणीनं त्यांना ही बातमी दिली होती.
"प्रीती मुंबईला आहे आणि आता तिचं लग्न ठरलं आहे. तिला नोकरीवाला नवरा मिळाला आहे आणि ती खूश आहे, असं मला प्रीतीच्या मैत्रिणीनं सांगितलं. हे ऐकल्यानंतर मला धक्काच बसला. त्यानंतर मी थेट मुंबई गाठली. तिथं 8 दिवस प्रीतीच्या मावशीच्या घरावर नजर ठेवून होतो. पण ती काही दिसली नाही," गगन त्या दिवसांच्या घालमेलीबद्दल सांगत होते.
प्रीती मुंबईमध्ये नसल्याचं गगन यांच्या नंतर लक्षात आलं. प्रीतीच्या पुण्यातल्या मावशीनं तिच्या एका मैत्रिणीकरवी गगन यांना खोटी माहिती दिली होती.
"काही दिवसांनंतर प्रीतीनं मला कॉल केला. घरचे जबरदस्तीनं माझं लग्न लावून द्यायच्या विचारात आहे, असं तिनं मला सांगितलं. तसंच पुण्यातला तिचा पत्ताही दिला. मग आम्ही पळून जायचा प्लॅन केला," गगन सांगत होते.
'अन् आम्ही पळून आलो...'
"10 ते 12 दिवसांनी एक गाडी घेऊन मी आणि माझे दोन मित्र नगरहून पुण्याला गेलो. मावशीच्या घराचा पत्ता प्रीतीनं सांगितलेला होताच. प्रीतीनं दुकानात जायचं निमित्त केलं आणि घरातून बाहेर पडली. आमची गाडी तिच्या मावशीच्या घरापासून 400-500मीटरच्या अंतरावर उभी होती. प्रीती आली आणि आम्ही तिथून पळालो. पुढे दुसऱ्या एका शहरात जाऊन आम्ही तिथल्या संस्थेच्या मदतीनं आंतरजातीय विवाह केला," गगन लग्नाबद्दल सांगत होते.
"मी मराठा आणि गगन दलित समाजातला असल्यानं आमच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यांनी तर गगनला संपवायचा प्लॅन केला होता. माझं मावशीच्या नणंदेच्या मुलाशी लग्न करून त्यांनी गगनला मारून टाकायला प्लॅन बनवला होता. पण दोघंही मेलो तरी बेहत्तर पण दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं नाही असं मी ठरवलं होतं," प्रीती सांगत होत्या.
'सैराटसारखे चित्रपट पाहिल्यावर वाटलं की...'
"सैराट पाहिला त्यावेळी खूपच भीती वाटली. कारण त्याच दरम्यान आम्ही लग्न करण्याचा विचार करत होतो. पण मरणासाठी थोडंच कुणी लग्न करतं. आम्ही तर एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यासाठी लग्न करणार होतो. पण तरीही भीती वाटत होती. बायकोकडची मंडळी आमचंही सैराटसारखं करणार नाही ना," सैराट पाहिल्यावर काय वाटलं यावर गगन सांगत होते.
सैराट तुम्हाला आंतरजातीय प्रेमप्रकरणाबद्दल सावध करतो, असं गगन पुढे सांगत होते. तर सैराट पाहिल्यानंतर भीती वाटली, असं प्रीती यांचं म्हणणं होतं.
"तीच भीती आजही आम्हाला वाटते. केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. आपल्या समाजात जातीभेद खूप खोलवर आहे. पण आई-वडिलांनी आपली मुलगी कुणावर प्रेम करत असेल तर टोकाचं पाऊल न उचलता स्वत: पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून द्यायला हवं," प्रीती सांगत होत्या.
(सुरक्षेच्या कारणास्तव या बातमीतील जोडप्याचं आणि स्थळांची नावं बदलण्यात आली आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)