क्रोएशिया : मॅच गमावली पण राष्ट्राध्यक्षांचं 'चक दे' लक्षात राहिलं

    • Author, रोहन टिल्लू
    • Role, बीबीसी मराठी

तुम्हाला इतिहासाच्या एका धड्यात शिकलेला बाल्कन प्रदेश आठवतो का? अनेकांना हा प्रदेशच काय पण या प्रदेशातले देशही युरोपच्या नकाशावर दाखवता येणार नाहीत. पण याच बाल्कन राष्ट्रांपैकी एका राष्ट्राने गेले काही दिवस संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हे राष्ट्र म्हणजे रशियातल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध जिगरबाज खेळी करणारं क्रोएशिया! या सामन्यात क्रोएशिया हरला खरं, पण त्यांच्या खेळाडूंनी मैदानात जे गमावलं, ते त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी मैदानाबाहेर कमावलं.

क्रोएशियाच्या प्रत्येक सामन्यादरम्यान त्यांची जर्सी घालून त्यांच्या खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या कोलिंडा ग्राबर-कितारोविच यंदाच्या फिफा वर्ल्डकपचं आकर्षण ठरत होत्या. इकॉनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या, सामान्य प्रेक्षकांसाठीच्या स्टँडमध्ये बसूनच मॅच बघणाऱ्या कोलिंडा क्रोएशियाच्या अंतिम सामन्याआधीपासूनच चर्चेत होत्या.

पण अंतिम सामन्यात क्रोएशिया हरल्यानंतरही फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांचं अभिनंदन करण्यापासून ते सगळ्या खेळाडूंना मेडल देण्याच्या सोहळ्यापर्यंत कोलिंडा यांची खिलाडू वृत्ती सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनली.

राष्ट्रप्रमुखाच्या वागण्यातून राष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिबिंब

देशाचा प्रमुख एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेतल्या सामन्यांना हजेरी लावून आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य उंचावतो, ही नक्कीच कौतुकास्पद बाब असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि क्रीडा अभ्यासक राजदीप सरदेसाई सांगतात.

"युरोप-अमेरिकेत ही बाब काही नवीन नाही. पण कोलिंडा ग्राबर-कितारोविच यांनी एक वेगळंच उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. त्या अत्यंत मोकळेपणे वावरत होत्या. वास्तविक त्यांच्या देशाचा पराभव झाला होता. तरीही त्या हसतमुखाने सामोऱ्या गेल्या. 'आपण हरलो असलो, तरीही उत्तम खेळ करून हरलो आहोत' हा संदेशच त्यांनी आपल्या देशवासीयांना दिला," राजदीप सांगतात.

राष्ट्रप्रमुखांच्या या वागण्यातूनच राष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिबिंब उमटतं, असंही राजदीप यांना वाटतं.

"क्रोएशियामध्ये त्यांच्या पराभवाचे पडसाद उमटले नाहीत. उलट तिथल्या प्रसारमाध्यमांनीही आपल्या संघाचं कौतुकच केलं. यात कोलिंडा यांनी हा पराभव स्वीकारणं आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्याचा आनंद साजरा करणं, या गोष्टींचा मोठा वाटा आहे," राजदीप म्हणतात.

"युरोपमध्येही जर्मनीसारख्या काही देशांमध्ये लोक पटकन एकमेकांबरोबर मोकळे होत नाहीत. ब्रिटिश शिष्टाचारातही हे वागणं बसत नाही. त्यामुळे क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वागण्यामुळे त्या देशातल्या संस्कृतीचा एक कवडसा जगाला बघायला मिळाला," असं क्रीडा मानसशास्त्रज्ञ वरदायिनी गोऱ्हे सांगतात.

कोलिंडा यांचं वागणं म्हणजे एक ठाम विधान!

हाच मुद्दा थोडा पुढे नेत गोऱ्हे सांगतात, "एवढ्या मोठ्या स्पर्धेत एखादा देश हरला, तर खूप नकारात्मक पद्धतीने लोक प्रतिक्रिया देतात. पण या वेळी देशाचा प्रमुखच आपल्या संघाबरोबर ठामपणे उभा राहिला आणि पाठिंबा दिला, तर चित्र बदलतं, हे आपल्याला काल दिसलं. ही फक्त खेळासाठीच नाही, तर त्या देशासाठीही प्रचंड सकारात्मक गोष्ट ठरते."

"क्रोएशियाच्या अध्यक्षांऐवजी फक्त संघ तिथे असता आणि संघाने आपला पराभव अशा खिलाडूवृत्तीने स्वीकारला असता, तर क्रोएशियात त्याचे गंभीर पडसाद उमटले असते. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या देशाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे तिथे चित्र बदललं," गोऱ्हे म्हणतात.

"कोलिंडा यांनी फक्त आपल्या देशाच्या टीमलाच पाठिंबा दिला, असं नाही. त्यांनी फ्रान्सच्या खेळाडूंचं आणि प्रशिक्षकांचंही कौतुक केलं. हे खरंच एक ठाम विधान होतं. आम्ही हरलो असलो, तरी प्रतिस्पर्ध्यांनी उत्तम खेळ केला आहे. त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, हा विचार त्यामागे नक्कीच होता," राजदीप सांगतात.

भारतात मात्र VIP संस्कृतीच

भारतात 2011मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलदरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्र होते. त्या वेळी भारत जिंकल्यानंतर आपल्या राष्ट्रप्रमुखांनी अत्यंत संयतपणे आनंद व्यक्त केला होता.

याबाबत बोलताना राजदीप म्हणतात, "आपल्या संस्कृतीत आपण एवढ्या मोकळेपणे आनंद व्यक्त करत नाही. त्यापुढे जाऊन आपल्याकडे VIP संस्कृती मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आपले नेते फक्त पारितोषिक वितरणात पुढे असतात. लोकांशी असलेला त्यांचा संपर्कच तुटल्यासारखा वाटतो. कदाचित तो आपल्या संस्कृतीचाच भाग बनला असावा."

"IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकले तेव्हा ममता बॅनर्जी मोकळेपणाने त्या जल्लोषात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील शाळेतल्या मुलांबरोबर सेल्फी वगैरे काढतात. हा अपवाद म्हणायला हवा," राजदीप नमूद करतात.

घरच्या आघाडीवर मात्र टीका

क्रोएशियाच्या प्रसारमाध्यमांमध्ये मात्र आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या या वागण्यावर काहीशी टीकाच झाली. Dnevnik.hr या वेबसाईटने 'सामन्यानंतर आमच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रसिद्धीचा झोत खेळाडूंवरून आपल्याकडे वळवला का?' अशा मथळ्याचा लेख प्रसिद्ध केला.

या लेखात गॅब्रिएला किसिक या संपर्कतज्ज्ञांनी तर आपल्या राष्ट्राध्यक्षांना 'तु्म्ही जरा अतीच वागलात' अशा कानपिचक्या दिल्या.

या लेखात म्हटलंय, "एखाद्याने अशा मोठ्या इव्हेंटमध्ये स्वत:ची प्रतिष्ठा जपायला हवी. असं नाही की, तुम्ही आपल्या भावना व्यक्त करू नका. पण येणाजाणाऱ्या प्रत्येकाला मिठी मारून त्याचं चुंबन घेण्याची काहीच गरज नाही."

तसंच Tportal.hr या वेबसाईटनेही काहीसा टीकेचा सूर लावला होता. पण तो त्यांच्या वागण्याबद्दल नव्हता, तर राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कुटुंबालाही तिथे नेलं, त्याबद्दल होता.

राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्याआधी कोलिंडा ग्राबर-कितारोविच अमेरिकेत क्रोएशियाच्या सदिच्छा दूत म्हणून कार्यरत होत्या. त्या वेळी त्यांच्या पतीवर सरकारी गाडी खासगी कामासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगानेच ही टीका झाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)