FIFA World CUP 2018 : मैदानावर आणि मैदानाबाहेर उद्भवले हे वाद

    • Author, फर्नांडो ड्युरेट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, मॉस्को

FIFA World CUP 2018 निमित्तानं तुम्ही रात्री जागून काढल्या असतील. स्पर्धेच्या आधी विजयाचे दावेदार असणाऱ्या संघांचं स्पर्धेतून बाहेर पडणं आणि क्रोएशिया सारख्या छोट्या देशानं अंतिम फेरीत पोहोचणं हे जसं लक्षवेधी ठरलं तसंच या स्पर्धेत मैदानात आणि मैदानाबाहेर झालेले वादही गाजले.

यातील काही निवडक घटना आणि प्रसंग असे.

VARचा वापर

रशियातली ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती म्हणजे Video Assistant Referee (VAR)च्या वापरामुळे.

रेफरीनं घेतलेल्या निर्णयांचं पुनरावलोकन करता यावं आणि मैदानावरील ज्या घटना नजरेतून सुटल्या आहेत, ते दाखवून देणं यासाठी VARचा वापर करण्यात आला. पण या नव्या तंत्रज्ञानानं बऱ्याच सामन्यांचे निकाल बदलून टाकले. यामुळे पेनल्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

काही संघांनी दुर्लक्ष झालेल्या निर्णयांबद्दल तक्रारीही केल्या.

FIFAने नवं तंत्रज्ञान यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत यावेळी चुकांच्या प्रमाणात 17 टक्क्यांनी घट झाल्याचं FIFAने म्हटलं आहे.

मॅराडोनांच्या करामती

रशियात झालेल्या या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे अर्जेंटिनाचा फुटबॉल लिजेंड दिएगो मॅराडोना. पण बऱ्याच वेळा मॅराडोना यांचं चर्चेत राहणं चुकीच्या कारणांसाठी होतं.

आपल्या आवडत्या संघाला मैदानात मॅराडोना मनापासून आणि उत्साहात चीअर अप करत होते. पण विरोधी संघाच्या समर्थकांच्या दिशेने असभ्य हावभाव करणे, धुम्रपानावरील बंदी मोडून सिगार ओढणे अशा कृत्यांनी ते चर्चेत राहिले. आशियातील प्रेक्षकांचा वांशिक अपमान केल्याचा आरोपही मॅराडोना यांच्यावर झाला.

या स्पर्धेला ते FIFAचे अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित होते. असं असतानाही कोलंबिया आणि इंग्लंड विरोधात झालेल्या सामन्यात इंग्लंडला पेनल्टीची संधी दिली म्हणून त्यांनी रेफरी मार्क गायगर यांच्यावर टीका केली होती. ही तर मैदानावर झालेली चोरी आहे, अशी टीका त्यांनी केली होती. नंतर त्यांनी याबद्दल माफी मागितली.

राजकारण आणि फुटबॉल

खेळाडूंनी स्पर्धेवेळी कोणतंही राजकीय विधानं करू नये असा FIFAचा नियम आहे. पण रशियात मात्र या नियमाला हरताळ फासला गेला. स्वित्झर्लंड विरुद्ध सर्बिया हा सामना स्वित्झर्लंडनं जिंकला. पण गोल केल्यानंतर स्वित्झर्लंडच्या तीन खेळाडूंनी अल्बानियाचं राष्ट्रीय चिन्ह असलेलं दोन डोक्यांचं गरूड निर्देशित होईल अशा हस्तमुद्रा केल्या.

यातील 2 खेळाडू अल्बायनियाच्या कोसोव्हा इथल्या वंशाचे आहेत. कोलोव्हा या प्रातांला 2008ला स्वातंत्र्य जाहीर केलं आहे. पण त्याला सर्बिया, चीन आणि रशिया यांचा पाठिंबा नाही पण युरोपीयन युनियन आणि अमेरिकेची मान्यता आहे.

तर क्रोएशियाने रशियाचा पराभव केल्यानंतर क्रोएशियाच्या एका खेळाडूने हा विजय युक्रेनच्या लोकांना अर्पण करत आहोत असं विधान केलं. रशियाने 2014ला क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर युक्रेन आणि रशियातील संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे क्रोएशियाच्या खेळाडूचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं.

महिलांशी असभ्य वर्तन

जर्मन टीव्ही आणि बीबीसीने स्पर्धेत महिला समालोचकांची नियुक्ती केली होती. महिला सबलीकरणाचे असे प्रयत्न होत असतानाच महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन होण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडले. तर परदेशातून आलेल्या प्रेक्षकांनी रशियातील महिलांना उद्देशून परदेशी भाषांत असभ्य शब्द वापरण्याचे प्रकार ही घडले. गेट्टी इमेजीस ही फोटो वृत्तसंस्थाही वादात सापडली.

गेट्टीने फक्त महिला प्रेक्षकांचे फोटो असलेली The Hottest Fans at the World Cup ही फोटो गॅलरी प्रसिद्ध केली. यामुळे गेट्टीवर महिला विरोधी असल्याची टीका झाली, त्यानंतर ही गॅलरी लगेच हटवण्यात आली.

मेक्सिकोचा होमोफोबिया

मेक्सिकोच्या प्रेक्षकांमुळे मेक्सिकोच्या संघाला दंडाला समोर जावं लागलं.

मेक्सिको विरुद्ध जर्मनी सामन्यात मेक्सिकोचे समर्थक "eeeh, puto" असं एका सुरात म्हणत होते. ही घोषणा समलिंगीचा अपमान करणारी आहे. जर्मनीचा गोलकीपर मॅन्यएल न्यएर जेव्हा फ्री कीकला समोर जायचा तेव्हा त्याला उद्देशून मेक्सिकोचे प्रेक्षक अशा घोषणा द्यायचे. त्यामुळे मेक्सिको फुटबॉल फेडरेशनला दंडही झाला.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)