You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FIFA World CUP : 'लाईव्ह' सुरू असतानाच झाला महिला पत्रकाराचा विनयभंग
रशियात सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपचं वार्तांकन करताना महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
कोलंबियन पत्रकार ज्युलियथ गोन्झालेझ थेरेन रशियातल्या एका रस्त्यावरून 'डॉइश वेल स्पॅनिश'वर लाइव्ह रिपोर्टिंग करत होत्या. त्याचवेळी तेथे अचानक आलेल्या एका माणसाने त्यांच्या छातीवर हात ठेवून गालावर किस केलं आणि तिथून पळ काढला.
त्यावेळी ज्युलियथ यांनी कोणताही व्यत्यय येऊ न देता बातमी पूर्ण केली. लाइव्ह संपल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "आम्ही प्रोफेशनल आहोत. आमचा आत्मसन्मान आहे. आमच्याशी असं कोणी वागता कामा नये."
डॉइशे वेलशी बोलताना त्या म्हणाल्या, "त्या ठिकाणी आम्ही दोन तास होतो. जेव्हा आम्ही लाईव्ह सुरू केलं तेव्हा त्या चाहत्यानं संधीचा फायदा घेतला. लाइव्ह संपल्यावर मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो निघून गेला होता."
गेल्या आठवड्यात रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातल्या सामन्याआधी सरान्स शहरातील रस्त्यावर हा प्रकार घडला. 'डॉइशे वेले'नं या घटनेचं फुटेज सोशल मीडियावर टाकलं आणि हा 'हल्ला' तसंच 'सार्वजनिक ठिकाणी झालेला छळ' अशा शब्दांत या घटनेचा निषेध केला.
'डॉइशे वेले'च्या प्रवक्त्या क्रिस्टिना क्यूबस यांनी त्यावर ट्वीट केलं की, "ही मस्करी नाहीये. हे किसिंगही नाही. हा एक प्रकारचा हल्लाच आहे."
गोन्झालेझ यांच्या मते, "अनेकदा चाहते कौतुकानं अभिवादन करतात, आदर व्यक्त करतात. पण या माणसानं तर मर्यादा ओलांडली."
त्यावर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींनी ही घटना अतिरंजित पद्धतीनं सांगितली जात असल्याचं म्हटलं. तर, एका गटानं त्यास 'उन्मादी स्त्रीवाद' म्हटलं.
महिला क्रीडा पत्रकारांच्या छळवणुकीच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मार्चमध्ये 52 ब्राझिलियन पत्रकारांनी एक मोहिम सुरू केली. त्यात खेळाडू आणि चाहत्यांनी किस करण्याच्या आणि मिठी मारण्याच्या घटनांची नोंद ठेवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)