You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुठल्या स्थितीत आहेत अमेरिकेत अटक झालेले 52 भारतीय स्थलांतरित
- Author, जुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश केलेल्या कुटुंबीयांना विभक्त करण्याच्या आणि त्यांना अटक करण्याच्या धोरणावर टीका होत आहे. अशातच अटक झालेल्या हजारो लोकांमध्ये 52 भारतीय असल्याचं समोर आलं आहे.
त्यांना नुकतंच ओरेगनच्या शेरिडन परिसरातल्या तुरुंगात डांबण्यात आलं आहे. यात त्यांच्यासोबत बांगलादेश आणि नेपाळच्या नागरिकांचाही समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणानुसार, अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश केलेल्या लोकांना तुरुंगात डांबण्यात येत आहे. पण त्यांच्या मुलांना केंद्र आणि राज्य सरकारांच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात येत आहे.
ट्रंप यांच्या या धोरणावर अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. याला विध्वंसक कृती असंही म्हटलं जात आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या पत्नी लॉरा बुश यांनी या धोरणाला 'मनाला त्रास देणारी घटना' म्हटलं आहे.
ट्रंप यांनी बदललं धोरण
डोनाल्ड ट्रंप यांनी आता अवैधपणे अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या मुलांपासून विभक्त न करण्याच्या आदेशावर सही केली आहे. आता ही कुटुंब एकत्र राहू शकतील, अशी हमी त्यांनी दिली आहे.
अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये आणि तिथं राजकीय शरण घेणाऱ्यांमध्ये दक्षिण अमेरिकी देशातल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. भारत, बांगलादेश, नेपाल आणि पाकिस्तानच्या नागरिकांची संख्या खूपच कमी आहे. पण आजही ही संख्या हजारोंच्या घरात आहे.
भारतानं प्रतिक्रिया दिली नाही
संयुक्त राष्ट्रानुसार गेल्या वर्षी 7,000 भारतीयांनी अमेरिकेत आश्रय मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
ओरेगनच्या मीडियानुसार, स्थानिक डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आणि नागरिक या अटकेवर नाराज आहेत. कारण त्यांच्यानुसार, सरकार कैद्यांपासून त्यांच्या मुलांना दूर वेगवेगळ्या कॅम्पमध्ये ठेवत आहे. संपूर्ण अमेरिकेत अशा मुलांची संख्या 2,000 एवढी आहे. यात भारतीय मुलंही आहेत की नाही, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
भारत सरकारकडून यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करण्यात आला, पण बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांत 52 भारतीय आहेत, यावर काहीही उत्तर देण्यात आलं नाही.
स्थानिक मीडियानं ओरेगनच्या नेत्यांचा हावाला देऊन सांगितलं की, भारतीय नागरिकांमध्ये हिंदी आणि पंजाबी भाषा बोलणारे सर्वाधिक आहेत. भारतात आपल्याविरोधात कथित भेदभाव होत असल्यामुळे ही माणसं अमेरिकेत गेल्याचं बोललं जात आहे.
भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल या मुलांना वेगळं ठेवण्याच्या धोरणाच्या विरोधात आहेत.
अटक झालेल्या लोकांमध्ये सर्वाधिक लोक हे राजकीय आश्रय मिळवण्याचा प्रयत्न करणारे आहेत. तसंच त्यात महिलांची संख्या अधिक आहे, ज्या मुलांपासून विभक्त झाल्यामुळे वाईट परिस्थितीत आहेत.
ओरेगन काँग्रेसच्या 4 सदस्यांनी शनिवारी अटक केंद्रांचा दौरा केला आणि आपण दुःखी आहोत, आपल्याला राग आला आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत.
या भेटीत कैद्यांनी त्यांना सांगितलं की, दिवसातले 22 ते 23 तास त्यांना एखाद्या खोलीत डांबून ठेवलं जातं आणि एका खोलीत तीन-तीन लोक असतात.
तसंच वकिलांसोबत चर्चा करणं असंभव आहे. आपल्या पत्नी आणि मुलांबाबत यावेळी त्यांनी काँग्रेस सदस्यांसमोर चिंता व्यक्त केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)