You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चुकीच्या वेदनाशामक इंजेक्शननं घेतले 456 रुग्णांचे बळी
चुकीच्या पद्धतीनं वेदनाशामक इंजेक्शन दिल्यामुळे तब्बल 456 रुग्णांचा बळी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यूकेमधल्या गोसपोर्ट वॉर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 1989 ते 2000 या काळात या घटना घडल्या आहेत.
स्वतंत्र पॅनलनं केलेल्या तपासात हा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती उपलब्ध नसलेले जवळपास 200 मृत्यूही यामुळेच झाले असावेत, असंही या तपास अहवालात म्हटलं आहे.
या पेशंटाच्या जीवनाबद्दल कोणताही सन्मान ठेवण्यात आला नाही, असं या अहवालात म्हटलं आहे.
ज्या प्रमाणात ही वेदनाशामक इंजेक्शन देण्यात आली, त्याचं वैद्यकीय समर्थन करता येणार नाही, असंही अहवालात म्हटलं आहे.
या प्रकरणात डॉ. जेन बार्टन यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. लिव्हरपूलचे माजी बिशप जेम्स जोन्स यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात आला.
जोन्स म्हणाले, "आमच्या पॅनलनं पाहिलेल्या कागदपत्रांतून असं दिसून येतं की या 12 वर्षांच्या काळात वॉर्डमध्ये हे वेदनाशामक इंजेक्शन देण्याच्या प्रकाराला क्लिनिकल असिस्टंट डॉ. बार्टन जबाबदार आहेत."
पेशंटना उपचार देण्यात त्यांचा काही सहभाग नसला तरी ही वेदनाशामक औषधं दिली जात असल्याची त्यांना कल्पना होती आणि ते थांबवण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
या उपचारांबद्दल मृत पेशंटच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचही या अहवालात म्हटलं आहे.
या प्रकारात शिस्तभंगाची कारवाई झालेले एकमेव अधिकारी म्हणजे डॉ. बार्टन आहेत. 1996 ते 1999 या काळात झालेल्या 12 पेशंटच्या मृत्यूंना त्यांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांनी त्यानंतर निवृत्ती पत्करली.
या संदर्भात फौजदारी किंवा दिवाणी स्वरूपाची जबाबदारी निश्चित करण्याचं काम पॅनलचं नव्हतं, असं जोन्स म्हणाले. पण भविष्यातील न्यायिक प्रक्रियेसाठी याचा उपयोग होईल, असंही ते म्हणाले.
पोलिसांनी 1998 ते 2006 या काळात झालेल्या 92 मृत्यूंची चौकशी केली आहे, पण यात कायदेशीर कारवाई झालेली नाही. पोलीस अधिकारी ऑलिव्हेया पिकेनी यांनी पॅनलला तपास कार्यात पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं.
या मृत्यूसंदर्भात पाहिल्यांदा चिंता व्यक्त करण्यात आली ती 1998ला. या संदर्भात काही कुटुंबांनी चौकशीची मागणी केली होती आणि त्यासाठी मोहीम राबवली होती.
2003मध्ये प्रा. रिचर्ड बेकर यांनी अहवाल सादर केला. तो 10 वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये त्यांनी या हॉस्पिटलमध्ये काही गुंगीच्या औषधांचा नियमित वापर होत असल्याचं म्हटलं होतं. यामुळे काही रुग्णांचं आयुष्य कमी झालं असं म्हटलं होतं.
जनरल मेडिलक काऊन्सिलनं 2010मध्ये ही औषधं प्रिस्क्राईब केल्याबद्दल डॉ. बार्टन यांना जबाबदार धरलं होतं. यावर डॉ. बार्टन यांनी त्यांच्यावर कामाचा अनावश्यक ताण होता, असा खुलासा केला होता.
पण मनुष्यवध होईल असा निष्काळजीपण सिद्ध होण्यासाठी पुरावे त्यांच्या विरोधात नसल्याचं क्राऊन प्रोसेक्युशन सर्व्हिसनं म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)