You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप - किम भेट : दोन्ही नेते सिंगापुरात दाखल
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन सिंगापूरमध्ये दाखल झाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपही सिंगापूरला पोहोचले आहेत.
एयर फोर्स वनच्या खास विमानाने ट्रंप सिंगापूरला पोहोचले आहेत.
या दोन नेत्यांमधील भेट 12 जूनला सिंगापूरच्या सँटोसा रिसॉर्टमध्ये होणार आहे.
सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं, तर उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची ही आत्तापर्यंतची पहिली भेट असेल.
या भेटीमुळे उत्तर कोरियाची अण्वस्त्र निर्मितीची प्रक्रिया बंद व्हायला सुरुवात होईल, अशी अमेरिकेला आशा आहे.
गेल्या 18 महिन्यांत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बरे-वाईट संबंध पाहायला मिळाले आहेत. भेटीपूर्वीसुद्धा दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे.
दोघांना भेटीतून काय अपेक्षा?
उत्तर कोरियाने आण्विक अस्त्रांचा त्याग करावा, असा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा आग्रह आहे.
तर किम जाँग-उन यांना आता देशाची अर्थव्यवस्था उभारण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासाठी त्यांना मदत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक गरजेची वाटते आहे.
बैठकीत काय होऊ शकतं?
"कोरियन युद्ध संपण्याच्या औपचारिक घोषणेसाठी करार होऊ शकतो. वाटाघाटींमधला तो सगळ्यांत सोपा भाग असेल. त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे," असं ट्रंप यांनी बैठकीपूर्वी सांगितलं होतं.
"सिंगापूरमध्ये 21 जूनला होणारी बैठक फलद्रूप झाल्यास उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांना व्हाईट हाऊसला येण्याचं आमंत्रण देऊ," असंही ते म्हणाले होते.
आण्विक नि:शस्त्रीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत किम यांनी दिल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाँपेओ यांनी सांगितलं आहे. मात्र अमेरिकेच्या दृष्टीने निर्धारित अण्वस्त्रांचा त्याग उत्तर कोरिया करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बैठकीसाठी सिंगापूरच का?
- उत्तर कोरिया आणि सिंगापूर यांच्यामध्ये आर्थिक आणि राजनैतिक संबंध चांगले आहेत.
- आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या रोम करारावर सिंगापूरनं सही केलेली नाही. त्यामुळे किम जाँग उन इथं असताना त्यांच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचा कुठलाही खटला चालू शकत नाही.
- सिंगापूरमध्ये ट्रंप किंवा किम जाँग उन - दोघांविरोधात निदर्शनं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण सिंगापूर हा एकच राजकीय पक्ष असलेला देश आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय इथं सभा घेता येत नाहीत.
- सिंगापूर अमेरिका आणि चीन दोघांचंही दोस्त राष्ट्र आहे.
सिंगापूरमध्ये ट्रंप आणि किम यांचं संरक्षण कोण करणार?
ट्रंप आणि किम आपापली सुरक्षापथकं बरोबर घेऊन येणार असल्याची माहिती सिंगापूरमध्ये अति विशेष व्यक्तींच्या सुरक्षेची माहिती ठेवणाऱ्या राजकीय जाणकारांनी रॉयटर्सला दिली.
ट्रंप आणि किम यांच्या सुरक्षेची जबाबदारी सिंगापूर पोलिसांसह गुरखा जवानांच्या तुकडीवर असेल. गुरखा जवान हे आपल्या शौर्यासाठी आणि उदार मनासाठी ओळखले जातात.
ट्रंप आणि किम या 8 मुद्द्यांवर बोलण्याचं कदाचित टाळतील
सरकारचं संपूर्ण नियंत्रण, मीडियावर नियंत्रण, धार्मिक स्वातंत्र्य, तुरुंगांची परिस्थिती, परदेशी कैदी, वेठबिगार मजुरी, महिला अधिकार आणि मुलं आणि कुपोषण.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)