You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप - किम भेटीचा मुहूर्त अखेर ठरला, 12 जूनलाच होणार चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किंम जाँग उन यांची अखेर भेट होणार आहे. 12 जूनला ही भेट होईल. उत्तर कोरियाचे राजदूत जनरल किम याँग-चोल यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेनंतर ट्रंप यांनी ही घोषणा केली.
गेल्या आठवड्यात ही भेट ट्रंप यांच्याकडून रद्द करण्यात आली होती.
याँग-चोल यांनी किम यांचं पत्र ट्रंप यांना सोपवलं. ट्रंप यांनी हे पत्र 'इंटरेस्टिंग' असल्याचं सांगितलं. पण हे पत्र अजून उघडलेलं नाही, असा खुलासाही त्यांनी नंतर केला.
कोरियन युद्धाच्या औपचारिक समाप्तीचा मुद्दा या बैठकीत असेल, असं त्यांनी सांगितले. 1950-53 या काळात उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात युद्ध झालं होतं. यानंतर शांती करार अजून झालेला नाही.
पत्रकारांशी बोलताना ते ट्रंप म्हणाले, "आजची चर्चा अत्यंत चांगली झाली. सिंगापूरमध्ये 12 जूनला आम्ही भेटणार आहोत." पण एका भेटीत उत्तर कोरियाच्या वादग्रस्त अणू कार्यक्रमावर तोडगा निघणार नाही, असंही ते म्हणाले.
"मी कधीही म्हटलेलं नाही की एका भेटीत यावर तोडगा निघेल. मला वाटतं ही एक प्रक्रिया आहे. पण संबंध सुधारत आहेत आणि हे अत्यंत सकारात्मक आहे," असं ट्रंप म्हणाले.
ट्रंप आणि किम यांच्यातील ही भेट ऐतिहासिक आहे. कारण अमेरिकेचे पदावर असलेले राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियातील नेत्याची ही आतापर्यंतची पहिली भेट ठरणार आहे. अणू कार्यक्रम सोडून दिला तर उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेची उभारणी करण्याचं आश्वासन ट्रंप यांनी दिले आहे. तर किम जाँग यांनी ते अण्विक निःशस्त्रीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे समजलेलं नाही.
जनरल किम याँग-चोल यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पंपेओ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची ट्रंप यांच्याशी भेट झाली. पंपेओ यांनी ही भेट चांगली झाल्याचं सांगितले. ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि चेअरमन किम अशा प्रकारचे नेते आहेत, की तेच असे निर्णय घेऊ शकतात. येत्या काही आठवड्यांत आणि महिन्यांत आपल्याला हे तपासण्याची संधी मिळणार आहे."
वॉल स्ट्रिट जर्नलने परराष्ट्र खात्याच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देत किम यांनी या पत्रात अण्विक कार्यक्रमावर धमकी किंवा सवलतींचा उल्लेख न करता भेटीबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
उत्तर कोरियाने आतापर्यंत 6 अण्विक चाचण्या आणि अनेक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. हे करत असताना शत्रूराष्ट्रांविरोधात विशेष करून अमेरिकेवर उत्तर कोरियाची टीकाटिप्पणी सुरूच होती.
दूर पल्ल्याच्या अंतरावर मारा करता येणाऱ्या क्षेपणास्त्रांवर वाहून नेता येतील अशा प्रकारची लहान अणूबाँब बनवण्याची क्षमता विकसित केल्याचा उत्तर कोरियाचा दावा आहे. पण त्याची पडताळणी होऊ शकलेली नाही.
उत्तर कोरियाशी तडजोडीचे सुरुवातीचे प्रयत्न अपयशी ठरले होते. पण या वर्षी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात थेट चर्चा झाली. जर अण्विक निशस्त्रीकरण केले तर उत्तर कोरियाच्या आर्थिक उभारणीत सहकार्य करण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. पण उत्तर कोरियाने उत्तर कोरियाने सर्वप्रथम उत्तर कोरियाने निशस्त्रीकरण करावे अशी भूमिका घेतली आहे. तर किम पूर्णपणे अण्विक निशस्त्रीकरणासाठी तयार आहे का हे स्पष्ट झालेले नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)