You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप आणि किम यांच्यामध्ये आजवर झालेल्या शाब्दिक चकमकी!
भूतकाळात एकमेकांचा अनेक वेळा पानउतारा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आता एकमेकांशी चर्चा करण्यास तयार झाले आहेत. किम जाँग-उन यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता,जो ट्रंप यांनी स्वीकारला आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अमेरिेकेत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रंप यांनी किम यांच्यावर अनेकदा शाब्दिक हल्ले केले आहेत. किम यांनीही अनेक वेळा अणुचाचण्या आणि मिसाईल चाचण्यांचे दावे करून जगाला वेठीस धरलं होतं. आणि ट्रंप यांच्यावरही आपल्या सरकारी वृत्तसंस्थांद्वारे हल्ले केले आहेत.
तेव्हापासून हा तणाव कायम आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी किमना 'रॉकेटमॅन' तर किम यांनी ट्रंप यांना म्हटलं होतं.
सप्टेंबरमध्ये दिलेल्या एका भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी "आपण उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू," असं म्हटलं होतं. त्यांना उत्तर देत किम जाँग-उन यांना एक नवीन नाव आणि जगाला एक नवा शब्द दिला होता.
किम जाँग-उन यांनी 19 सप्टेंबरच्या आपल्या भाषणात ट्रंप यांना 'डोटार्ड' म्हटलं होतं. 'डोटार्ड' म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्ती.
किम जाँग-उन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीस उत्तर कोरियात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. म्हणून उत्तर कोरियन मीडियानेही नंतर ट्रंप यांच्यावर हल्ला चढवला आणि ट्रंप यांच्यासाठी अनेक विशेषणं वापरली - माफिया, विषारी मशरूम, गुंड, भुंकणारा कुत्रा, म्हातारा आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ.
किम यांनी ट्रंप यांना 'म्हातारा' म्हटल्यावर ट्रंप यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कधीच किम जाँग-उन यांना 'ठेंगणा' आणि 'स्थूल' म्हटलं नव्हतं.
ट्रंप म्हणजे विषारी मशरूमवर उगणारी अळी आहे, अशी संभावना किम जाँग उन यांनी केली होती. तसंच उत्तर कोरियाची न्यूज एजन्सी KCNA वर केलेल्या भाषणात किम म्हणाले होते, की ट्रंप म्हणजे डोकं फिरलेला म्हातारा आहे.
"ट्रंप हे एक राजकीय गुंड आहेत, निर्बल आणि बालिश आहेत," असं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं असं उत्तर कोरियाच्या रोडाँग सिनमून वृत्तपत्राने 23 सप्टेंबर रोजी एका वृत्तात लिहिलं होतं.
"माझ्याकडे क्षेपणास्त्राचं मोठं बटण आहे," असं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात "माझ्या टेबलवर त्यापेक्षाही मोठं बटण आहे," असं ट्रंप यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ट्रंपसाठी किम यांच्याकडून विक्षिप्त, मूर्ख, भुंकणारा कुत्रा, अशी अनेक विशेषणं वापरण्यात आली होती.
जेव्हा ते दोघं मे महिन्यात एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील, तेव्हा ते अशी भाषा एकमेकांसाठी वापरण्याची शक्यता तशी तर नाही.