शेकडो वर्षांपूर्वी 140 मुलांना एकाच वेळी का बळी देण्यात आलं होतं?

एकाचवेळी शेकडो लहान मुलांचा बळी देण्याची घटना इतिहासात घडली होती. या घटनेची उकल पुरातत्त्व तज्ज्ञांनी केली आहे.

पेरूच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात 550 वर्षांपूर्वी एकाच वेळी 140 लहान मुलांचे बळी देण्यात आले होते.

या मुलांसह 200हून अधिक लामा या प्राण्यांचेही बळी देण्यात आले होते. लक्षणीय गोष्ट म्हणजे एकाच कार्यक्रमात हे बळी देण्यात आले होते.

प्राचीन काळातील शीमू संस्कृतीच्या मध्यस्थानी आणि सध्याच्या ट्रुखील्लयो या आधुनिक शहराच्या परिसरात हा शोध लागला आहे.

नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीनं याच्या शोधकार्यासाठी निधी दिला होता. नॅशनल जिऑग्राफिकच्या वेबसाइटवर त्याचा विस्तृत वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शोधकर्त्यांपैकी प्रमुख संशोधक असलेले जॉन व्हर्नो म्हणाले की, "असं काही घडलं असावं याची मी कधीही कल्पना केलेली नव्हती, एवढंच कशाला कधीही कोणी अशी कल्पना केली असेल असं वाटतही नाही."

हुआंचाक्युटो-लास लामा या नावानं प्रसिद्ध असलेल्या या स्थळावर 550 वर्षांपूर्वी मानवी बळी देण्यात आले होते, अशी माहिती 2011मध्ये संशोधकांच्या हाती लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे शोधकार्य सुरू होतं.

3,500 वर्षं जुन्या मंदिराचं उत्खनन करत असताना 40 लहान मुलं आणि 74 लामांचे सांगाडे सापडले होते.

या आठवड्यात बालकांची अंतिम संख्या जाहीर करण्यात आली. पाच वर्षं ते 14 वर्षं वयोगटातील 140 मुलांचे बळी देण्यात आले होते. त्यात 8 ते 12 वर्षं वयोगटातील मुलांची संख्या अधिक होती, असं नॅशनल जिऑग्राफिकच्या संशोधन अहवालात म्हटलं आहे.

पुरातत्त्व तज्ज्ञांच्या असं लक्षात आलं, की मुलांच्या छातीच्या पिंजऱ्याची हाडं काढण्यात आलेली होती. बरगड्यांचही नुकसान झाल्याचं दिसून आलं. कदाचित हृदय काढण्यासाठी या मुलांचे बळी देण्यात आले असावेत, असाही कयास वर्तवला जात आहे.

सिनाबर खनिजापासून तयार केलेल्या शुभ्र लाल द्रवाचा लेप काही मृतदेहांवर आढळून आला. त्यामुळे मानवी बळी देणं हा एखाद्या विधीचा भाग असण्याची शक्यता जास्त आहे.

तसेच या विधीसाठी वापरण्यात आलेले लामा हे 18 महिन्यांपेक्षा कमी वयाचे होते. पूर्वेला अँडेस पर्वताकडे तोंड राहील यापद्धतीनं त्यांना पुरण्यात आलेलं होतं.

दुसरे संशोधक गॅब्रिअल प्रिएतो सांगतात, "जेव्हा लोकांना सांगाडे पाहून कळतं की काय झालं असेल तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो, "असं का केलं असावं?"

ज्या चिखलाच्या थरात बळींना पुरण्यात आलं होतं, तो चिखल हा एकतर या शुष्क भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस किंवा पूर यांच्यामुळे तयार झाला असावा, याकडे हे खोदकाम इशारा करतं. ही परिस्थिती एल-निनो सारख्या किंवा तत्सम हवामानामुळे उद्भवली असावी.

या घटनांमुळे या भागातील मासेमारी धोक्यात आली असावी तसेच किनारपट्टीत आलेल्या पुरामुळे शीमूतील शेती कालव्यांच्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला असावा, अशी शक्यता असल्याचं नॅशनल जिऑग्राफिकच्या अहवालात म्हटलं आहे.

बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या कार्बन डेटिंगद्वारे हे प्रकार इसवी सन 1400-1450दरम्यान घडले असावेत, असं लक्षात येतं.

चंद्राची आराधना करणाऱ्या शीमूंवर काही दशकानंतर इंका संस्कृतीनं आक्रमण केलं होतं. त्यानंतर 50 वर्षांनी स्पॅनिश दक्षिण अमेरिकेत पोहचले आणि त्यांना इंका साम्राज्यावर विजय प्राप्त केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)