You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अबब! 14 आकाशगंगांची टक्कर झाली!
- Author, मेरी हाल्टन
- Role, बीबीसी, विज्ञान प्रतिनिधी
आकाशगंगेत आहेत लाखो तारे... त्या ताऱ्यांची गणतीच नाही. अशा अगणित ताऱ्यांच्या आकाशगंगेचा एक गठ्ठाच सापडला आहे. त्यासोबत समोर आली आहे थक्क करून टाकणारी माहिती.
शास्त्रज्ञांना विश्वाच्या सुरुवातीच्या काळातल्या आकाशगंगांचा एक मोठा साचलेला 'गठ्ठा' सापडला आहे.
विश्वाची सीमारेषा असं अंदाजानं मानलं जातं, त्याच भागात विलक्षण तेजस्वी अशा 14 गोष्टींची टक्कर झाली आणि त्यातून एक अतिभव्य अशी आकाशगंगा तयार झाली.
विश्वात सगळ्यांत मोठी असलेली ही वस्तू आता आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे.
विशेष म्हणजे, हे सगळं 12 अब्ज, होय 12 अब्ज वर्षांपूर्वी घडलं आहे.
विश्वाच्या पसाऱ्यात एवढ्या दूरवर पाहायचं म्हणजे भूतकाळात डोकावून पाहण्यासारखं आहे. कारण आपण आता अनेक प्रकाशवर्षं पुढे निघून आलेलो आहोत.
म्हणजे हा जो आकाशगंगांच्या सापडलेल्या गठ्ठ्यांचा आपण हिशेब मांडतो आहोत तो थोड्याथोडक्या नव्हे 1.4 अब्ज वर्षांपूर्वीचा आहे.
थोडक्यात हे जे घडलं आहे ते तेवढ्याच वर्षांपूर्वी. पण आपल्याला ते आता दिसत आहे.
दक्षिण ध्रुवावर असलेल्या दुर्बिणीतून खुल्या अवकाशाचं निरिक्षण सुरू असताना आकाशगंगांचा हा समूह पहिल्यांदा दिसला. त्या गोष्टी एवढ्या एकमेकांजवळ असल्याचं, म्हणजे एकमेकांवर आदळत असल्याचं पाहून खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं.
"निरिक्षणादरम्यान प्रथम चमकते बिंदू आढळले. जे पाहिलं त्यातून फार काही जगावेगळी माहिती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. पण, महत्त्वाची माहिती कळेल, अशी उत्सुकता होती," असं येल विद्यापीठातील टिम मिलर यांनी 'नेचर'मधल्या लेखात म्हटलं आहे.
ताऱ्यांची शाळा
स्टारबर्स्ट गॅलक्सीज् या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या गोष्टी अतिशय तेजोमय आहेत. त्यांची तारे बनवण्याची क्षमता ही आपल्या आकाशगंगेपेक्षा एक हजारपट अधिक आहे.
या अभ्यासात सहभागी नसलेले प्रा. कॅटलीन केसी यांनी हा शोध अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे.
"दोन आकाशगंगा एकत्र दिसल्या तरी आम्ही भारावून जातो. कारण सर्वसामान्य आकाशगंगांच्या तुलनेत त्या खूपच वेगळ्या असतात. शिवाय, तिथं हजारोपट वेगानं तारे तयार होत असतात. तशा 14 स्टारबर्स्ट गॅलक्सीज् एकत्र सापडणं हे आजवर कधीच ऐकलेलं नाही," अशी टिप्पणी टेक्सास विद्यापीठातल्या संशोधकांनी केली आहे.
गर्दीच गर्दी...
अवकाशातला पाच पट भाग या आकाशगंगांनी व्यापला आहे. त्यामुळे तिथं दाटीवाटी झाली आहे.
"म्हणजे असं समजा की, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये सगळे ग्रह मांडले तर जशी दाटीवाटी होईल, तशीच ही स्थिती आहे," असं या अभ्यासात सहभागी असलेले डॉ. एक्सेल वेब यांनी समजावून सांगितलं.
आकाशगंगेची एवढी घनता तिथं कशी विकसित झाली? विश्वाच्या इतिहासात एवढ्या सुरुवातीच्या काळात ते कसं घडलं? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
मिलर यांच्या मते, "ताऱ्यांनी आकार घेणं ऐन भरात असतानाच हे घडलं आहे."
काळाचं नेमकं गणित कसं?
मग या आकाशगंगा कोट्यवधी वर्षं काय करत होत्या?
आतापर्यंत, वेगवेगळ्या मांडणीनुसार, या आकाशगंगा एकत्र येऊन एका आणखी मोठ्या समूहाचा गाभ्याचा भाग असावा.
खगोलशास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार, सुमारे एक हजार आकाशगंगांचा समावेश असलेल्या 'कॉमा क्लस्टर' एवढा मोठा हा समूह असेल असं मिलर यांनी स्पष्ट केलं.
अवकाशात पूर्ण चंद्रानं व्यापलेल्या आकाराच्या चौपट जागा व्यापेल एवढा 'कॉमा क्लस्टर'चा आकार राक्षसी असतो.
आतापर्यंत, अशा मोठ्या आकाशगंगांचं क्लस्टर आढळलेलं नाही. पण आणखी क्लस्टर असतील, अशा शक्यतेला वाव मिळाला आहे.
दुसऱ्या एका अभ्यासात, दहा आकाशगंगांच्या क्लस्टरचा शोध लावणाऱ्या डॉ. वेब यांच्या मते असे आणखी समूह असण्याची शक्यता आहे.
"हा समूह सगळ्यांत दूरचा आहे," असं मॅक्स प्लॅंक इन्स्टिटयूट फॉर रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीचे शास्त्रज्ञ म्हणाले.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील डॉ. अॅमी बार्गेर यांनी तर हे संशोधन अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. अशाप्रकारच्या क्लस्टरचा उगम सापडणं, हे महत्त्वाचं आहे. त्यातूनच त्याची वाढ आणि रचना याच्याविषयी कळू शकेल, असं बार्गेर यांनी बीबीसीला सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)