You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेशाच्या बॅटलिंग बेगम : खालिदा झिया आणि शेख हसीना
- Author, जस्टीन रौलेट
- Role, दक्षिण आशिया प्रतिनिधी
आपल्या शत्रूला पराभूत कसं करायचं आणि सत्ता कशी मिळवायची हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बांगलादेश सारख दुसरं उदाहरण नाही.
बांगलादेशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना झालेली अटक म्हणजे देशातल्या दोन बलाढ्य महिलांमध्ये सुरू असलेल्या युद्धातील लहानशी खेळी आहे.
बांगलादेशात खालिदा झिया आणि शेख हसीना या दोघींना 'बॅटलिंग बेगम' म्हणून ओळखलं जातं. बेगम या शब्दाचा अर्थ उच्चपदावरील महिला असा आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खालिदा झिया यांच्यातील वैराने देशाला हिंसेच्या खाईत लोटलं आहे. बसबाँब, माणसं गायब होणं आणि हत्यांच्या घटना नेहमीच्या झाल्या आहेत.
पण पूर्वी ही परिस्थिती नव्हती. उलट 1980च्या दशकात या दोघींनी एकत्र येऊन देशात लोकशाहीच्या पुनर्रचनेसाठी लष्कर हुकूमशहा इरशाद यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं.
अपघाताने राजकारणात
या दोघींनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. 1971 साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात झालेल्या लढ्यात अग्रणी असलेल्या नेत्यांशी त्या प्रत्यक्षपणे संबंधित आहेत. पण त्यांच्या राजकारणातील प्रवेशामागे दुर्घटनांचा इतिहास आहे.
शेख हसीना यांचे वडील शेख मजिबूर रेहमान यांना स्वातंत्र बांगलादेशचे पिता म्हणून ओळखलं जातं. ते बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. पण 1975साली त्यांची हत्या झाली.
खालिदा झिया यांचे पती झिया ऊर रेहमान हे सैन्यातील कमांडर तसंच स्वातंत्र्य नायक होते.
1970साली त्यांनी 'बांगलादेश नॅशलिस्ट पार्टी'ची स्थापना केली आणि 1977 साली राष्ट्राध्यक्ष झाले. 1981साली त्यांचीही हत्या करण्यात आली.
इरशाद यांना पराभूत करण्यासाठी दोघी एकत्र आल्या खऱ्या पण नंतर मात्र एकमेकांच्या कट्टर विरोधक बनल्या. 1990च्या दशकात दोघीही बांगलादेशात सत्तेवर आल्या आहेत.
दमनतंत्राचा वापर
शेख हसीना आणि त्यांचा अवामी लीग हा पक्ष सत्तेत असताना विरोधक खालिदा झिया यांच्यावर कारवाया करण्यात आल्या आणि त्यांची ताकद संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जानेवारी 2014मध्ये शेख हसीना यांनी सार्वत्रिक निवडणूक जिंकली.
याला कारण त्यांना मतदारांनी भरभरून मतं दिली हे नव्हतं तर बीएनपीनं मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला, हे होतं.
बहिष्कार का तर? अनाथाश्रम निधीचा गैरवापर केला म्हणून झिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि या आठवड्यात त्या अंतर्गत त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं.
याचा परिणाम म्हणून 300 पैकी 153 जागांवर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं.
मुख्य विरोधी पक्ष बाहेर पडल्यानंतर इतर उमेदवार उभे राहिले नाहीत का? बांगलादेशी राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या एका तज्ज्ञाला मी विचारलं.
"हो उभे राहिले. पण त्यांनी माघार घ्यायचा निर्णय घेतला अथवा त्यांना तसं करण्यास पटवून देण्यात आलं," त्यांनी चेहऱ्यावर हस्य आणत सांगितलं.
'पटवून देण्याचा' त्यांनी जो उल्लेख केला, यासाठीच बांगलादेशी राजकारण चांगलंच ओळखलं जातं.
विरोधकांची शिकार
शेख हसीना यांनी निवडणूक जिंकल्यापासून बीएनपीच्या नेत्यांची शिकार सुरू केली आहे आणि बीएनपीसोबत असणाऱ्या जमात-ए-इस्लामी संघटनेवर बंदी आणली आहे.
या आठवड्यात न्यायालयाने झिया यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली असल्यानं 2019च्या निवडणुकीतून त्यांना बाहेर रहावे लागेल. यामुळे डिसेंबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना सलग चौथ्यांदा राष्ट्रपती पद मिळवतील.
कारण बांगलादेशी कायद्यानुसार, दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवास झालेली व्यक्ती कोणतेही पद स्वीकारू शकत नाहीत.
झिया शिक्षेला आव्हान देऊ शकतात आणि जितके दिवस हे अपील प्रलंबित राहील, तोवर त्या निवडणुकीत उतरू शकतात.
"विरोधकांच्या अनुपस्थितीत यावेळी कुणाचेही हेतू पूर्ण होऊ दिले जाणार नाहीत," तुरुंगात जाण्यापूर्वी झिया यांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना संदेश देताना ही प्रतिक्रिया दिली होती.
त्यांच्या विरोधात 30पेक्षा अधिक फौजदारी खटले प्रलंबित आहेत, हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. झियांवर भ्रष्टाचारापासून राजद्रोहापर्यंत अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या समर्थकांना वाटते की त्यांच्या पक्षाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न आहे. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली असल्याचे ते सांगतात.
मागील आठवड्यात 'ह्युमन राईट्स वॉच'नं या सर्व मनमानी अटक आणि निलंबनाच्या कारवाया रोखण्यासाठी शेख हसीना यांच्याशी संपर्क साधला होता.
या संघटनेनं सरकारवर आरोप केले आहेत की, "सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण एकत्र जमण्याच्या अधिकारांचं उल्लघंन करत आहे."
झिया यांच्या अटकेनंतर रस्त्यावर उतरलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेशी सुरक्षा दलानं अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला.
ह्युमन राईट्स वॉच या संघटनेची आशियाचे संचालक ब्रॅड अॅडम्स म्हणतात, "बंगलादेश सरकारचा खुलेपणाचा आणि लोकशाहीचा दावा पोकळ आहे, कारण राजकीय चर्चांवरच घाला घातला जात आहे."
कंटाळलेला बांगलादेशी नागरिक
पण वस्तुस्थिती अशी आहे की, या दोन बेगमांच्या नेहमीच्या भांडणांना सर्वसामान्य बांगलादेशी नागरिक कंटाळले आहेत.
बांगलादेशातल्या धाब्यावर अथवा एखाद्या कॅफेवर बांगलादेशाच्या राजकारणाबद्दल चर्चा केल्यास तुम्हाला नेहमीच स्तब्ध आणि त्रासदायक स्वर ऐकायला मिळतात.
व्यक्तिगत वैर इथल्या द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी घालत आहे आणि त्याला लोक कंटाळले आहेत.
असं असलं तरी यामुळे या दोघीच बांगलादेशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. दोघीही आता सत्तरीत आहेत. पण दोघींपैकी कुणालाही वादावर पडदा टाकावा वाटत नाही.
"मी लवकरच परत येईन, रडण्याचं काहीच कारण नाही," असं खालिदा झिया यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी न्यायालयातून बाहेर पडताना सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)