कोल्हापूरच्या अंबाबाईच्या प्रसादाची खास गोष्ट

    • Author, स्वाती पाटील राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादाचं एक खास वैशिष्ट्य आहे. हे लाडू कळंबा कारागृहातील महिला कैदी बनवतात.

अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या भाविकांना देवीचा प्रसाद म्हणून लाडू दिला जातो.

जून 2016 पासून अंबाबाईच्या मंदिरात कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या लाडूच्या प्रसादाची विक्री होते.

हे लाडू बनवण्यासाठी कळंबा कारागृहातील बेकरी विभागात लाडूचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.

कारागृहात प्रवेश केल्यानंतर बाहेरच स्वच्छ जागेत चणाडाळ वाळत घातलेली पाहायला मिळते.

शेजारीच या लाडू विभागातले काही पुरुष कैदी बुंदी पाडण्याचं काम करताना दिसतात.

ही बुंदी साखरेच्या पाकात मिसळली जाते. त्यानंतर, महिला कैद्यांकडे ती सामुग्री दिली जाते. इथं काही महिला कैदी लाडू वळण्याचं काम करतात. तर, काहीजणी वळलेल्या लाडूचं वजन करून त्याचं पॅकिंग करतात.

कारागृहातील 40 महिला आणि 27 पुरुष कैदी लाडू बनवण्याच्या कामात व्यग्र असतात.

लाडू बनवताना स्वछतेची काळजी घेतली जात असल्याचा दावा कारागृह प्रशासन करतं.

दररोज कमीत कमी 3,000 ते 5,000 लाडू इथे बनवले जातात. तर नवरात्रोत्सवात दररोज किमान 20,000 ते 25,000 लाडूंची विक्री होते.

उत्सव काळात किमान 100 महिला आणि पुरुष कैद्यांची टीम लाडू बनवण्याचं काम अहोरात्र करत असते.

मागणी तसा पुरवठा करण्याची जबाबदारी या बंदीजनांनी घेतल्यानं मंदिरात कधीही लाडू प्रसाद कमी पडत नाही.

"हा प्रसाद करताना आम्हाला आनंद मिळतो. कंटाळा येत नाही. चीडचीड होत नाही. त्यामुळं समाधान देणारं हे काम असंच मिळत राहो," अशी इच्छा इथं जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुप्रिया मोघे व्यक्त करतात.

मंदिरातील प्रसादाचे लाडू बनवण्याचं काम हे आधी बचतगटामार्फत केलं जात होतं. पण महिला बचत गटाकडून मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ बसत नव्हता. त्यातूनच लाडू बनवण्याचं काम कारागृहातील महिला कैद्यांनी करावं, असा प्रस्ताव पुढे आला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कळंबा कारागृह प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली होती. सुरुवातीला समाजातून या उपक्रमाला विरोध करण्यात आला.

विरोध झाला पण...

महिलांची मासिक पाळी, गुन्हेगारी पार्श्वभूमी यांच्यामुळे त्या महिलांत सात्विक भाव नसणार, अशी कारणं देत विरोध झाला. पण अखेर ही सगळी कारणं खोडून काढत या महिला कैद्यांकडे अंबाबाईच्या लाडूप्रसादाचे काम देण्यात यश आले.

"बंदीजनांकडून प्रसादाचे लाडू बनवण्याला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर कैद्यांना रोजगार मिळत असल्यानं कारागृहात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला. यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा उपक्रम राबवणं गरजेचं होत," असं कारागृह अधीक्षक शरद शेळके सांगतात.

तसंच, देवस्थान समितीनेही हे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं हा ठेका पुन्हा कारागृह प्रशासनाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'कोणतीही तक्रार आलेली नाही'

"कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून प्रसादाचे लाडू बनवणं हा स्तुत्य उपक्रम आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली प्रसाद तयार केला जात असल्यानं कोणत्याही प्रकारची भेसळ होत नाही. आजपर्यंत याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळं महिला कैद्याकडून प्रसादाचे लाडू बनवून घेण्यावर एकमत आहे," असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं.

प्रसादाच्या लाडूविषयी भाविकांना विचारलं, तेव्हा त्यांनी याविषयी आनंदच व्यक्त केला.

"महिला कैद्यांनी प्रसादाचा लाडू बनविल्यानं आमच्या भावनांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. उलट जर त्यांना रोजगार मिळत असेल तर आपण त्यांना विरोध न करता पाठिंबा द्यायला हवा," असं पुण्याहून आलेल्या भाविक श्वेता सुयश सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)