You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेश : माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या अटकेनंतर हिंसाचार
बांगलादेशच्या विरोधी पक्षनेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. या समर्थकांच्या पोलिसांसोबत ठिकठिकाणी चकमकी देखील उडाल्या आहेत.
लहान मुलांच्या एका सामाजिक संस्थेला दिलेल्या आंतरराष्ट्रीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप झिया यांच्यावर आहे. मात्र, झिया यांनी आरोपांचा इन्कार केला आहे.
त्यामुळे येत्या वर्ष अखेरीस बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ७२ वर्षीय खालिदा झिया यांना सहभागी होता येणार नाही.
बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या झिया यांच्या विरोधात सध्या डझनभर प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत.
मात्र, माझ्यावरील आरोप राजकीदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा झिया यांनी केला आहे.
"मी परत येईन. कृपया काळजी करू नका आणि कणखर बना," असं झिया यांनी कोर्टाबाहेर आपल्या नातेवाईकांना सांगितल्याचा दावा डेली स्टार या वृत्तपत्रानं केला आहे.
ढाकामधल्या कोर्टात झिया यांच्याविरोधात निकाल सुनावण्यात आल्यानंतर कोर्टाबाहेरील झिया यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला.
यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं समजतं आहे.
निकाल सुनवण्यात आल्यानंतर झिया यांना तुरुंगाकडे नेण्यात आल्याचे बीडीन्यूज २४ यांनी दिलेल्या वृत्तातून स्पष्ट झालं आहे.
खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान यांना त्यांच्या अनुपस्थितीत १० वर्षांची शिक्षा झाली आहे. तारिक सध्या बांगलादेशात नसून लंडनमध्ये आहे. त्यांच्याबरोबरच झिया यांच्या ४ सहकाऱ्यांनाही तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
झिया पंतप्रधान असताना अनाथ मुलांच्या एका संस्थेला देण्यात आलेल्या २ लाख ५२ हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय चलनातील १ कोटी ६२ लाख २२ हजार ५०० रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. या गैरव्यवहार प्रकरणी झिया दोषी आढळल्या आहेत.
खालिदा झिया कोण आहेत?
- १९९१मध्ये बांगलादेशात २०वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीनं झालेल्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या खालिदा झिया यांच्या पक्षानं विजय मिळवला होता. या विजयामुळेच खालिदा झिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.
- २००१ मध्ये त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आणि २००६ मधल्या निवडणुकीनंतर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं.
- झिया या बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाऊर रहमान यांच्या पत्नी आहेत.
- त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले आहेत. तसंच अवामी लिग पक्षाच्या नेत्या आणि सध्याच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत त्यांचं अनेक वर्षांपासूनचं राजकीय वैर आहे.
- गेल्या दोन दशकात या दोन्ही महिला नेत्यांनी आलटून-पालटून बांगलादेशचं नेतृत्व केलं आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१४ सालची निवडणूक त्यांना लढवता आली नव्हती. त्यावेळी बांगलादेशात त्यांच्या समर्थकांनी मोठं आंदोलन केलं होतं.
गुरुवारी त्यांच्या विरोधात आलेल्या या निकालामुळे देशाची राजधानी ढाका आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. देशातील अनेक दुकानं आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
निकाल जाहीर झाल्यानंतर बांगलादेश नॅशनल पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)