You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑस्ट्रेलियातल्या बाल लैंगिक अत्याचार पीडितांसाठी माफीनामा
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनी म्हटलं आहे की, बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितांची राष्ट्र माफी मागेल. चार वर्षांच्या चौकशीनंतर ऑस्ट्रेलियाच्या विविध संस्थांमध्ये हजारो मुलांवर अत्याचार झाले होते असं समोर आलं आहे.
ऑस्ट्रेलियातील शाळा, चर्च, स्पोर्ट्स क्लब अशा अनेक संस्थांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून हे गुन्हे घडत होते. या सर्व घटनांतील पीडितांची
"एक राष्ट्र म्हणून या घटनेबद्दल पीडितांची माफी मागून त्यांना मान मिळवून देण्याचा हा क्षण आहे. बालक म्हणून त्यांना जे मिळायला हवं ते न देता उलट ज्यांनी या मुलांची काळजी घेणं अपेक्षित होतं त्यांनीच या बालकांची उपेक्षा केली," असं पंतप्रधानांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन संसदेत सांगितलं.
रॉयल कमिशनची चौकशी डिसेंबरमध्ये पार पडली. त्यात त्यांनी 400 पेक्षा शिफारशी केल्या. त्यात कॅथलिक चर्चच्या कौमार्य अबाधित ठेवण्याच्या नियमांत बदल करण्याचासुद्धा समावेश होता.
"हा प्रश्न फक्त काही दोन-चार वाईट प्रवृत्तींपुरता मर्यादित नाही. समाजातल्या बड्या संस्थांचं हे दारुण अपयश आहे," असं त्यांनी सांगितलं.
पीडितांची पत्रं
टर्नबूल म्हणाले की, त्यांचं सरकार माफीनाम्यात काय असावं याबाबत पीडितांबरोबर चर्चा करणार आहे. तसंच या नॅशनल रिड्रेस स्कीममध्ये राज्य सरकारांनी आणि संस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं.
"आम्ही या घटनांमधल्या शोषितांचं देणं लागतो आणि आता या क्षणी आम्ही मागे हटून वेळ दवडणार नाही, असं आम्ही त्यांना वचन देतो." ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियन सरकारने पीडितांना याधीच 3 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरची रक्कम एका योजनेअंतर्गत देण्याचं वचन दिलं आहे. यातून दीड लाख ऑस्ट्रेलियन डॉलर प्रत्येक पीडित मिळतील. त्यांना समुपदेशन आणि इतर सुविधाही मिळतील.
चौकशीत 800 पेक्षा अधिक लोकांच्या व्यथा ऐकून घेण्यात आल्या. पण पीडितांचा खरा आकडा किती आहे हे ते कधीही कळणार नाही, असं म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)