रशिया : मॉस्कोतल्या ओलीस नाट्याचा थरार ज्यात 140 जणांनी गमावले होते प्राण...

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

23 ऑक्टोबर 2002 ची रात्र होती. मॉस्कोमध्ये क्रेमलिनपासून जवळपास 5 किमी अंतरावर रात्री 9 वाजता दुब्रोवका थिएटरमध्ये 'नॉर्ड ओस्ट' नावाचं नवं रशियन नाटक सुरू होतं.

1100 आसन क्षमता असलेल्या त्या थिएटरमध्ये मध्यांतरानंतर मंचावर सैनिकी वेशात असलेल्या कलाकारांचं नृत्य आणि गाणं सुरू होतं. तेवढ्यात थिएटरच्या एका कोपऱ्यातून एक व्यक्ती आत आली. तिनेही सैनिकाचाच गणवेश घातला होती आणि आत येताच तिने हवेत गोळीबार केला.

थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षकांना सुरुवातीला हा नाटकाचाच भाग असल्याचं वाटलं. मात्र, काही क्षणातच त्यांच्या लक्षात आलं की, ती व्यक्ती नाटकाचा भाग नव्हती तर ती खरंच गोळीबार करत होती.

जवळपास 50 सशस्त्र चेचेन्या बंडखोरांनी 850 प्रेक्षकांना ओलीस ठेवलं होतं.

रशियन सैन्याने तात्काळ आणि विनाअट चेचेन्यातून बाहेर पडावं नाहीतर आम्ही सर्वांना ठार करू, असा इशारा त्यांनी दिला.

पुतीन-बुश भेट रद्द

प्रेक्षकांमध्ये असलेले अॅलेक्स बॉबिक ऑस्ट्रेलियाचे नागरिक होते. आपल्या रशियन मैत्रिणीबरोबर ते नाटक बघायला गेले होते.

बॉबिक यांनी बीबीसीला सांगितलं, "अचानक आम्हाला थिएटरच्या एका कोपऱ्यातून बुटांचा आवाज आला. तेवढ्यात कुणीतरी हवेत एक गोळी झाडली. मी माझ्या मैत्रिणीकडे बघून म्हणालो, हा नाटकाचा भाग नाही. काहीतरी अघटित घडणार, याची मला त्याच क्षणी कल्पना आली होती."

थोड्या वेळाने प्रेक्षकांपैकीच एक असलेल्या बारमेड ओल्गा ट्रिमॅन यांना एक तरुणी बंडखोरांशी भांडताना दिसली. एक बंडखोर म्हणत होता, "गोळी घाला हिला."

तेवढ्यात ओल्गा यांना एकापाठोपाठ एक 5 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर एका तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आला.

पहिल्या दिवशी चेचेन्या बंडखोरांनी त्यांच्या मोहिमेत अडथळा ठरू शकणाऱ्या 150 लोकांना सोडलं. यात काही परदेशी नागरिक, काही रशियन महिला आणि काही मुलांचा समावेश होता.

बाहेर आलेल्या प्रेक्षकांमार्फत त्यांनी रशियन सरकारला संदेश पाठवला. बंडखोरांना ठार करण्याचा प्रयत्न केलात तर एका बंडखोरामागे आम्ही तुमची 10 माणसं मारू, अशी धमकीच या बंडखोरांनी दिली.

दुसऱ्या दिवशी आणखी 39 जणांना सोडण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यासोबतची नियोजित बैठक त्यांनी रद्द केली.

मंत्रिमंडळाशी सल्लामसलत केल्यानंतर पुतीन यांनी सर्व ओलिसांना सुखरूप सोडल्यास बंडखोरांना सुरक्षित रशियाबाहेर पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला.

घाणीचं साम्राज्य

त्या घटनेविषयी सांगताना अॅलेक्स बॉबिक म्हणाले, "त्यांनी ऑर्केस्ट्राच्या पिटाला बाथरूम बनवलं होतं. दर चार तासांनी तिथे जायची परवानगी असायची. त्यामुळे लोक रांगेत उभे राहून वाट बघायचे. जमिनीवर मूत्राचा अडीच इंचाचा थर झाला होता. त्यातून चालत जावं लागायचं."

"चोहीकडे घाण वास पसरला होता. त्यांनी खायलाही काही दिलं नाही. कधी-कधी थिएटरमधल्या दुकानातून ते आमच्यासाठी काही चॉकलेट्स आणायचे आणि आमच्याकडे फेकायचे. पाणीही अधून-मधूनच द्यायचे. ते कधीच पुरायचं नाही."

"जमिनीवर झोपायची परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही बसल्या-बसल्याचं झोपायचो. आम्हाला जागं करण्यासाठी ते हवेत गोळीबार करायचे."

व्हेंटमधून गॅस सोडला

थिएटरच्या सर्वच एन्ट्री पॉईंट्समधून वेगाने आत घुसून बंडखोरांना जायबंद करणं, हा ओलिसांना सोडवण्यासाठीचा सर्वात स्वाभाविक उपाय होता, असं ब्रिटनमध्ये राहणारे एसएएस टीमचे माजी सदस्य रॉबिन हार्सफॉल म्हणतात.

मात्र, यात अडचण अशी होती की, बंडखोर अशाप्रकारच्या कारवाईला सामोरं जाण्यासाठी सज्ज होते. शिवाय, अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी रशियन जवानांना 100 फुटांचा पॅसेज पार करावा लागला असता. पायऱ्यांवरही बंडखोरांनी खडा पहारा ठेवला होता.

अशी काही कारवाई करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागला असता आणि बंडखोरांना संपूर्ण थिएटर बॉम्बने उडवून देण्यासाठी एवढा वेळ पुरेसा ठरला असता.

त्यामुळे 48 तासांनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

पहाटे तीनला कारवाई करण्यात येईल, अशी बातमी लीक करण्यात आली. खरंतर कारवाईसाठी पहाटे पाचची वेळ निश्चित करण्यात आली होती.

थिएटरच्या व्हेंटमधून आत गॅस सोडून बंडखोरांना शिथील करण्यात येईल आणि त्यानंतर जवान आत घुसतील, अशी रणनीती ठरवण्यात आली होती. मात्र बंडखोरांनी मास्क घातले होते. त्यामुळे त्यांच्यावर गॅसचा लगेच परिणाम झाला नाही.

थिएटरमध्ये असलेल्या अन्या अंद्रियानोवा यांना सर्वात आधी पहाटे जवळपास साडे पाच वाजता वेगळा वास आला. त्या खुर्चीत बसल्या होत्या. पण त्यांना झोप येत नव्हती.

थिएटरमध्ये गॅस हल्ला होण्याची शक्यता वाटल्याने अन्या यांच्या एका मैत्रिणीने त्यांच्या फोनवरून मॉस्कोमधल्या एका रेडियोच्या कार्यक्रमात फोन केला.

त्या खूप घाबरल्या होत्या. जवळपास ओरडूनच त्या म्हणाल्या, "ते आमच्यावर गॅसने हल्ला करत आहेत."

तेवढ्यात अन्या यांनी तो फोन घेतला आणि कार्यक्रम सादर करणाऱ्या निवेदकाला सांगितलं, "आम्हाला गॅसचा वास येतोय."

दुसऱ्याच क्षणी रेडियोच्या श्रोत्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. अन्या म्हणाल्या, "तुम्हीही ऐकलं. आम्हा सर्वांना उडवून टाकणार आहेत."

मुख्य हॉलचं दार बॉम्बने उडवलं

टाईम मासिकच्या 4 नोव्हेंबर 2002 च्या अंकात जोहाना मेक्गियरी आणि पॉल क्वीन जजने लिहिलं होतं, "थिएटरच्या व्हेंटिलेशन यंत्रणेतून गॅस सोडण्यात आला. रशियन जवानांनी थिएटरच्या जमिनीखाली बोगदा बनवून फरशीलाही भोकं पाडली होती. त्यातूनही गॅस सोडण्यात येत होता."

"काही महिला बंडखोरांनी बाल्कनीच्या दिशेने धाव घेतली. पण, त्या बेशुद्ध पडल्या."

गॅस सोडल्यानंतर तासाभराने 6 वाजून 33 मिनिटांनी 200 जवान आत आले. सात मिनिटांनंतर त्यांनी मुख्य हॉलचं दार बॉम्बने उडवलं.

आत घुसताच रशियन सैन्य जवानांनी शुद्धीत असलेल्या बंडखोरांना गोळ्या घालून ठार केलं. त्यानंतर जे बंडखोर बेशुद्ध होते त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या.

कारवाईनंतर रशियन पथकाच्या एका सदस्याने पत्रकारांना सांगितलं, "आम्ही बंडखोरांवर पॉईंट ब्लँक रेंजवरून गोळ्या झाडल्या. हे क्रूर होतं. मात्र, एखादी व्यक्ती आपल्या कंबरेला 2 किलो स्फोटकं बांधून असेल तर त्याच्यासाठी हेच योग्य होतं. थिएटरच्या फरशीवर सगळीकडे बॉम्ब होते."

सर्वात मोठा बॉम्ब 50 किलो टीएनटीचा होता. तो पंधरा नंबरच्या रांगेत मधोमध ठेवला होता. विशेष म्हणजे हा बॉम्ब तिथे ठेवण्यासाठी बंडखोरांनी ओलिसांचीच मदत घेतली होती. मात्र, यापैकी एकाही बॉम्बचा स्फोट झाला नव्हता.

हल्ल्याच्या वेळी काही प्रेक्षकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेरच्या गेटवर उभ्या असणाऱ्या बंडखोरांनी त्यांना ठार केलं.

140 जणांचा मृत्यू

अॅलेक्स बॉबिक सांगतात, "मी खाली मान घालून बसलो होतो. तेवढ्यात मला बाहेरून गोळीबाराचा आवाज आला. थोड्याचवेळात माझ्या मैत्रिणीला कसलातरी वास येऊ लागला. पण, मला काहीच जाणवलं नाही. थिएटरमध्ये गॅस सोडल्याचंही तिनेच मला सांगितलं."

"तिने चेहऱ्याला रुमाल लावला आणि मलाही सांगितलं. मीसुद्धा चेहऱ्यावर रुमाल ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझी शुद्ध हरवली. शुद्धीत आलो तेव्हा काही रशियन जवान थिएटरमध्ये पळत असल्याचं मला दिसलं. "

या संपूर्ण कारवाईत 90 हून जास्त ओलीस आणि 50 चेचेन्या बंडखोरांचा मृत्यू झाला. मात्र, एकाही रशियन जवानाला दुखापत झाली नाही.

पाच पट अधिक स्लिपिंग एजंटचा वापर

बंडखोरांचा कमांडर 27 वर्षांचा मोवसार बरेयेव याला दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघराजवळ गोळी झाडून ठार करण्यात आलं.

जोहाना मॅक्गियरी आणि पॉल क्वीन जजने लिहिलं, "ओलीस ठेवलेले काही जण स्वतःच्या पायावर चालत थिएटर बाहेर गेले. पण, बहुतांश लोकांना रशियन जवान आणि बचाव पथकाने उचलून बाहेर आणलं. बाहेर उभ्या असलेल्या बस आणि अॅम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नेण्यात आलं. जवळपास 450 लोकांवर औषधोपचार करण्यात आले."

क्रेमलिनच्या एका निकटवर्तीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत सामान्य प्रमाणापेक्षा पाच पट अधिक स्लिपिंग एजंटचा वापर करण्यात आला होता.

मृत्यू झालेले सर्व ओलीस गॅसच्या दुष्परिणामांमुळे गेले. विशेष म्हणजे त्यावेळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या वेशात जाऊन रुग्णांची विचारपूस केली होती.

थिएटरचे संचालक जॉर्जी वसिलयेव यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "थिएटरमध्ये गोळीबाराचा आवाज सुरू होताच बंडखोरांनी आम्हाला आपल्या सीटवरच बसायला आणि हाताने आपलं डोकं झाकायला सांगितलं. मात्र, काही क्षणांतच सगळे बेशुद्ध झाले."

बंडखोरांमध्ये एक तृतीयांश महिला

चेचेन बंडखोरांमध्ये एक तृतियांश महिला होत्या. एफएसबी या रशियन गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार या महिलांचे पती किंवा भाऊ रशियन सैन्याशी लढताना ठार झाले होते.

त्या आपल्या ध्येयासाठी स्वतःचा जीव द्यायलाही तयार होत्या. डोळे वगळता त्या संपूर्ण काळ्या कपड्यांमध्ये झाकल्या होत्या.

त्यांच्या एका हातात पिस्तुल होतं आणि दुसऱ्या हातात कंबरेवर बांधलेल्या स्फोटकांपर्यंत जाणारी केबल होती. काळे मास्क बांधलेल्या पुरूष बंडखोरांनी खांब, भिंती आणि सीट्सवर बॉम्ब बांधले होते.

रशियन सैन्याने आत घुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण थिएटर जमीनदोस्त करू, अशी धमकी ते देत होते. त्यांचा नेता बारायेव याने कुठलाही मास्क बांधलेला नव्हता.

डॉक्टरांपासून माहिती लपवली

रशियन सैन्याच्या कारवाईत अनेक ओलिसांचा मृत्यू झाला. तरीही तिथल्या सरकारने हे आपलं यश असल्याचा दावा केला. यासाठी त्यांनी एक विचित्र मांडणी केली. त्यांचं म्हणणं होतं की, ज्यांचा मृत्यू झाला त्यांना आधीच वेगवेगळे आजार होते.

रशियन सेंटर फॉर डिझास्टर मेडिसिनचे व्हिक्टर प्रियोब्रेजेन्सकी म्हणाले, "अनेकांचा ताण आणि थकव्यामुळे आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, जनतेचा या स्पष्टीकरणावर विश्वास बसला नाही."

ओलीस ठेवलेल्या एवढ्या लोकांचा मृत्यू कसा झाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बचाव मोहीमच यासाठी कारणीभूत असावी.

रशियन सैन्य जवानांनी थिएटरवर ताबा मिळवताच मॉस्को रेस्क्यू सर्विसच्या डॉक्टरांनी ओलीस ठेवलेल्यांवर उपचार सुरू केले. मात्र, कुणीही त्यांना गॅसची कल्पना दिलेली नव्हती.

मॉस्को रेस्क्यू सर्व्हिसचे अॅलेक्झॅंडर शबलोव्ह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बचाव मोहिमेदरम्यान खास गॅस वापरल्याची कल्पना आम्हाला कुणीही दिली नव्हती."

आम्ही सर्व सूचना सरकारी रेडियोवरच ऐकल्या. ओलीस ठेवलेल्यांना प्रथमोपचार देण्यासाठी आपलं किट घेऊन जा, एवढीच सूचना आम्हाला मिळाली होती.

जवळपास 1000 जण बेशुद्ध होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केवळ 17 डॉक्टर्स होते. त्यामुळे अखेर जवानांना या लोकांना उचलून बाहेर आणावं लागलं. अशाप्रकारच्या बचाव मोहिमेचा त्यांना कसलाच अनुभव नव्हता.

अनेक जवानांनी बेशुद्ध लोकांना अॅम्ब्युलन्समध्ये टाकताना पाठीवर झोपवलं. त्यामुळे अनेकांचा गुदरून मृत्यू झाला. शिवाय, अॅम्ब्युलन्समध्येही बेशुद्ध लोकांना अशापद्धतीने टाकलं होतं की कुणाला इंजेक्शन दिलं आहे आणि कुणाला नाही, हेसुद्धा कळत नव्हतं.

या घटनेतून रशियन जवानांनी धडा घेतला नाही. दोन वर्षांनंतर चेचेन्या बंडखोरांनी बेस्लान शाळेत शेकडो शाळकरी मुलांना ओलीस ठेवलं होतं.

रशियन जवानांनी त्यावेळी केलेल्या बचाव कारवाईत 300 जणांचा मृत्यू झाला होता. यात बहुतांश लहान मुलं होती. या कारवाईनंतरही रशियन सैन्यावर बरीच टीका झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.